अलिकडे एकूणच वाचनाभिरुची
अतिशय कमी झाली आहे. तरुण पिढी तर क्वचितच नियतकालिकांचे वाचन करताना दिसते. शाळा
कॉलेजात जाणारी मुले तर त्यांच्या विद्यालयीन अभ्यासात आणि शिकवणी वर्गात इतकी
गुंतलेली दिसतात की त्यांना अवांतर वाचन करण्याला सवडच राहिलेली नाही. नोकर्या न
करणार्या गृहिणी त्यांचा फुरसतीचा वेळ टीव्हीवरील सासबहूंच्या सिरियल्स बघण्यातच
व्यतित करीत असतात. नोकर्या करणारे पुरुष आणि महिला त्यांची नोकरी आणि गृहबाह्य़
कामे यातून आम्हाला वाचन करायला वेळच मिळत नसल्याची तक्रार करतात.
मोबाईल फोनचा सुळसुळाट तर इतका झाला आहे की जो तो सतत आपल्या कानाला
मोबाईल लावलेला दिसतो किंवा त्यांच्या स्क्रीनवर व्हॉटस अप, ट्वीटर,
फेसबुक, आलेले एसएमएस यांचे अवलोकन करण्यात
मग्न दिसतो. ज्याकाळी घराघरांमध्ये रेडिओ दिसायचे त्या काळापासूनच खरे तर वाचनाची
आवड हळूहळू कमी व्हायला लागली होती. आता रेडिओची जागा टीव्हीने घेतली एवढाच काय तो
फरक. रेडिओवर त्याकाळी अगदी चोवीस तास कार्यक्रम नसायचे. सकाळची सभा, दुपार व संध्याकाळची सभा यामध्ये खंड
असायचा. उत्तररात्रीही कार्यक्रमांना विरामच असे.
टीव्हीवर मात्र त्यांचा सिलसिला अखंड, अगदी चोवीस तास सुरू असतो. कुठल्याही वेळी टीव्ही ऑन केला की, त्यावर दिसणार्या शेकडो वाहिन्यांवरून प्रक्षेपित केल्या जाणार्या बहुरंगी कार्यक्रमांमधून आपल्या आवडीनुसार चित्रपट, सिनेसंगीत, नृत्य, मालिका, रियॉलिटी शोज, बातम्या यापैकी कुठलाही कार्यक्रम पाहता येतो. ही सगळी सोय उपलब्ध असल्यामुळे मनोरंजनासाठी किंवा कुठल्याही घटनेची माहिती मिळविण्यासाठी आता नियतकालिक हाती घेण्याची कुणालाही गरजच वाटत नाही.
टीव्हीवर मात्र त्यांचा सिलसिला अखंड, अगदी चोवीस तास सुरू असतो. कुठल्याही वेळी टीव्ही ऑन केला की, त्यावर दिसणार्या शेकडो वाहिन्यांवरून प्रक्षेपित केल्या जाणार्या बहुरंगी कार्यक्रमांमधून आपल्या आवडीनुसार चित्रपट, सिनेसंगीत, नृत्य, मालिका, रियॉलिटी शोज, बातम्या यापैकी कुठलाही कार्यक्रम पाहता येतो. ही सगळी सोय उपलब्ध असल्यामुळे मनोरंजनासाठी किंवा कुठल्याही घटनेची माहिती मिळविण्यासाठी आता नियतकालिक हाती घेण्याची कुणालाही गरजच वाटत नाही.
एकेकाळी नियतकालिकांशिवाय मनोरंजनासाठी दुसरा पर्यायच नव्हता. रात्री झोपण्यापूर्वी अनेक जण कादंबर्या, कथासंग्रह, मासिके, साप्ताहिके वाचनासाठी हाती घेत असत आणि झोपेची गुंगी येताच त्यांना बाजूला ठेवत असत. सुटीच्या दिवशी दुपारीही ते वाचनातच वेळ घालवायचे. घरोघरी रेडिओ येण्यापूर्वी देशविदेशातील घटनांच्या बातम्या वृत्तपत्रावाचून त्यांना कळत . त्यामुळे सकाळी घरात टाकल्या जाणार्या वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहिली जाई. वृत्तपत्र दारात पडताच त्यातील पाने वेगवेगळी करून घरातले सदस्य त्यांचे वाचन करीत असल्याचे चित्र दिसायचे. रेडिओवरून बातम्या कळू लागल्यानंतर त्याच बातम्या दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये वाचण्यात स्वारस्य राहिलेले नसायचे. बातम्यांच्या मथळ्यांवरून नजर फिरविताच आपण कुठल्या बातम्या ऐकल्या आहेत त्याचा अंदाज यायचा आणि त्यामुळे त्यांचा तपशील वाचण्याची गरज वाटत नसे. वर्तमानपत्रे फक्त चाळली जाऊ लागली.
