रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवडीवर अधिकाधिक भर द्यायला हवा. त्यामुळे
वनीकरणाचे उदिष्ट तर साध्य होतेच शिवाय सृष्टीसौंदर्याबरोबरच त्याचा अनेक
प्रकाराने उपयोग होऊ शकतो. महाराष्ट्रात आतापर्यंत एकंदर ४१३८.७५ कि. मी.
क्षेत्रावर रस्त्यांच्या दुतर्फा वनीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय वननीतीनुसार
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र
वृक्षाच्छादित असणे आवश्यक आहे. वनक्षेत्राची मर्यादा लक्षात घेता हे उद्दिष्ट
केवळ वनक्षेत्रात वृक्षलागवड करून साध्य करणे शक्य नाही. ३३ टक्के क्षेत्र
वृक्षाच्छादनाखाली आणण्यासाठी नोंदणीकृत वनांची क्षेत्र मर्यादा लक्षात घेता इतर
शासकीय मालकीच्या व खाजगी मालकीच्या क्षेत्रांवर भरीव प्रमाणात वृक्षलागवड
करण्याशिवाय पर्याय नाही. राज्यात रस्त्यांचे खूप मोठे जाळे आहे. रस्त्यांच्या
दुतर्फा मोठय़ा प्रमाणावर शासकीय मालकीची पडीक जमीन उपलब्ध होऊ शकते. या क्षेत्रात
मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड करण्यास वाव आहे. याद्वारे हे राष्ट्रीय उद्दिष्ट
साध्य करण्याच्या दृष्टीने मोठा हातभार लागेल, या भूमिकेतून सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्ता दुतर्फा लागवडीला प्राधान्य
देण्यात यावे. या वृक्षलागवडीमुळे रस्त्यांचे आयुष्यमान वाढविण्यास व सुशोभीकरणास
मदत होते. रस्त्यांच्या स्थानावर रोपांच्या प्रजाती अवलंबून असतात. शहरात मुख्यत्वे
करून शोभिवंत, सरळ वाढणार्या झाडांना पसंती दिली जाते. महामार्गावर दाट छाया देणार्या, फळे देणार्या झाडांना पसंती असायला हवी. चिंचेसारख्या फळे देणार्या
झाडांमुळे तामिळनाडूसारख्या राज्यात इतर फायद्यांबरोबर फळांपासून चांगले उत्पन्न
मिळत आहे. अर्थात रस्त्यांच्या दुतर्फा रोपवनाचे क्षेत्र सामाजिक वनीकरण विभागाच्या
मालकीचे नसल्याने व बर्याचशा प्रजाती महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ च्या
कार्यक्षेत्रात येत नसल्याने त्यांच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतूद नाही. ही बाब
विचारात घेऊन व अधिनियम १९२७ च्या कलम ८0 अ खाली अशा रोपवनांना कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रस्ताव तयार करता येईल.
आंबा, चिंच, जांभूळ,वड, पिंपळ, कॅशिया, गुलमोहर, आकाशनिंब, शिरीष, बहावा, जॉरांडा, स्पॅथोडिया, बूच, निलगिरी, सुरू, कडुनिंब, शिसू, कदंब व सावर हे वृक्ष रस्त्यांच्या दुतर्फा लागवडी करणे फायदेशीर ठरतील.
रस्त्यांच्या दुतर्फा वनीकरणाचे भरपूर क्षेत्र आहेत. रस्त्यांवरील रहदारीस, प्राणिमात्रास सावली मिळते. रस्त्याचे ऊन- पावसापासून काही प्रमाणात संरक्षण
होऊन रस्त्यांचे आयुष्यमान वाढते. रहदारीमुळे होणारे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होते. रोपवनापासून काही प्रमाणात जळाऊ लाकूड, फळे मिळतात. वातरोधक पट्टा म्हणून ही झाडे कार्य करतात. त्यामुळे रस्त्याच्या
दुतर्फा झाड लावण्यावर भर देण्यात यावा.
No comments:
Post a Comment