Wednesday, February 7, 2018

(बालकथा) घ्यायला नाही,द्यायला लागले


     एक व्यापारी गावाकडून शहराकडे निघाला होता.वाटेत त्याला त्याच्याच गावातला एक शेतकरी भेटला.व्यापारी त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,"अरे सीताराम,कुठे निघालास?"
"तुम्हाला तर ठाऊकच असेल की, माझ्याजवळ एकच बैल आहे. आता पेरणी जवळ आलीय.म्हटले,शहरात जाऊन एक हजार रुपयांचा एक  बैल आणावा." शेतकऱ्याने आपल्या मनातले सांगितले.
"बरं झालं, मी पण शहरातच चाललोय. गप्पा मारत जाऊ. वाट लवकर सरेल."व्यापारी सांगू लागला.
दोघे सोबत चालू लागले.व्यापारी मनातल्या मनात विचार करू लागला, काय करावं म्हणजे याचे हजार रुपये माझे होतील. थोडा वेळ चालल्यावर व्यापारी म्हणाला,"अरे सीताराम, अजून शहर लांब आहे. वेळ जाण्यासाठी आपण एकमेकांना गोष्ट सांगू. पण यासाठी  एक अट ठेवू.ज्याला कुणाला  पहिल्यांदा गोष्टीवर संशय येईल किंवा जो कोणी म्हणेल, असे होऊ शकत नाही,त्याला हजार रुपये द्यावे लागतील."
"ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदा गोष्ट सांगा." सीताराम 

