Saturday, February 3, 2018

(बालकथा) राक्षसाचे पुण्यकर्म


     दुष्काम निधीला शोधत शोधत दंडकारण्यात पोहचला. एका राक्षसाने त्याला कैद केले. तो भीतीने थरथर कापू लागला.
राक्षस त्याला धीर देत ,समजावत आपली कहानी सांगू लागला."मी कित्येक वर्षांपासून माणूस आणि इतर  जीवजंतू यांना खावून पोट भरत आहे. अत्यंत निकृष्ट असं जीवन जगतो आहे. एक दिवस एक ऋषी मला भेटले.मी त्यांना माझी व्यथा सांगितली व त्यांना मी सविनय विनंती केली की,मला या राक्षस जन्मापासून मुक्ती द्या आणि मला मनुष्य जीवन प्रदान करा.ऋषींनी माझी विनंती मान्य केली आणि आश्वासन दिले की, मी जर पुण्यकाम केले तर ही गोष्ट शक्य आहे. मला माणूस बनायचं आहे."
आपली कहानी सांगितल्यावर राक्षस पुन्हा दुष्कामला म्हणाला,"तुला पाहिल्यावर मला वाटतं आहे की, पुण्यकर्म करण्याची वेळ आली आहे.माझी शक्ती अमोघ आहे.सांग,तुला काय हवंय."
दुष्कामला वाटलं की, आता त्याला नक्की निधी भेटेल.त्याने राक्षसाकडून निधी कुठे आहे , हे जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली.
"खरं सांग, निधीशी तुझा काय संबंध आहे? जर तू खोटे बोललास तर मला दिसणारी निधी तुला अजिबात दिसणार नाही.भेट तर लांबच राहिली."राक्षस म्हणाला.
दुष्काम म्हणाला,"निधी मला प्राप्त झाली तर मी संपत्ती संपन्न होऊन जाईन.त्या धनसंपत्तीतून शक्तीशाली मल्लयोद्धांना पोसेन.जो कोणी मला विरोध करील, माझी गोष्ट कुणी ऐकणार नाही,त्यांना बदडायला सांगेन. त्यांची त्यांना औकात दाखवेन.ज्या विशालाक्षीवर मी प्रेम करतो,तिच्याशी विवाह करेन."
"एवढ्याशा गोष्टीसाठी धनसंपत्ती कशाला हवी? मल्लयोद्धे कशाला हवेत? ज्या विशालाक्षीशी तू प्रेम करतोस,तिला मी गोड बोलून समजावून सांगेन आणि तुझ्याशी लग्न करायला  तिला तयार करीन." राक्षस म्हणाला.
"परंतु,विशालाक्षी अशा माणसाशी विवाह करायला तयार होणार नाही,ज्याचा आगोदरच विवाह झाला आहे.ती माझी दुसरी पत्नी व्हायला कदापि तयार होणार नाही." दुष्काम म्हणाला.
त्याच्या या उत्तराने राक्षस आश्चर्य व्यक्त करत म्हणाला,"तुझ्या पहिल्या पत्नीचं काय झालं?आता ती कुठे आहे?"
राक्षसाच्या या प्रश्नावर दुष्काम चपापला. तो गोंधळून म्हणाला," ग्रामदेवीच्या यात्रेत तिचा मी बळी दिला आहे.एका मांत्रिकाने सांगितले होते की, असे केल्याने तुझ्या घरावर धनसंपत्तीचा वर्षाव होईल. पण धनाचा वर्षाव काही झाला नाही.ही गोष्ट शिपायांना कळल्यावर ते माझ्या मागे लागले.त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठीदेखील मला धन हवे आहे. विशालाक्षीला मिळवण्यासाठीसुद्धा धन हवे आहे.त्यामुळे मला निधी हवी आहे."
"माणसाला पुनर्जन्म देण्याची शक्ती माझ्यात आहे.तुझ्या पत्नीला मी पुनर्जन्म देईन. तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील.चालेल ना?" राक्षस म्हणाला.
" माझी पत्नी जिवंत झाली तर मग मी विशालाक्षीशी विवाह कसा करू शकेन?" दुष्काम म्हणाला.
"अरे दुष्टा,तू माणूस नाहीस.माझ्यासारख्या राक्षसापेक्षाही भयंकर आहेस. पापी आणि नीच आहेस. तुला चांगला माणूस बनवण्याचा मी खूप प्रयत्न केला,पण तू मोठा नालायक माणूस निघालास. चांगल्या माणसाला मदत केल्याने पुण्यकर्म होऊ शकते. आज मी पुण्यकाम करू शकत नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. आता मला पुण्यकर्म करण्यासाठी आणखी एका दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. आज तुला खाऊन माझी भूक मिटवणार आहे." असे म्हणून राक्षसाने त्याला आपल्या तोंडात टाकले.
दुसऱ्याच क्षणी तिथे ऋषी प्रकट झाले आणि म्हणाले,"दुष्कामसारख्या नीच माणसाला खाऊन तू पुण्यकाम केलं आहेस.अशा प्रकारे अजाणतेपणी तू अनेक पुण्यकर्म केलं आहेस.पण आज तू जे केलंस, ते सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. आता तुझी राक्षस जन्मापासून मुक्तता झाली आहे.लवकरच तू मानव जन्म घेशील. तथास्तू...!" असे म्हणून ऋषी अदृश्य झाले.

No comments:

Post a Comment