Wednesday, January 3, 2018

( अध्यात्म) स्वर्ग आणि नर्काचा दरवाजा

     
नंदकुमार बंदूक आणि तलवार चालवायला शिकत होता. त्याला अहंकार जडला. त्याला वाटत होते की, आपल्यासारखा निशाणेबाज दुसरा कोणी नाही. पुढे तो इतका अहंकारी बनला की, मोठ्या लोकांचा आदर राखायचाच विसरून गेला. जवळच एक झोपडी होती. त्यात एक संत राहत होते. फार परिचित नव्हते,पण आजूबाजूचे लोक त्यांचा आदर करत होते. खूप पोहचलेला संत आहे, असा त्यांचा विश्वास होता.त्यांचं नाव होतं स्वामी कृष्णानंद. नंदकुमार एक दिवस त्यांच्याजव़ळ गेला.त्याने त्यांना ना नमस्कार केला, ना आपली ओळख सांगितली. थेट त्यांच्यासमोर असलेल्या आसनावर जाऊन बसला. वर म्हणाला, लोक विनाकारण का बरं स्वर्ग आणि नर्कावर विश्वास ठेवतात? स्वामी कृष्णानंद यांनी विचारले, तू तलवार जवळ का ठेवतोस? ओ म्हणाला, मला सैन्यात भरती व्हायचं आहे. कर्नल बनायचं आहे. यावर स्वामी म्हणाले, तुझ्यासारखी माणसे सैन्यात भरती होऊ शकतात? पहिल्यांदा तुझं तोंड आरशात जाऊन पहा. हे ऐकून नंदकुमारला राग आला. त्याने म्यानेतून तलवार उपसली. तेवढ्यात स्वामी कृष्णानंद म्हणाले, काय रे! तुझी तलवार? याच्याने तू कुठल्याही पराक्रमी व्यक्तीचा सामना करू शकणार नाहीस. वीरांच्या तलवारीची चमक काही औरच असते. नंदकुमार रागाने लालेलाल झाला. त्याने तलवार उगारली. तो स्वामींवर वार करणार तोच स्वामी शांत स्वरात म्हणाले, आता तुझ्यासाठी नर्काचा दरवाजा उघडला.हे ऐकताच नंदकुमारचे डोके ताळ्यावर आले.त्याने तलवार म्यानेत ठेवली. त्याने वाकून स्वामींचे पाय धरले आणि त्यांची माफी मागितली. तेव्हा स्वामी म्हणाले, आता तुझ्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले आहेत.

No comments:

Post a Comment