प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा
आहे. तामीळनाडू राज्यात तर आपली राष्ट्रभाषा म्हटली जाणार्या हिंदीला कोणी विचारतच नाही. कोणी हिंदीमध्ये विचारले
तर काहीच उत्तर मिळत नाही. तिथला तामिख अभिमानी म्हणतो,
’तामील में बोलो या तो इंग्रजी मे.’ खरे तर भारतातल्या
प्रत्येक राज्याला त्याच्या भाषेमुळेच ओळख आहे. जसे पंजाबी पंजाब
राज्यात,बंगाली बंगाल राज्यात, गुजराथी
गुजरात राज्यात, तेलगू तेलंगणा मध्ये. मग
महाराष्ट्रात मराठी हवी तशी का बोलली जात नाही?आपण मराठीचा अभिमान
का बाळगत नाही? त्यामुळेच आपली मराठी भाषा राजभाषा तर झाली नाहीच,पण ती ज्ञानभाषाही होत नाही,हे आपले दुर्दैव नाही काय?
मराठी बांधवांना मराठीचा अभिमान
दिसत नाही. विकीपिडियासारखे किंवा गुगलसारख्या माहित कोषात आपल्याला
मराठीची वानवाच दिसते. एकाद्या विषयाची किंवा एकाद्या वस्तूची
माहिती मिळवायची तर आपल्याला इंग्रजीतूनच मिळवायला लागते. मराठीतून
फारशी माहिती उपलब्ध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा
शिक्षणमंत्री विनोद तावडे विकिपिडियावर काम करायला मराठी माणसांना सांगतात पण कोणीच
मनावर घेत नाही. खुद्द महाराष्ट्र शासनच याबाबतीत उदासिन आहे.
त्यांनीच खरे तर यासाठी पुढाकार घ्यायला हवा आहे. यासाठी एकादी यंत्रणा उभी करून कामाला लावण्याची आवश्यकता आहे. पण आडातच नाही तर पोहर्यात कोठून येणार, असा प्रश्न आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
आपल्या राज्यातल्या मराठी शाळांची दैनावस्था! राज्यामध्ये मराठी शाळेची मोठ्या
प्रमाणात गळती. मराठीचे चांगले शिक्षण नसणे, मराठी शाळांना अनुदान नसणे हा मराठी भाषेवर प्रथम आघातच म्हटला पाहिजे.
आता तर महाराष्ट्र सरकार शाळाच बंद करायला निघाले आहे. कंपन्यांना प्रोत्साहन देऊन मराठी शाळा बंद पाडण्याचा आत्मघातकी निर्णय कसा
बरे मराठीला उर्जितावस्था आणेल? एकिकडे मराठी भाषेच्या इमारती बघा व दुसरी
कडे कान्व्हेंट शाळा बघा. मुलांना मराठी शाळेत प्रवेश देण्याविषयी
पालकांमध्ये अनुत्साह दिसून येत आहे. त्यांना इंग्रजी माध्यमांच्या
शाळांचा ओढा, आकर्षण वाटू लागले आहे. हे
कोणी करून दिले तर आपणच! मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असताना
फक्त सरकारच्या नाकर्तेपणामुळे पालक आपल्याला पाल्याला इंग्रजी शाळेत घालत आहेत. आपल्याच मुलाला नावे ठेवल्यावर आणि
त्याला पोषण आहार न देता , कुपोषित ठेवल्यावर कोणी आपला मुलगा
अंगात जीवदेखील नसलेल्या मराठी शाळेत कोणी घालेल का? खासगी शाळांमधला
शिक्षक सुटाबुटात दिसते. त्याला खायला अन्न नसले तरी तो बेडकासारखा
फुगलेला दिसतो. बारावी,पदवीधरचे शिक्षण
घेतलेले युवक तिथे शिक्षक म्हणून काम करतात. पाच-दहा हजारात काम करतात. तिथला डामडौल तेवढा इथल्या पालकांना
आकर्षित करतो. पण त्यामुळे पालक,विद्यार्थी
त्यात फसतात. पण कोणी सांगत नाही तिथली परिस्थिती! आपण खड्ड्यात पडलोय तर दुसर्यालाही त्यात पाडायचे,
असा आपला पाय ओढायचा आपला धर्म! यातून आपण कधी
बोध घेणार? कधी मराठीचा अभिमान बाळगून तिच्या उद्धारासाठी झटणार?
असेच चालू राहिले तर मराठीला वैभवशाली दिवस कधी पाहायला मिळणार?
खरे तर मराठी शाळेत प्रवेश देण्याविषयी
उत्साहाविषयी पोषक वातावरणाची निर्मिती करणे हे तर शिक्षण मंत्र्यानी करायला हवे.
इंग्रजीला जवळ घेताना मराठीला झिडकारून चालत नाही. माय मरो आणि मावशी उरो, असाच काहीसा प्रकार सुरू आहे.
