Wednesday, February 7, 2018

(विज्ञानकथा) जुनं पुस्तक

     ऐश्वर्या तो दिवस कधीच विसरू शकणार नाही.तिला रोज दैनंदिनी लिहिण्याची सवय होती. छोट्या छोट्या घटना असो  किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी! सारं सारं लिहायची. तिने लिहिले होते-17 मे 2157. ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे.आज अनिकेतला एक पुस्तक मिळाले- कागदावर छापलेले खरं खुरचं पुस्तक.
अनिकेतने ते जुनं पुस्तक ऐश्वर्याला दाखवले होते. पुस्तकाची पानं जीर्ण होऊन पिवळी पडली होती.त्याची पानं जागोजागी फाटली होती.
ऐश्वर्या बराच उशीर ते पुस्तक आलटून-पालटून पाहत राहिली.किती विचित्र होते कागदावर छापलेले पुस्तक. यापूर्वी कधीच अशा प्रकारचे पुस्तक तिच्या पाहण्यात आले नव्हते. तिला तर एक यांत्रिक शिक्षक घरीच शिकवत होता आणि ऐश्वर्याला तो अजिबात आवडत नव्हता. ही गोष्ट तिने आपल्या आईला कितीदा तरी सांगितली होती. पण आई प्रत्येक वेळेला तिला समजावून सांगून गप बसवत होती.
तिला ते जुने पुस्तक वाचायचे होते.त्याच्याबाबतीत तिने अनिकेतला किती तरी प्रश्न विचारून भंडावून सोडले होते.तिला तिच्या आजोबांची आठवण येत होती.त्यांनी ऐश्वर्याला सांगितले होते-जुन्या काळी गोष्टी पुस्तकात छापल्या जायच्या आणि मुले शाळेत जाऊन पुस्तकातले ज्ञान मिळवायचे. तिला आजोबांकडूनदेखील शाळेविषयी जाणून घ्यायचे होते.त्यांनी जुन्या काळातल्या शाळेविषयी काही गोष्टी सांगितल्यादेखील होत्या.ऐकून ऐश्वर्या चकित झाली होती.जुना काळ आजच्यापेक्षा किती वेगळा होता.
ती अनिकेतसोबत बसल्या बसल्या पुस्तकाची पाने उलटत होती.ती विचार करत होती- कॉम्प्युटर स्क्रीनवर  शब्द उमटतात, येतात आणि जातात.पण कागदावर छापलेले शब्द एकदम स्थिर होते. ते कॉम्प्युटर स्क्रीनवर उमटणाऱ्या शब्दांसारखे हलत-डुलत  नाहीत. आणि अनिकेतने पान उलटले,तेव्हा त्याच्या पाठीमागेदेखील शब्द होते. तिने पान पुन्हा पालटले,पण पानाच्या वरच्या बाजूचे शब्द त्याच्या ठिकाणी तसेच स्थिर होते. किती विचित्र गोष्ट होती.
तिला पुस्तक पलताना पाहून अनिकेत हसला.म्हणाला- "ज्या काळातले हे पुस्तक आहे,तो काळ आपल्यापेक्षा किती तरी मागास होता. आपल्या कॉम्प्युटरमध्ये अशा प्रकारची लाखो पुस्तकं सुरक्षित आहेत. ती कितीदा तरी वाचली तरी काही बिघडत नाही.पण कागदावर छापलेले हे पुस्तक लवकरच नष्ट होऊन जाईल."
"हो, असं मात्र आहे. पण मला हे जुने पुस्तक पूर्णपणे  वाचायचे आहे. बरं ते जाऊ दे, मला सांग हे पुस्तक तुला कुठे सापडले?" ऐश्वर्याने अनिकेतला विचारले.
"आणखी कुठे सापडणार! अडगळीच्या खोलीत. तिथे अनेक जुन्या-पुराण्या वस्तू  पडल्या आहेत. जसा  त्या जुन्या वस्तूंचा उपयोग नाही,तसा कागदावर छापलेल्या पुस्तकाचाही आपल्याला काही फायदा नाही.
"हे पुस्तक तू पूर्ण वाचलं आहेस का?" तिने अनिकेतला विचारले."यात काय लिहिलं आहे?"
"यात जुन्या काळातल्या शाळांविषयी सांगितलं गेलं आहे .त्यात पुष्कळ मुले शिकत होती."