व्यापारी गोष्ट सांगू लागला." एके दिवशी माझ्या मित्राने-गोपाळने मला प्रवासाला येण्याचे निमंत्रण दिले. त्याच्याजवळ हत्ती,घोडं, उंटं,गाढवं सगळी जनावरं होती. आम्हाला वाळवंटातून जायचे होते. त्यामुळे आम्हाला हत्ती घेणे सोयीस्कर वाटले. आम्ही दीडशे हत्ती घेतले. वाटेत एक मोठी विचित्र घटना घडली. अचानक आकाशात हत्तीपेक्षा  एक मोठा पक्षी उडत उडत आला आणि पुढच्या हत्तीवर झडप घालून  त्याला उचलू लागला. तुला  संशय तर येत  नाही ना? " व्यापाऱ्याने गोष्ट थांबवून शेतकऱ्याला विचारले.
"छे छे! त्याच्याहीपेक्षा मोठमोठे पक्षी आकाशात असतात.माझी आजी गोष्टी ऐकवताना सांगायची." शेतकरी म्हणाला.
"पण झालं होतं असं की, आम्ही सगळे हत्ती एका  साखळदंडानी एकमेकांना बांधले होते, त्यामुळे या पक्षाने एका हत्तीला उचलले,तसे त्याच्यामागे सगळे हत्ती उचलले गेले. आम्ही दोघे त्या हत्तींच्या मागे धावत सुटलो. काय, मी सांगतोय ते  बरोबर ना?"
"हो हो, अगदी बरोबर! तुमचे हत्ती हवेत उडत होते,तेव्हा तुम्हाला त्यांच्या मागे धावावेच लागणार होते" शेतकरी म्हणाला.
पळता पळता आमचा अख्खा एक दिवस गेला.दुसऱ्यादिवशी संध्याकाळी कसे कोण जाणे,पण हत्ती त्या पक्षाच्या तोंडातून निसटला. आणि मग सगळे हत्ती खाली येऊ लागले." व्यापारी एवढे बोलून गप्प झाला.
" हत्ती खाली पडून मेले  का? "शेतकऱ्याने काळजीच्या स्वरात विचारले.
"छे छे! आता तर मोठी नवलाची गोष्ट आहे. ते खाली पडले नाहीत.एक मुलगी तिच्या घराच्या गच्चीवर उभी  राहून ते सगळे पाहात होती. तिचे तोंड उघडे होते. त्यामु़ळे तो पहिला हत्ती तिच्या तोंडात जाऊन पडला.मग काय बघता बघता सगळे हत्ती तिच्या तोंडात जाऊन सामावले. ते तिच्या पोटात गेले आणि  धुमाकूळ घालू लागले. बिचाऱ्या मुलीचा वडील डॉक्टर होता. त्याने ऑपरेशन करून सगळे हत्ती बाहेर काढले आणि एका पिंजऱ्यात डांबून ठेवले. बरोबर ना?" व्यापारी म्हणाला.
"अगदी बरोबर! पुढे काय झालं?" शेतकरी म्हणाला.
"पुढं काय! झाली ना गोष्ट?" चिढून व्यापारी म्हणाला.व्यापाऱ्याने त्याची गोष्ट संपवली आणि म्हणाला, " आता तुझी गोष्ट सांग." 
आता शेतकरी गोष्ट सांगू लागला." माझ्या वडिलांजवळ पुष्कळ संपत्ती होती, पण ते काहीच काम करत नव्हते.
 एक दिवस सगळी संपत्ती संपली. मग ते शेती करू लागले. पण त्या वर्षी एक थेंबदेखील पाऊस झाला नाही. सगळे पीक वाळून-करपून गेले. फक्त कल्लूशेठच्या शेतात तेवढी हिरवळ होती."
"असं का!मग पुढे काय झालं ?" व्यापारी हसत हसत  म्हणाला. 
" माझ्या वडिलांनी एक एक करत सगळी जनावरं विकून टाकली. पण एक गाढव मात्र अजून त्यांच्याकडे होते. आता माझे वडील कल्लूशेठ यांच्याकडे गाढवावर धान्यांची पोती वाहून नेण्याचे काम करू लागले. एक दिवस गाढव घसरून पडले, त्याच्या पाठीत  माती बसली. "
"खरंच कमाल आहे! पुढे काय झाले?" व्यापारी खोटी उत्सुकता दाखवत म्हणाला.
"एके दिवशी पोत्यातले गव्हाचे  दाणे गाढवाच्या पाठीवर असलेल्या मातीवर पडले. काही दिवसांतच त्यातून अंकूर बाहेर आले. आणि बघता बघता त्याच्या पाठीवर  अख्खे शेत उगवले."
"पाठीवर माती होती म्हटल्यावर,त्यावर शेत उगवणारच!पुढे काय झालं?" व्यापाऱ्याने विचारले.
" काही मजूर लावून वडिलांनी पीक काढले. ते पुन्हा मोठे शेठ बनले. आता गावात फक्त दोघेच श्रीमंत होते.  या श्रीमंत व्यक्तींकडे भरपूर धनधान्य  होते. गावात दुष्काळ पडला होता. भुकेने माणसे तडफडत होती. जीव सोडत होती. त्यात तुझे वडीलसुद्धा होते.त्यावेळेला तू फार लहान होतास. तुझे वडील कल्लूशेठकडे धान्य उधार मागायला गेले,कल्लूशेठने त्यांना धक्के मारून  हाकलून लावले." 
व्यापाऱ्याला आपल्या वडिलांचा केलेला अपमान ऐकून भयंकर संताप आला.मात्र  त्याला अट आठवल्याने त्याने तो  संताप गिळला. त्याने विचारले, " पुढे काय झाले?"
"पुढे काय व्हायचे? तुझे  वडील माझ्या वडिलांकडे आले  आणि म्हणू लागले की, मालक माझ्या मुलांना वाचवा.ते भुकेने फार व्याकूळ आहेत."  यावर माझे वडील म्हणाले की, बोल, गव्हाची किती पोती देऊ? तुला यावर काही संशय तर येत नाही ना?" 
व्यापाऱ्याचा त्याच्या वडिलांच्या अपमानाने अगदी तीळपापड झाला होता,पण अट ऐकून गप राहावं लागलं.  व्यापाऱ्याने  विचारले,"नाही,पुढे काय झाले?" 
शेतकरी पुन्हा गोष्ट सांगू लागला," तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांकडून 25 पोती गव्हू नेले. त्यांनी त्यांच्या  आयुष्यात कधी  गहू परत करू शकले नाहीत. आता तुमच्याकडूनच अपेक्षा आहे, तुम्ही तुमच्या वडिलांचे कर्ज चूकते करून त्यांच्या  आत्म्याला मुक्ती द्याल."
व्यापारी विचित्र कोड्यात सापडला. तो विचार करू लागला की, जर आपण असे होऊ शकत नाही म्हटले तर आपल्याला अटीनुसार एक हजार रुपये द्यावे लागतील. आणि असे घडले आहे म्हटले तर आपल्याला 25 गहू  पोती द्यावे लागतील. व्यापारी हिशोब करू लागला, शेवटी पोत्यांचे पंच्यात्तर रुपये होत होते. अशा प्रकारे त्याचे 25 रुपये वाचणार होते. आपला पराभव मान्य  त्याने 25 पोती गहू देण्याचे कबूल केले. आपल्याच जाळ्यात अडकून व्यापारी आपल्याच तोंडावर आपटला. पुन्हा म्हणून कधी तो  व्यापारी सीतारामच्या वाटेला लागला नाही.

No comments:

Post a Comment