Saturday, January 20, 2018

या घरासाठी एकही झाड तोडले नाही

     काही लोकांना काही तरी वेगळे करण्याचा ध्यास लागलेला असतो. त्यातूनच काही तरी वेगळे आणि इतरांना प्रेरणा देणारे काही तरी घडून जाते. केरळमधल्या बीजू अब्राहम नावाच्या व्यक्तीनेदेखील असे काही करून दाखवल्याने सध्या ती चर्चेत आली आहे. या व्यक्तीने त्याच्या घरासाठी एकही झाड तोडले नाही. शिवाय खुदाई करून दगडांची व्यवस्था केली. उपलब्ध साधनांचा, टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्याने आपले आलिशान घर बांधले आहे. आपल्या मल्लापल्ली या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावात असे घर बनवून इतरांना एक आदर्श घालून दिला आहे. आणखी एक विशेष म्हणजे या शानदार घरात वृद्ध माणसे राहतात.

      12 हजार फूट जागा लागलेल्या या घरासाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही, याची पुरेपूर दक्षता बीजू अब्राहम यांनी घेतली आहे. या अदभूत विचारांमुळेच त्यांचे घर अगदी खास बनले आहे. ते आपल्या  गृहनगर मल्लापल्ली गावात राहणार्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्याची इच्छा त्यांना परत आपल्या गावात आणण्यास भाग पाडले. पण इथे आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, इथे  वयोवृद्ध लोकच अधिक राहतात. त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नव्हती,कारण त्यांची मुले त्यांच्याजवळ नव्हती. ती त्यांना सोडून अन्यत्र आपल्या पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी गेली होती. अब्राहम यांनी या गावात राहिलेल्या वृद्ध लोकांची सोय व्हावी, अशा पद्धतीचे घर बांधण्याचा निश्चय केला. मात्र असे करताना त्यांनी भारतीय संस्कृती आणि कला जोपासण्याचा प्रयत्न करताना निसर्गातील टाकाऊ आणि निरुपयोगी वस्तूंमधून घर उभा करण्याचा निश्चय केला.
     भारतात सिमेंटचा वापर 1886 ला सुरू झाला,मात्र तत्पूर्वी दगड-मातीचीच घरे उभारली जात होती. नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जायचा. अब्राहम यांनी घराची निर्मिती करताना या पद्धतीचा उपयोग करण्याची प्रेरणा मिळाली. यापूर्वी ते भारतभर फिरले होते. गावांमध्ये बांधण्यात आलेल्या घरांचे त्यांनी निरीक्षण केले होते. खास करून त्यांना दक्षिण भारतातल्या घरांची रचना भावली होती. ती रचना आणि पद्धती आपल्या घराच्या बांधकामात वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी पारंपारिक कौलारू छत असलेल्या पद्धतीचा वापर केला. अशाच प्रकारे विटांचा उपयोग केला. अब्राहम यांनी आपल्या घराच्या आसपासची 24 घरे त्यांनी लिलावात खरेदी केली. या घरांची पडझड झाली होती,त्यात राहणे शक्य नव्हते, अशा प्रकारची या घरांची आवस्था झाली होती. ही घरे पाडल्यानंतर जी काही लाकडे,विटा, दगड,फरशी आणि पायातले दगड मिळाले,त्यातूनच त्यांनी आपल्या घराची निर्मिती केली.यासाठी त्यांनी नव्या झाडांची कत्तल केली नाही.
     या घराला त्यांनी ओरू असे नाव दिले आहे. त्याचा अर्थ आहे, गृहनगर. के घर बांधताना ज्या ज्या वस्तू मिळाल्या,त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचला. घर बांधताना मजुरांना बरेच दिवस रोजगार मिळाला. आजूबाजूच्या गावातून हे मजूर येत होते. काही मजूर आसाममधून आले होते. त्यांनी त्यांच्या प्रदेशात जशी घरे असतात, तसे घर उभा करण्याचा प्रयत्न केला. आर.डी. पदमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या घराची निर्मिती झाली आहे. या घरात तब्बल 15 खोल्या आहेत.शिवाय वृद्धांसाठी आवश्यक असणार्या सर्व-सोयींची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शौचासाठी कमोल्ड आणि व्हिलचेअरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
     बीजू अब्राहम आपल्या एका मुलाखतीत सांगतात की, माझ्या या घरामुळे इतरांना प्रेरणा मिळाली तर त्याचा मला आनंदच आहे. लोकांनीही अशा प्रकारे पर्यावरणाचा र्हास होणार नाही, अशा घरांची निर्मिती करावी आणि निसर्गाचे रक्षण करावे.

No comments:

Post a Comment