ऐश्वर्याने शाळेचे नाव ऐकताच नाक मुरडले.म्हणाली," असं शाळेविषयी काय लिहिलं जाऊ शकतं?मला तर हा शब्द ऐकायलाही नको वाटतो."
वास्तविक ऐश्वर्याला आपल्या यांत्रिक शिक्षकावर राग होता.तो एक यंत्र मानव होता आणि त्याच्या बेडरूम शेजारच्या खोलीत त्याला ठेवण्यात आले होते. ती खोली म्हणजेच तिची शाळा होती.
ऐश्वर्याची आई तिला ठराविक वेळी त्या खोलीत जायला सांगायची त्यांचे म्हणणे असे की,मुलांनी शिस्त राखून शिकले पाहिजे. ऐश्वर्याला मन नसतानाही शिकावं लागायचं. त्याला कारणही तसंच होतं, तो यंत्र शिक्षक तिला भूगोलाचे खूप कठीण प्रश्न विचारायचा.अशा प्रश्नांबद्दल  ऐश्वर्याने कधी ऐकले आणि वाचलेलेही नव्हते. यासाठी यंत्रशिक्षक तिला खूप कमी गुण द्यायचा.
ऐश्वर्याने आईला ही समस्या सांगितली.त्या  यंत्रशिक्षकाला काऊंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेल्या. इन्स्पेक्टर लाल चेहऱ्याचा गुठगुठीत असा माणूस होता. त्याच्याजवळच्या पेटीत विविध प्रकारची उपकरणं होती.इन्स्पेक्टरने त्या यंत्रशिक्षकाला पूर्णपणे खोलून टाकलं. आणि मग अगदी प्रेमाने त्याचे एक-एक भाग तपासू लागला.ज्यावेळेला इन्स्पेक्टर यंत्रशिक्षकाची दुरुस्ती करत होता,त्यावेळेला ऐश्वर्या अगदी लक्षपूर्वक पाहत होती.ती मनातल्या मनात म्हणत होती,देव करो आणि हा यंत्रशिक्षक कधीच दुरुस्त होऊ नये. त्याच्यापासून माझी सुटका होऊ दे.
पण काउंटी इन्स्पेक्टर एक मोठा चतुर इंजीनियर होता.त्याने शेवटी यंत्रशिक्षकाला दुरुस्त केले.मग ऐश्वर्याच्या आईला म्हणाला,"वहिनी, तुमच्या मुलीची तक्रार अगदी बरोबर आहे. खरे तर हा यंत्रशिक्षक भूगोलाचे जे धडे घेत होता,ते वरच्या वर्गातील मुलांसाठी आहेत.त्यामुळे ऐश्वर्याला ते समजत नव्हते. आता मी तिच्या स्तरावरचे पाठ यंत्रशिक्षकामध्ये  फिड केले आहेत. आता तिला कसलीच अडचण येणार नाही."
श्रीमती साठे यांनी इन्स्पेक्टरचे आभार मानले.पण ऐश्वर्याला काही आनंद झाला नाही.तिला तो यंत्रशिक्षकच पसंद नव्हता. परंतु,याला दुसरा पर्यायही नव्हता.
दुसऱ्यादिवशी ऐश्वर्या आणि अनिकेत भेटले.ऐश्वर्याने गेल्या दोन दिवसाच्या घटना सांगितल्या. यावर अनिकेत हसायला लागला आणि म्हणाला,"मला तर माझ्या शिक्षकाकडून तब्बल महिनाभर मोकळीक मिळाली होती.कारण त्यातले इतिहासाचे सगळेच पाठ गायब झाले होते. त्या एक महिन्यात मी खूप धमाल केली."
ऐकल्यावर ऐश्वर्याला फार काही चांगलं वाटलं नाही.ती पुन्हा जुन्या पुस्तकाविषयी विचारू लागली.अनिकेतने संपूर्ण पुस्तक वाचून काढले होते.त्याने त्याच्याविषयी आपल्या वडिलांना विचारलेही होते.त्यांनी जुन्या काळातल्या कागदावर छापलेल्या पुस्तकांविषयी आणि मुलांना शिकवणाऱ्या मानव शिक्षकांविषयी अगदी विस्तृतपणे सांगितले होते.ते सगळे त्याने ऐश्वर्याला सांगितले.
