सध्याचे युग माहिती
तंत्रज्ञानाचे असल्याने संगणक साक्षरतेचे प्रमाण वाढत चालले आहे
. अलिकडच्या काळात काही जुन्या काळातील
लोक सोडले तर बहुतांश लोक संगणक साक्षर झाले आहेत. त्यामुळे केंद्र
आणि राज्य सरकारने काही सरकारी योजना ऑनलाइन सुरू केल्या आहेत. याचा लाभ लोक घरबसल्या घेत आहेत. राज्य सरकारच्या मुद्रांक
व नोंदणी महानिरीक्षक विभागाने सहा महिन्यापूर्वी विवाह नोंदणी ऑनलाइन करण्याचा निर्णय
घेतला आहे. यामागे नवविवाहितांचा वेळ,पैसा
आणि श्रम वाचावेत, हा हेतू आहे. कारण,
नोंदणी कार्यालयांमध्ये येऊन नोंदणी करणारी बहुतांश जोडपी मध्यस्थांची
(दलाल) मदत घेताना आढळून येत आहेत. ही मध्यस्थ मंडळी या नवविवाहित जोडप्यांकडून मोठा मोबदला घेताना दिसतात.
मात्र प्रत्यक्षात विवाह नोंदणी शुल्क नाममात्र आहे. विवाह नोंदणी अर्ज आणि त्याचे नाममात्र शुल्क ऑनलाइन भरण्याची व्यवस्था करण्यात
आली आहे. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
त्यामुळे नोंदणी कार्यालायात जाऊन विवाह नोंदणी करणार्या जोडप्यांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.याचा अर्थ ऑनलाइन विवाह नोंदणीबाबत जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.
त्यामुळे यासाठी तालुका,गाव स्तरावर याबाबत जनजागृती
मोहिम उघडण्याची आवश्यकता आहे.शासनाने तलाठी,ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,
आशा वर्कर्स आणि आरोग्य केंद्र सेविका यांच्यामाध्यमातून ऑनलाइन विवाह
नोंदणीचा प्रसार गावोगावी आणि घरोघरी करायला हवा. संगणक युगात
त्याचा वापर वाढला पाहिजे. कारण त्याच्या वापरामुळे लोकांचा वेळ,
पैसा आणि श्रम निश्चित वाचणार आहे.
No comments:
Post a Comment