Saturday, February 3, 2018

(बालकथा) दवाने भरलेला तलाव


     होळी काही दिवसांवर येऊन ठेपली होती. तेनालीराम काही दिवसांच्या सुट्टीवर गेला होता. ही संधी साधून दरबारी मंडळींनी राजा कृष्णदेवरायला विनंती केली,"महाराज, या खेपेला होळीचे औचित्य साधून मूर्ख संमेलन घेण्यात यावे. राज्यातल्या सर्वात मोठ्या मूर्खाला 'मूर्खराज' ची उपाधी देऊन गौरव करण्यात यावा."
राजाने त्यांची गोष्ट मान्य केली. मंत्र्याला राजा  म्हणाला ,"जा आणि सर्वात मोठ्या मूर्खाचा शोध घ्या." मंत्री महामूर्खाच्या शोधाला  निघाला. तो मूर्खासारख्या वागणाऱ्या माणसांची नावे रजिस्टरमध्ये नोंद करायचा. शिवाय त्यांना मूर्ख संमेलनाला  येण्याचे आमंत्रण द्यायचा.
एक दिवस रानातून जात असताना मंत्र्याला एक म्हातारा माणूस भेटला .पानांवर पडलेले दव तो आपल्या ओंजळीत घेऊन तलावात टाकत होता.मंत्र्याने विचारल्यावर तो म्हणाला,"दवांनी तलाव भरणार आहे आणि हे पाणी पिकासाठी सिंचणार आहे."
"सापडला,राज्यातला सर्वात महामूर्ख सापडला." मंत्र्याने विचार केला.म्हातारयाने आपले नाव सांगितले,बाळू. मंत्र्याने लगेच त्याचे नाव मूर्खांच्या यादीत सगळ्यात वरती टिपून घेतले. मंत्री जाताना त्याला म्हणाला,"बाळू,मूर्ख संमेलनाला नक्की यायचं बरं का!"
ठरलेल्या दिवशी मूर्ख संमेलनाला सुरुवात झाली.राजा,दरबारी सर्व आले,पण ज्या माणसाला महामूर्खचा किताब द्यायचा होता,तो मात्र कुठे दिसत नव्हता. राजा कृष्णदेवराय मंत्रीजींना म्हणाले,"कुठे गेला तो महामूर्ख?त्याला लवकर शोधून आणा."
मंत्री काळजीत पडला. कुठून शोधून आणू त्याला? त्यांनी त्याचे फक्त नावच लिहून घेतले होते. कुठे राहतो,काय करतो, काहीच पत्ता नव्हता. तेवढ्यात तो म्हातारा तिकडे लांब दृष्टीस पडला. मंत्र्याचा आनंद गगनात मावेना. त्याने लगेच महाराजांना कळवले. म्हणाला,"महाराज, हाच तो महामूर्ख!"
म्हातारा हसून म्हणाला,"महाराज, मंत्रीजीच माझ्यापेक्षा मोठे मूर्ख आहेत.महामूर्ख हा किताब त्यांनाच मिळायला हवा.त्यांनी माझे नाव मूर्खांच्या यादीत सर्वात वरती लिहिले,पण माझा ठावठिकाणा काही विचारलाच नाही.जर मी आलो नसतो,तर त्यांनी मला कुठे शोधलं असतं?"
असे म्हणत त्या म्हातारयाने आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा उतरवला.समोर तेणालीरामला पाहून राजाच्या चेहऱ्यावर हसू फुटले. मंत्र्याची अवस्था मोठी पाहण्यासारखी झाली होती.

No comments:

Post a Comment