ऐश्वर्या विचार करत होती-' कशा असतील बरं जुन्या काळातल्या शाळा?'
अनिकेत सांगत होता,"पूर्वीच्या शाळा आतासारख्या नव्हत्या.आज तर प्रत्येक मुलांसाठी यंत्रशिक्षक विशेष पद्धतीने तयार करण्यात येतो.एक मूल,एक यंत्रशिक्षक.पण पूर्वी शाळा या घरापासून लांब असायच्या.तिथे शेकडो मुलं एकत्र बसून शिकत होते. आणि त्यांना मानव शिक्षक शिकवायचे."
ऐश्वर्या म्हणाली,"असं कसं होऊ शकतं? एक मानव शिक्षक यंत्रशिक्षकाशी कसा सामना करू शकतो?"
"नक्कीच करू शकतो. शिवाय त्याच्याजवळ यंत्रशिक्षकापेक्षा अधिक माहिती असू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर तुझे,माझे वडील आणि आजोबा यांचे देतात येईल. ही गोष्ट तू विसरू नकोस, यंत्रशिक्षक किंवा अन्य यंत्रे शेवटी माणसांनीच बनवली आहेत."
"घरापासून लांब शाळा,जिथे शेकडो मुले शिकत होते,त्यांना मानव शिक्षक शिक्षण देत होते. हे सगळे आज एखाद्या गोष्टीसारखे वाटत आहे. आणि आई तर म्हणायची,प्रत्येक मुलाच्या गरजेनूसार त्याला  यंत्रशिक्षकदेखील  स्वतंत्र असायला हवा."
"पण आपण तर अशा काळातील गोष्टी करत आहोत,ज्या काळात अशी पुस्तके कागदावर छापली जात होती."
"जुना जमाना." ऐश्वर्या म्हणाली.
ऐश्वर्या कल्पना करत होती की,एक मोठी इमारत, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शिकत असलेली मुले.यंत्रशिक्षकांच्या जागी मानव शिक्षक आणि वाचायला कागदावर छापलेली पुस्तके. वा!किती मज्जा येत असेल नाही! शाळेत एकत्र शिकत असलेली मुले एकत्र खेळत असतील,बागडत असतील."
तेवढ्यात आईचा आवाज आला,"अशु,शाळेची वेळ झालीय."
ऐश्वर्याचे स्वप्न तुटले. किती मजेशीर होते ते सगळे!" ती थोडी आकडूनच ओरडली,"आई, अजून वेळ झाली नाही."
"झालीय वेळ. आणि अनिकेतलादेखील त्याच्या शाळेत जाऊन शिकायला हवं." ऐश्वर्याची आई कडक स्वरात म्हणाली.
अनिकेतने पुस्तक उचलले आणि शीळ घालत निघाला.
ऐश्वर्या मन नसताना तिच्या शेजारच्या खोलीतल्या शाळेत निघून गेली.तिथे यंत्रशिक्षक तिची वाटच पाहत होता. तिने त्याच्या एका हातावर हात ठेवून बायोमेट्रीक हजेरी लावली. शनिवार आणि रविवार सोडला तर ऐश्वर्याला थराविम वेळेत शाळेत जावे लागायचे.
यंत्रशिक्षकाची स्क्रीन उजळली. त्यातून आवाज आला,"आज आपण गणिताची उदाहरणे सोडवू. कालचा गृहपाठ स्लाटमध्ये टाकून दे."
ऐश्वर्याने यंत्रशिक्षकाच्या आदेशाचे पालन केले.पण ती उदास होती.ती जुन्या काळातील शाळांचाच विचार करत होती. तिला ती शाळा  खूप भारी वाटत होती. सगळी मुलं मिळून शिकत असतील,मिळून खेळत असतील,एकाच वर्गात सगळी मुलं एकच पुस्तक अभ्यासत असतील. शिकता शिकता एकमेकांच्या खोड्या काढत असतील.शिकवायला यंत्रशिक्षक नाही. वा!किती मज्जा येत असेल मुलांना...!
तेवढ्यात तिची कल्पना भंग पावली.यंत्र शिक्षक म्हणत होता,"तर आज आपण.....!"
ऐश्वर्या मात्र उदास होती.

No comments:

Post a Comment