Monday, February 5, 2018

फोटोग्राफीतील कारकीर्द


     आपले जग निसर्गसौंदर्याने भरलेले आहे. जगात अनेक संस्कृती नांदत आहेत. प्रत्येकाच्या प्रथा-परंपरा वेगळ्या आहेत. ठिकठिकाणी फिरून या गोष्टी कॅमेर्‍यात टिपणे म्हणजे 'ट्रॅव्हल फोटोग्राफी'. जगभरात फिरून ट्रॅव्हल फोटोग्राफर अनेक गोष्टी आपल्या कॅमेर्‍यात बंदीस्त करतो. व्यावसायिक किंवा प्रायोगिक अशा दोन्ही पद्धतींनी तुम्ही फोटोग्राफी करू शकता. 

@ या क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी फिरण्यासोबतच फोटोग्राफीची आवड असावी लागते. या क्षेत्राशी संबंधित माहिती असणेही गरजेचे असते. फोटोंच्या माध्यमातून एखादे ठिकाण रसिकांपुढे जिवंत करण्याची कला तुम्हाला अवगत असायला हवी. कल्पकता आणि सौंदर्यदृष्टीही असायला हवी. या क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे तुमचे वेगळेपण तुम्ही सिद्ध करायला हवे. इतरांपेक्षा वेगळे काय करता येईल, याचा सतत विचार करत राहायला हवा. तरच संधीची कवाडे तुमच्यासाठी खुली होतील.
@ ट्रॅव्हल फोटोग्राफीमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्याकडे डिजिटल कॅमेरा असायला हवा. यासोबत प्रकाशाचा खेळ तुम्हाला समजून घेता आला पाहिजे. स्वत:चा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. एखादी वेबसाईट असल्यास त्याचाही फायदा होईल. विविध ठिकाणची संस्कृती, प्रथा,परंपरा यांची माहिती असणेही ट्रॅव्हल फोटोग्राफी करताना उपयुक्त ठरू शकते.
@ बारावी किंवा पदवीनंतर तुम्ही फोटोग्राफीचा कोर्स करू शकता. विविध संस्थांमध्ये फोटोग्राफी आणि ट्रॅव्हल फोटोग्राफीचे अभ्यासक्रम शिकविले जातात. ऑनलाईन सर्च करूनही फोटोग्राफीतले बारकावे जाणून घेऊ शकता.
@ मॅगझिन, ट्रॅव्हल वेबसाईट्स, टूर्स आयोजित करणार्‍या कंपन्या, ट्रॅव्हल पोर्टल्स अशा अनेक ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल फोटोग्राफर म्हणून काम करू शकता. पुरेशा अनुभवानंतर तुम्ही फ्री लान्सिंगही करू शकता. नॅशनल जिओग्राफी, आउटलूक ट्रॅव्हलर्समध्येही तज्ज्ञ फोटोग्राफर्सना कायम मागणी असते. पर्यटनाबाबत लोकांमध्ये जागरूकता फार वाढली आहे. यामुळे ट्रॅव्हल फोटोग्राफीलाही आता बरीच मागणी असते. तुमच्यात लेखन कौशल्य असेल तर फोटोग्राफीसोबत तुम्ही थोडेफार लिखाणही करू शकता.
@ उत्कल विद्यापीठ भुवनेश्‍वर, पुणे विद्यापीठ, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ फोटोग्राफी, फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे या संस्था फोटोग्राफीविषयक अभ्यासक्रम शिकवतात .


No comments:

Post a Comment