आनंदवनात एक अस्वल होते. नाव
होते मिकू. काही दिवसांवर त्याच्या मुलाचा-सोनूचा वाढदिवस होता.वाढदिवसाला
तो सोणूला काही खास भेटवस्तू देणार होता.
त्याने ठरवले, जवळच्या शहरात जाऊन खास भेटवस्तू आणायची. रात्रीच्यावेळी तो
शहरात गेला आणि एका घरासमोर ठेवलेली सायकल उचलून घेऊन आला.
वाटेत त्याने सायकल न्याहळी,म्हणाला,"अरे व्वा! काय मस्त सायकल
आहे. सोनू अगदी खूश होऊन जाईल." मिकू अगदी आनंदात सायकल घेऊन वनात आला.
वाढदिवसाला सायकल पाहून सोनू
जाम खूष झाला. तो दिवसभर सायकल चालवायचा आणि दुसऱ्या प्राण्यांना चिढवायचा.
जंगलातल्या कोणत्याही प्राण्याने यापूर्वी कधी सायकल पाहिली नव्हती.
एके दिवशी हत्तीकाका मिकूला
म्हणाला,"मिकू, ही
सायकल माणसांची आहे.तुला याच्यामुळे तुला जखम वगैरे होईल किंवा एकाद्या संकटात
सापडशील."
"काका,मला
सायकल छानपैकी चालवायला येते. मी कधी पडणार नाही आणि कुठल्या संकटातही सापडणार
नाही."मिकू म्हणाला.
मिकूने चांगल्या प्रकारे सायकल
शिकून घेतली होती. यासाठी त्याने खूप सराव केला होता. तो सोनूला मागे बसवायचा आणि
जंगलातून फेरफटका मारायचा.डबलसीट सायकल चालवण्यातही तो मोठा पारंगत झाला होता.
एके दिवशी जंगलात शिकारी
घुसले.त्यांची दृष्टी मिकूवर पडली.
"अरे,तो बघ.
सायकल चालवणारा अस्वल!"एक शिकारी म्हणाला.
"सर्कससाठी हा चांगला उपयोगाला
येईल.चला, त्याला पकडून घेऊन जाऊ. सर्कसवाल्याला विकून
आपल्याला बक्कळ पैसे मिळतील." दुसरा शिकारी म्हणाला.
शिकाऱ्यांनी मिकू आणि सोनू
दोघांनाही पकडले.त्यांच्यासोबत शहरात घेऊन गेले.
आता मिकूला हत्तीकाकाची आठवण
झाली.त्याला स्वतःची आणि सोनूची सुटका करून घ्यायची होती. पण हतबल होता. सुटका करून घ्यायला कुठे काही पर्यायच दिसत
नव्हता.
मिकू आणि सोनू दुसऱ्यादिवशी
सर्कसमध्ये होते.त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले होते. तेवढ्यात तिथे सर्कशीचा मालक
आणि त्याचा लहानगा मुलगा आले. सोनूला पाहून म्हणाला,"किती गोंडस पिल्लू आहे.पण बाबा, आपल्याला त्यांचे
स्वातंत्र्य हिरावून घेता येते का?"
मालक विचारात पडले. त्यांना
आपल्या मुलाच्या भावना कळल्या. त्यांनी त्याला आणि त्याच्या वडिलांना मुक्त
करण्याचा आदेश दिला. आता मिकूला मोठा पश्चाताप होऊ लागला.तो विचार करत होता,'माणसाच्या मुलाने आपली सुटका केली आणि त्याने माणसाच्याच कुणा
एका मुलाची सायकल चोरून आणली होती.'
जंगलात आल्यावर त्याच रात्री
त्याने ती सायकल शहरात नेली आणि ज्या घरापुढून उचलली होती,त्या घरापुढे नेऊन ठेवली. आणि आनंदात माघारी परतला.
No comments:
Post a Comment