टीव्हीमुळे तर त्या बातम्यांचे चित्रीकरणच बघायला मिळू लागले. त्यांचा सगळा तपशीलही त्यासोबतच सांगितला जातो. एवढेच नव्हे तर त्या दिवशीच्या पत्रात त्याविषयी पुन्हा वाचत बसणे हा वेळेचा अपव्ययच वाटू लागला.
अशा परिस्थितीत दैनिक वृत्तपत्रांच्या खपावर त्याचा परिणाम निश्चितपणे होणारच. भरीसभर म्हणून अनेक साखळी वृत्तपत्रांच्या वेगवेगळ्या शहरांमधून आवृत्या प्रकाशित केल्या जात असून विविध वृत्तपत्रांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. वृत्तपत्रे ही त्यांच्या खपावर चालत नसून जाहिरातीवर चालतात. त्यांचे अर्थशास्त्र जाहिरातींच्या ओघावर अवलंबून असते हे सत्य असले तरी त्यांना मिळणार्या जाहिरातीसुद्धा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून विभागल्या जाणे स्वाभाविक आहे. एकीकडे दैनिक वृत्तपत्रांची ही अवस्था असताना साप्ताहिके, पाक्षिके आणि मासिके यांची परिस्थिती तर त्याहून अधिकच दयनीय झाली आहे. अनेक अग्रगण्य मासिके बंद पडली आहेत आणि जी सुरू आहेत ती कशीबशी तग धरून आहेत. साप्ताहिक आणि मासिके केवळ ललित साहित्यासाठीच वाचली जातात. काही छोटी साप्ताहिके त्यातून बातम्या देखील पुरवीत असली तरी त्या बातम्या दैनिकांमधून अगोदरच पुरविल्या गेल्या असतात.
मोठय़ा वृत्तपत्रांमधून बातम्यांव्यतिरिक्त इतरही माहिती पुरविण्यासाठी आणि काही वाचकांची ललित साहित्य वाचनाची भूक शमविण्यासाठी पुरवण्याही प्रसिद्ध केल्या जातात. या पुरवण्यांचा परिणाम ललित साहित्य प्रसिद्ध करणार्या मासिकांवर निश्चितपणे झाला आहे. कथा, कविता, वैचारिक लेख असे साहित्य रविवारच्या पुरवण्यांमधून वाचकांना उपलब्ध होत असल्यामुळे मासिक विकत घेऊन वाचणार्यांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. मराठी भाषेतून दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याच्या परंपरेला शंभर वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. मासिक मनोरंजनाने सुरू केलेली शंभर वर्षापूर्वीची ही प्रथा आजही सुरू आहे. दिवाळी अंकांमधून ख्यातनाम लेखकांचे दर्जेदार ललित साहित्य वाचकांना सादर करण्याचा प्रयत्न संपादक करीत असतात. पण दिवसेंदिवस त्यातून प्रसिद्ध होणार्या साहित्याचा दर्जा घसरत असल्याची प्रतिक्रिया वाचकांकडून ऐकायला मिळते. प्रवासी हल्ली मोबाईलवर गेम खेळत असलेले किंवा फेसबुक व्हॉटस् अँपवर नजर खिळवून बसलेले दिसतात.वाचनाची अभिरुची कमी होण्याचा, इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे आकर्षण असण्याचा आणि मनोरंजनासाठी घरोघरी टीव्ही आणि मोबाईल्स उपलब्ध असण्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे नव्या पिढीची सतत बदलत असलेली अभिरुची यांच्या संदर्भात नियतकालिकांचे भवितव्य हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय झाला आहे यात तिळमात्र शंका नाही.
No comments:
Post a Comment