Thursday, February 1, 2018

मुलांना बचतीची सवय लावा


      आजच्या महागाईच्या जमान्यात बचतीला पर्याय नाही. पैसा वाचवण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फंडे असतात. आयुष्यात आलेल्या अडचणींमधून आपल्याला बचतीचं महत्त्व कळलेलं असतं. पण, बचतीची ही सवय मुलांनाही लावता येईल का, याचा विचार करायाला हवा आहे. ही सवय त्याच्या भावी आयुष्यासाठी महत्त्वाची आहे. अलिकडे  आई-बाबा दोघेही कमावते असल्याची अनेक उदाहरणे आहेत,त्यामुळे आजच्या मुलांना भरपूर पॉकेटमनी मिळतो. हा सगळा पॉकेटमनी उधळण्यापेक्षा मुलांना त्यातल्या थोड्या पैशांची बचत करण्याची सवय लावा. त्यांना याचा फायदा भविष्यात होईल. असे काही सोपे उपाय आहेत ज्यामुळे मुलांना बचतीची सवय लागू शकेल.

पिगी बँक भेट द्या : आजच्या जमान्यात पिगी बँक हा प्रकार तसा जुना झालाय. पण, मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी एखादी पिगी बँक भेट द्या. या बचतीतून त्यांना हवी ती वस्तू कशी घेता येईल आणि यातून कसा आनंद मिळेल, हे समजावून सांगा. सुरुवातीला तुम्हीच बचतीचे पैसे द्या. बचतीची गोडी लागली की मुलं स्वत:च पॉकेटमनी वाचवतील.
 तुमचा आदर्श ठेवा : मुलं कायम आपल्या आई-वडिलांचा आदर्श ठेवतात. त्यामुळे तुमच्या कृतीतून त्यांना बचतीचे धडे द्या. तुम्हीही बचत करताय हे त्यांना दिसू द्या. आपली बचत कधी आणि कुठे वापरायची याची माहितीही देत राहा.
गोष्टी सांगा : मुलांना गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे त्यांना बचतीचे धडे देणार्‍या गोष्टी सांगा. पंचतंत्र किंवा इतर बोधकथांमधून मुलांना बचतीचे महत्त्व कळू शकेल.
बचत खातं उघडा : कळत्या वयातल्या मुलांचं बचत खातं उघडता येईल. खातं उघडल्यावर मुलांना बँकेत घेऊन जा. त्यांनाच पैसे भरायला सांगा. पासबुक, चेकबुक याची माहती द्या. मुलांना हे फारच आवडेल. त्यांना बँकेच्या कामकाजाचीही माहिती होईल.
मुलांचं कौतुक करा : केलेल्या बचतीबद्दल मुलांचं कौतुक करा. त्यांना छानशी भेटही देता येईल. यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल. बचतीची रक्कम महत्त्वाची नाही तर मुलांना बचतीची सवय लागणं जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा.


No comments:

Post a Comment