हे कुठे तरी थांबायला हवे. आईचा अभिमान,गर्व कुठे दिसूनच येत नाही. मराठी लेखक आणि मराठी पुस्तकांची
मोठी परवड सुरू आहे. मराठी लेखकाची पुस्तके प्रकाशित होत नाही.
सरस्वतीपुजकाकडे लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे
त्यांची अवहेलना होत आहे. त्यांना प्रतिष्ठा नाही. त्यांना मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर मराठी लेखकांची पुस्तके प्रकाशित
होण्यासाठी प्रकाशनाकडून व शासनाकळून प्रोत्साहन मिळायला हवे. खेड्यापाड्यात मराठी बोलली जाते, पण सीमेजवळची गावे भ्रमित
असतात. या गावांमध्ये दोन्ही भाषांची सरमिसळ होऊन नवीनच भाषा
तयार झाली आहे. वास्तविक इथे फार मोठी कामगिरी शासनाला करायला
हवी आहे. इथे मराठी टिकली,जोपासली पाहिजे,
यासाठी विशेष प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. कन्नड,
तेलगू, हिंदी या भाषा बंगरुळु, तेलंगाना, छत्तीसगड, मध्यप्रदेश
या राज्यांच्या सीमेजवळच्या गावात प्रभावित आहेत. तेथील ग्रामस्थांना
मराठी भाषेच्या प्रभावात आणने हे महत्त्वाचे कार्य आहे.
मराठी वाचन संस्कृतीला खीळ बसलेली
आहे याचे कारण ’गाव तिथे ग्रंथालय’ या जुन्या
घोषवाक्याची अंमलबजावणी झालेली नाही. बरेचशी गावे आहेत तिथे ग्रंथालय
नाहीत. तुटपुंजे अनूदान, ग्रंथालय सेवकांना
वेतन न मिळने,नवीन ग्रंथालयांना मान्यता न मिळणे, दर्जात्मक सुविधांचा अभाव, संगणकीकरणांचा अभाव,
इत्यादी कारणे असू शकतात. त्यामुळे वाचन संस्कृती
वृद्धींगत होत नाही. काही ग्रामीण भागातील वाचनालये किंवा ग्रंथालये
अनुदान लाटण्या इतपतच उरली आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठी धड नाही,धड इंग्रजी धड नाही, अशी पिढी उदयास येऊ लागली आहे.
याच्याकडून कोणती अपेक्षा ठेवायची असा प्रश्न
आहे.
अडाणी पालकांना इंग्रजीचे आकर्षण
वाढू लागले आहे. मोबाईल खेळणारी आजची पिढी त्याच्यावर इंग्रजी
शिकतेय, असा भ्रम पालकांचा झाला आहे. त्यामुळे
पालकही मुलांना महागडा स्मार्ट फोन देऊ लागला आहे. पण त्या मोबाईलमुळे
मुला-मुलींची आजची अवस्था फारच चिंताजनक झाली आहे. मोबाईलचा वापर आता अभ्यासासाठी नाही तर घरातून पळून जायसाठी होऊ लागला आहे.
शिक्षण अर्धवट झालेल्या पालकांची अवस्था फारच बिकट झाली आहे.
मातृभाषेतून मुलांचे करिअर होत नाही. या चुकींच्या
संभ्रमात पाल्यांचा लोढा इग्रंजी शिक्षणाकडे धाव घेत आहे. एखाद्या
झोपडीत राहणारा मुलगा आई-वडिलांशी ’गुड
मॉर्निंग’, ’हाऊ आर यू ’ असे बोलायला लागला
तर त्या पालकांना खूप धन्यता वाटते. माझे मूल खूप प्रगती करताहे,
असे वाटते. इंग्रजी भाषा शिकायला हवी यांत वाद
नाही परंतु इंग्रजी संस्कृती ही आंगणातून स्वयंपाक खोलीपर्यंत न यावी याची दक्षता घेतली
गेली पाहिजे.
मातृभाषेतून प्रगती शक्य आहे हा
विचार मनाला पटतो पण भावनेला पटत नाही, अशी काहीशी अवस्था आपल्या
लोकांची झाली आहे. चीन आणि जापानसारख्या देशांनी मातृभाषेत साहित्य
निर्माण केले. त्यांना ज्ञानभाषेचा दर्जा दिला भगवतगीता सारखा
पवित्र ग्रंथ त्यांनी त्याच्या भाषेत केला. आज इंग्रजीत भगवतगीता,
दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे
ग्रंथ आहेत. आपल्याला मराठीतून सहज उपलब्ध असून आपण ते ग्रंथ
वाचत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळो अथवा न मिळो,
ती ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मी माझी स्वाक्षरी मराठीत करील अशी इच्छा अंमलात आणायला हवी. मराठीत रोज थोडे थोडे वाचत आणि लिहित जाईन, असा निश्चय करायला हवा. प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठी भाषेकरीता
वैयक्तीक जबाबदारीने पुढे आल्यास मराठीला सुवर्ण दिवस येतील यात शंका नाही.
No comments:
Post a Comment