शिवनेरीचा प्राचीन किल्ला
जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १0५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे१९0९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
१९ फेब्रुवारी १६३0 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
शिवनेरी गडावर झाला होता. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला
जिंकण्यासाठी कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व
जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या
पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमध्ये प्रवेशकरताच
शिवनेरीचे दर्शन घडते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील
डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात,
या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री
असल्याचा उल्लेखकेला होता.
जीर्णनगर, जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून
प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी हो'१. सातवाहन
राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर
आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून
फार मोठय़ा प्रमाणात वाहतूक चालत होती. त्यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील
दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे
अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली. सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या
राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७0 ते १३0८च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. याच काळात शिवनेरीला
गडाचे स्वरूप प्राप्त झाले. १४४३ मध्ये मलिकझ्र उलझ्रतुजार याने यादवांचा पराभव
करून किल्ला सर केला. हा किल्ला बहमनी राजवटीखाली आला. १४७0
मध्ये मलिकचा प्रतिनिधी मलिक महंमदने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये
त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. १४९३ मध्ये येथील
राजधानी गडावरून अहमदनगरला हलविली. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ
कासिमला या गडावर कैदेत ठेवले होते. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी
राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये
जिजाई गर्भवती असताना शहाजीने त्यांना ५00 स्वार
त्यांच्यासोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस
जिजाऊने नवस केला, जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव
ठेवीन. त्यानंतर शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य
तृतियेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजांचा जन्म
झाला. तारीख होती १९ फेब्रुवारी १६३0.
१६३२ मध्ये जिजाईंनी
शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५0 मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय
झाला होता. कोळी चौथरा : शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला
खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग
होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून
जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही
पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित
याचा फायदा घेऊन महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा.
मोगलांनी यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक
भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या
सैन्याने बलाढय़ मोगलांपुढे नांगी टाकली. १५00 महादेव
कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका
चौथर्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या
चौथर्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथर्यावर एक घुमटी बांधली गेली व
त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत.
साखळीची वाट : या वाटेने गडावर
यायचे झाल्यास जुन्नरमध्ये प्रवेश केल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने
शिवाजीच्या पुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्या
रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर
लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका
कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्यांच्या
सहाय्याने वर पोहचता येते.
सात दरवाज्यांची वाट :
शिवाजीच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता
आपणास गडाच्या पायर्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे
लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा
कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
No comments:
Post a Comment