Saturday, February 24, 2018

होळी उत्सव


     होळी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: उत्तर भारतात या सणाचे प्रस्थ जास्त आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरे नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होलिकोत्सव,धुलिकोत्सव, रंगोत्सव, शिमगा,दोलायात्रा,कामदहन अशी काही नावे या सणाला आहेत. होळी नंतर दुसर्यादिवशी धुलवड साजरी केली जाते. काही ठिकाणी रंगोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळीनंतर पाचव्यादिवशी रंगपंचमी साजरी केली जातेहा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. या काळात शेतातली कामे उरकलेली असतात. धनधान्य विकून हातात पैसा आलेला असतो. लोक आनंदात असतातहोळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यात सगलीकडेच मोठया आनंद आणि उत्साहाने साजरा करतात. होळी आली की होळीसाठी लाकडे गोवर्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात, टिमकी वाजवत गाणं गात होळीसाठी लोकांकडून मदत मागतात. ’होळी रे होळी पुरणाची पोळीकिंवाहोळीला गोवर्या पाच पाच. डोक्यावर नाच नाच.’ या दिवशी लाकडं-गोवर्या गोळा केल्या जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती ही गोळा केलेली लाकडं-गोवर्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि सर्मपण शिकवते.

     या होळी बद्दल अनेक लोककथा प्रचलीत आहेत. कोकणात ह्या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी की, एकदा काय झालं, एका गावांत एक राक्षसीण आली. ती गावांतल्या लहान मुलांची हत्या करू लागली. गावावरच्या ह्या संकटावर काय उपाय करायचा म्हणून सारा गाव एकत्र जमला. त्यांनी काय केले गावाच्या वेशीवर आणि प्रत्येक घराच्या अंगणांत होळ्या पेटवल्या. सार्या  गावांत होळ्या पेटलेल्या पाहताच ती राक्षसीण जरा घाबरलीच तरीही ती पुढे पुढे येऊ लागली. मग लोकांनी नाचायला, बोंबा मारायला, वाद्य वाजवायला, त्या राक्षसीणीला शिव्या द्यायला सुरवात केली. लोक तिच्या भोवती कोंडाळे करून नाचू लागले. तो आवाज , तो दारादारांतला अग्नी, तो लोकांचा राग, त्यांचे बोंबा मारणे हे सर्व पाहून ती राक्षसीण घाबरली तिने त्या गावातून काढता पाय घेतला. राक्षसीण गावातून जाताच लोक त्याच होळी भोवती आनंदाने नाचू लागले. गावाचे संकट दूर करणार्या त्या अग्नी देवतेचे सर्वांनी पूजन केले. तिला गोडाचा नैवेद्य दाखवला. तेव्हापासून कोणत्याही दुष्ट असुरी शक्तीने गावांत, घरांत इतकांच नव्हे तर माणसाच्या मनांत ही प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा रूढ झाली.
     खरे म्हणजे होळीच्या दुसर्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला लावायची, ती कां? तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा सहन व्हावा ह्यासाठी. पण हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचे या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. आपण ही जे चांगल आहे तेच घ्यायला हवं.पण आपल्या देशात सण आणि उत्सवांचे विडंबन सुरू आहे. त्याच्या नावावर हिडीस प्रकार सुरू आहे. तसा या सणातही सुरू झाला आहे. होळीनंतर दुसर्यादिवशी धुलवड साजरी केली जाते,पण यादिवशी दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. मटणाच्या पार्ट्या केल्या जातात.
     वास्तविक खरी होळी केली ती आपल्या देश भक्तांनी, विलायती वस्तूंची होळी करून परकीय सत्ता उलथून लावली. घरादाराची प्रसंगी प्राणांची होळी करून राष्ट्रभक्त, देशभक्त ह्यांनी स्वातंत्र्य मिळवले. दुष्ट वासना, दुष्ट कल्पना, अविचारांची होळी करा. मनोमन प्रेम आदर ऐक्य जागवा, ते जपा आणि वाढवा, ही होळीची शिकवण विसरून चालणार नाही.
 होळीमागचे शास्त्र
     आपण साजरा करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसर्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. दुसर्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला सर्मपित करण्याचीही प्रथा आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदनाचा सण असतो. एकमेकांना गुलाल लावत रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करून शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.
 जावयाची धिंड काढणारे गाव
     जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयालासन्मानपूर्वकगाढवावरून मिरवले जाते. ही परंपरा 75 वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माच्या जावयांची याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. आजघडीला गावात जावयांची संख्या शंभराच्या पुढे आहे, तरी धुलिवंदनाची चाहूल लागताच गदर्भ धिंडीच्या धसक्याने जावई भूमिगत होतात. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत एका जावयाला पकडून परंपरा कायम राखण्यात येथील युवक आतापर्यंत यशस्वी राहिले आहेत. दरवर्षी गदर्भ धिंडीचा मानकरी कोण ठरतो याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. विडा हे गाव जहागीरदाराचे गाव म्हणून ओळखले जाते. पंच्चाहत्तर वर्षांपूर्वी तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयांची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून धिंड काढण्यात आली होती. तेव्हापासून जावई धिंड ही गावाची परंपराच होऊन गेली आहे. गावातीलच मुलींशी विवाह केलेले गावजावई, काही घरजावई तर व्यवसायानिमित्त विडातच तळ ठोकून बसलेले जावई अशा एकूण जावयांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे.

No comments:

Post a Comment