Monday, February 19, 2018

सरपंच गाव बदलू शकतो...


     केंद्र आणि राज्य सरकारांनी गावांवर लक्ष केंद्रित केले आहे . गावांना थेट निधी मिळत आहे. याचा फायदा गाववाल्यांनी घ्यायचा आहे. गावात राजकारण न आणता गावाचा विकास साधायला हवा. सरपंच मंडळींनी पारदर्शक कारभार करत गावाला बरोबर घेऊन काम करायला हवे. पाच वर्षांत जग बदलते; मग सरपंच म्हणून  गाव का बदलू शकत नाही, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच आहे. सरपंच म्हणून ते  केवळ मिरवणार असतील तर पाच वर्षे केव्हाच निघून जातील, परंतु सचोटीने कामे करणार असतील  तर त्यांना वेळही  पुरणार नाही. त्यामुळे त्यांनी  ठरवायला  हवे की वेळ वाया घालवायाचा की संधीचे सोने करायचे, सरपंचदेखील गाव बदलू शकतात. हे अनेक सरपंच मंडळींनी दाखवून दिले आहे. आता थेट सरपंच निवड आणि त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात आलेल्या नियमावलीचा लाभ घेऊन गावाचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

      गावाचा विकास साधताना गावातील सर्व घटकांनी सरपंचाच्या पाठीशी उभे राहणे अत्यावश्यक आहे. निम्मी शक्ती गावच्या राजकारणात जात असेल तर सरपंचाने गावचा विकास केव्हा करायचा असाही प्रश्न अनेक गावांमध्ये असतो. पण सरपंचांनी चिकाटी, प्रामाणिकपणा सोडू नये. ग्रामस्थ आपोआप तुमच्या बरोबर येतील, असे आपले वागणे ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा गावाला होणार आहे. निधी नाही म्हणून गप्प बसून चालणार नाही, गावाला सोबत घेऊन काम केल्यास निधीची कमतरता कधीच पडणार नाही.  लोकसहभागातून जलसंधारणाची उत्तम कामे केली जाऊ शकतात. त्यामुळे  गावच्या विहिरी, बंधारे भरन्यास मदत होणार आहे. गावाला शंभर टक्के ठिबक संच वापराकडे लक्ष दिल्यास पाण्याची बचत चांगल्या प्रकारे होते. 
      गावात कामे करताना पद-प्रतिष्ठा याबाबी बाजूला ठेवाव्या लागतात.  पुढारी,सरपंच, शिक्षक, महसूल कर्मचारी, सनदी अधिकारी असे सगळे गावात असतील तर त्यांनी गावाच्या विकासासाठी आपले योगदान द्यायला हवे. अधिकारी लोकांनी वेळ मिळेल तेव्हा  गावात जाऊन पायजमा-शर्ट घालून विकासकामे करण्याला हातभार लावला तर त्याचा गावाला फायदाच होणार आहे. सरपंच म्हणून काम करणाऱ्या लोकांनी अभ्यास करायला हवा.  गावाला बदलविण्यासाठी सरपंचांनी आधी नियम, कायदे समजून घ्यायला हवेत. संयम व सचोटीची जोड देत ग्रामसेवकाशी संघर्ष न करता त्याच्याशी समन्वयानेच कामे केल्यास चांगला फायदा होईल.
      चिकाटीने पाठपुरावा केल्यास सरपंचाला निधी मिळत जातो. हेतू स्वच्छ ठेवला तर गाव बदलविण्यासाठी कामे बेधडक सुरू करावीत. अतिक्रमणे काढून विकास करावा. सरपंच आरक्षण पद्धतीमुळे  पुन्हा सरपंच होण्याला संधी मिळत नाही.त्यामुळे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन स्वतः सर्वगूण संपन्न बनवत गावाचा विकास करायला हवा.  त्यामुळे पाच वर्षे लोकसहभागातून कामे केली तर ‘चांगला सरपंच’ म्हणून सरपंच परिचित होतात. त्यामुळे पुढे जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यत्वासाठी तुमचे नाव आपोआप घेतले जाईल.
  गावात सरपंचाने असे वागा
 गावात लोकांशी नीतीने वागा.
सरळ मार्गाने गावात कामे करा
लोकांना देशाचे राजकारण कळत असते. त्यामुळे सरपंचाचा हेतू तर जनता पटकन ओळखते, त्यामुळे समाजकारणावर भर द्या.
सर्वधर्म, संप्रदाय, जाती-धर्मांशी सलोख्याने वागावे.
 कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी हे करा 
 गावशिवारात शेतीविकास, जोडधंदे यासाठी अभ्यास करून योजना सुचवाव्यात
सर्वप्रथम एसटी स्टॅंडचा प्रवेश रस्ता चांगला करून घ्यावा. त्यानंतर इतर रस्ते दुरुस्त करून घ्यावेत.
सांडपाणी व्यवस्थेसाठी गटार व्यवस्था, शोषखड्डे तयार करावेत.
घाणीचे साम्राज्य म्हणजे गाव ही व्याख्या बदलण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करा.
गावच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था काढा, बॅंकेकडून पतपुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
लोकवर्गणीतून शिक्षणविषयक कामे उभारावीत.
गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या नोकरदारांना शोधा. त्यांना गावविकासात सामावून घ्या.
 काय करायचे राहिले याचा ‘सर्व्हे’ करा 
 सरपंचाने गावासाठी निधी असा आणावा
 यासाठी सरपंचाने आधी प्रस्तावित योजनेसाठी अभ्यास करावा. जागेचा प्रश्न मिटवूनच आराखडा, प्रस्ताव तयार करावा. त्यानंतर निधीचा शोध घ्यावा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्वनिधीतून गावाला पैसे मिळू शकतो. जिल्हा परिषदेचा ग्रामनिधी पडून असतो. चौदाव्या वित्त आयोगातून पाच वर्षांच्या कामांसाठी पैसा मिळू शकतो. जिल्हा नियोजन समिती, पशुसंवर्धन,आरोग्य,कृषी विभागातूनही पैसा येतो. आमदार निधी, खासदार निधी, विशेष प्रस्ताव म्हणून निधी मिळवण्याचे मार्ग सरपंचांकडे आहेत. मात्र, त्यासाठी भरपूर पाठपुरावा करण्याची तयारी ठेवावी. कुठल्याही गोष्टीत  कष्ट,जिद्द, चिकाटी महत्त्वाची आहे. पण या तुमच्या कार्याचा लाभ अख्ख्या गावाला होणार आहे. गाव नक्कीच तुम्हाला दुवा देईल.

No comments:

Post a Comment