मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि गीतकार म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित असलेले
शांताराम आठवलेंचा यांचा जन्म पुणे येथे २१ जानेवारी १९१0 रोजी
झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. त्याच वेळी त्यांच्या
कविता नियतकालिकात प्रसिद्ध होऊ लागल्या. हस्तलिखिते, मासिके,
वक्तृत्वस्पर्धा यातही ते भाग घेत. वाचन, लिखाण
यांच्या बरोबरच 'बेबंदशाही','शिवसंभव'
या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करून ती क्षेत्रेही आठवल्यांनी
शाळेत असतानाच गाजवली.
१९२६ ते १९३१ या काळात आठवलेंनी
'शाकुंतल' ते 'खडाष्टक' अशी संगीत रंगभूमीवरील सर्व नाटके मनमुराद
पाहिली. १९२९ साली आठवलेंच्या वडिलांना पक्षाघात झाला आणि त्यातच त्याचा दु:खद अंत
झाला. त्यामुळे शांताराम आठवलेंच्या शिक्षणात काहीसा खंड पडला.१९३१ साली आठवले
कुटुंब पुण्याहून कोलवडी या त्यांच्या वतनाच्या गावी आले.
याच काळात आठवले नोकरीच्या
शोधात होते. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह. ना. आपटे यांची व आठवलेंची पत्रमैत्री होती.
आपटे यांना कोरेगावला त्यांच्या 'मधुकर' या मासिकाचे संपादनसहाय्य व मुद्रणालयाच्या कामासाठी आठवलेंसारखाच माणूस
हवा होता आणि आठवले यांनाही उपजीविकेचे साधन हवे असल्याने आठवलेंनी कोलवडीला
अलविदा करत कोरेगाव गाठले. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह 'एकले बीज' या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी
झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४0 साली 'बीजांकुर' हा दुसरा प्रसिद्ध झाला. 'सकाळ', 'स्वराज्य' अशा
वर्तमानपत्रात तर 'मनोहर', 'वांग्मयशोभा'
यांसारख्या मासिकांमधून व 'शालापत्रक' या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. 'मधुकर' मासिकाच्या पत्रव्यवहारात एक दिवस एक लक्ष
वेधून घेणारे, हिरव्या शाईत लिहिलेले पत्र आले. त्याखाली
मोठय़ा, स्वच्छ व वळणदार अक्षरात डौलदार सही होती 'व्ही शांताराम' यांची. प्रभात फिल्म कंपनी आपटे
यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर
आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले.
चित्रपटाचे नाव ठरले 'अमृतमंथन'. शांताराम
आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी
यअमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले
'अमृतमंथन' मधील
गीतांनी आठवले यांना प्रभातमध्ये कायम स्वरुपाची नोकरी मिळणे शक्य झाले. १
जानेवारी १९३५ या दिवशी आठवले प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात रुजू झाले.
गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी
त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे चित्रपट हे शांताराम आठवलेंचे कार्यक्षेत्र
ठरून गेले. यानंतर संत तुकाराम, कुंकू, गोपालकृष्ण,माझा मुलगा, संत
ज्ञानेश्वर, शेजारी, संत सखू, दहा वाजता आणि रामशास्त्री या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते
लिहिली. 'मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी' अशी त्यांची ओळख झाली.
दहा चित्रपटांतील साध्या सोप्या
शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण गीतांमुळे आठवले यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या
गीतांमुळेच अनेक चित्रपट यशस्वी झाले. चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी
चित्रपट पाहिले, समीक्षकांनीही त्यांची गीते नावाजली.
प्रभातच्या परवानगीने, 'भरतभेट', 'आपले
घर' अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी
लागली यामध्ये भाग्यरेखा, बेलभंडार, झंझावात,
वहिनीच्या बांगडया, शेवग्याच्या शेंगा,
आई मला क्षमा कर, पडदा, सुभद्राहरण,
वावटळ या चित्रपटांचा समावेश आहे.
शांताराम आठवले यांनी शांतिचिया
घरा, बकुळफुले, वनातली
वाट, कुंडलीनी जगदंबा, सुखाची लिपी,
ओंकार रहस्य आणि प्रभातकाल या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके
लिहिली. याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीतेही लिहिले. २ मे १९७५ रोजी या जगाचा निरोप घेतला.
No comments:
Post a Comment