एक होता ब्राम्हण आणि एक होती
ब्राम्हणीण. दोघे पूजा-अर्चा करून कसे तरी आपले पोट भरायचे. पण ब्राम्हणीणला खूप
वाटायचे की, रोज सोन्या-चांदीचे दागदागिने घालून
मिरवावे. कधी कधी या गोष्टीवरून नाराजदेखील व्हायची. ब्राम्हणाने विचार केला,काही तरी करून बायकोला प्रसन्न केले पाहिजे.झालं, तो
पैसे कमवण्यासाठी शहराकडे निघाला.
जाता जाता त्याला एक विहिरी
दिसली.ब्राम्हण विहिरीच्या काठावर बसला आणि जोरजोराने गायत्री मंत्र म्हणू
लागला.
त्या विहिरीच्या तळाशी एक हडळ
राहत होती. तिच्या कानांवर पंडिताचे मंत्रोच्चाराचे ध्वनी पडले, तशी ती विहिरीच्या काठापर्यंत आली. भयंकर हडळीची सुंदर परी
बनली.खरे तर ती एक परीच होती, पण एका शापामुळे तिला हडळ
बनावे लागले होते.
ब्राम्हण पहिल्यांदा तर परीला
पाहून चक्रावून गेला. परीने ज्यावेळेला वर मागायला सांगितले,तेव्हा त्याने आपल्या बायकोचा विचार केला आणि परीला म्हणाला,"
तू मला खूप अशी किंमती आभूषणं दे."
परीने पटकन आभूषणं दिली. पुन्हा
म्हणाली,"आणखी काही माग."
ब्राम्हण म्हणाला,"मला रूप बदलण्याची शक्तीदेखील दे."
परीने त्याला ही
शक्तीदेखील देऊन टाकली.आता ब्राम्हण गावाच्या दिशेने परतला.वाटेत त्याने आपल्या
बायकोची परीक्षा घेण्याचा विचार केला.त्याने चटकन एका सुंदर यूवकाचे रूप धारण केले
आणि आपल्या घरी गेला.
युवकाचे रूप घेतलेला
ब्राम्हण त्याच्या बायकोजवळ गेला आणि म्हणाला," तुझा नवरा आता कधीच परतणार नाही. तू माझ्याशी लग्न कर. तू नेहमी सुखी
राहशील." असे म्हणत त्याने दागदागिण्यांची पेटी उघडून ब्राम्हणीणला दाखवली.
ब्राम्हणीण आभूषणं पाहातच
राहिली. मग उठली आणि ती आभूषणं घेऊन अंगणातल्या विहिरीत टाकून दिली.रूप बदललेल्या
ब्राम्हणाने आश्चर्याने विचारले,"हे काय
केलेस तू?"
ब्राम्हणीणने मोठ्या गंभीरपणे
उत्तर दिले,"आता तेच राहिले नाहीत तर,त्या आभूषणांचे काय करू?"
बायकोचे बोलणे ऐकून ब्राम्हण
आपल्या पहिल्या रूपात आला आणि तिला सगळे काही सांगितले.
त्यानंतर ते दोघेही अगदी
सुखा-समाधानात राहू लागले.-डॉ. हरिवंश राय बच्चन
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment