Wednesday, February 7, 2018

(विज्ञान कथा) पेरी जेड सिग्मा 090


     "हॅलो,सुलक्षणा, तुला माझा आवाज ऐकायला येतोय का?" या अनोळखी आणि काहीसा यांत्रिकी आवाज ऐकून सुलक्षणा एकदम दचकली. तिला वाटलं, कुणीतरी लांबून हाक मारत आहे. तिने दचकून इकडे-तिकडे पाहिले,पण अंतरिक्ष यानात ती आणि तिचे दोन सहकारी शास्त्रज्ञ यांच्याशिवाय दुसरे कोणी नव्हते.
सुलक्षणाने समोरच्या स्क्रीनवर नजर टाकली. अंतरिक्षयान वेगाने अंतरिक्ष स्थानकाच्या दिशेने निघाले होते. पुढच्याच क्षणी पुन्हा सुलक्षणाच्या मस्तिष्कमध्ये तोच यांत्रिकी आवाज खरखरला,"सुलक्षणा,मी ...मी बोलतोय पेरी जेड.....!"
या वेळेला सुलक्षणा दचकली नाही.तिने सावकाशीने पण कानोसा घेत विचारले," कोण? कोण आहात तुम्ही?"
"मी पेरी जेड सिग्मा 090 बोलतोय."

"पेरी जेड सिग्मा....?" सुलक्षणाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले."मी तुझ्या सौरमंडलपासून 1000 प्रकाशवर्ष अंतरावर स्थिर असलेल्या 'वायनो' सौरमंडलच्या 'सिग्मंड' प्लेनेटहून बोलतोय."
"पण तुम्ही मला दिसत का नाही?"
"तू तुझ्या सीट समोर असलेल्या स्क्रीनला सर्च मोडवर टाक, मी लगेच तुझ्यासमोर प्रकट होईन."
पेरी जेडच्या सांगण्यावरून सुलक्षणाने तिच्या सीट समोरचे  स्क्रीन सर्च मोडवर टाकले.पुढच्याच क्षणी स्क्रीनवर एक विचित्र पण गुटगुटीत चेहऱ्याची व्यक्ती झळकली. त्याच्या त्वचेचा रंग गुलाबी आणि चेहरा फारच आकर्षक होता.त्याला पाहून सुलक्षणा जोराने ओरडली,"तुझे नाव तर परीसारखे आहे."
"परी ...?"म्हणत पेरी एक क्षण थांबला, आणि पुन्हा म्हणाला,"कळलं, म्हणजे तू जादूई शक्तींची मालकिण आणि  माणसाला मदत करणाऱ्या परीविषयी बोलते आहेस ना ? "
"हो हो, तुला सांगते, मी आतापर्यंत खूप खूप अशा परींच्या गोष्टी वाचल्या आहेत."आता सुलक्षणा बरीच सामान्य झाली होती." मला परया  फार फार आवडतात. त्या  खूप सुंदर असतात.त्यांच्याजवळ जादूची काठी असते.त्या काठीच्या मदतीने एका चुटकीत कुठलंही काम करून टाकतात."
"असं?" असे म्हणत पेरी जेड हसला.त्याचा चेहरा स्क्रीनपासून दूर जाऊ लागला.बघता बघता पेरी जेडचे संपूर्ण शरीर स्क्रीनवर दिसू लागले.
सुलक्षणाने लक्षपूर्वक पाहिले.पेरी जेडच्या पाठीवर परींसारखे पंख आलेले होते आणि त्याने त्याच्या हातात एक छोटीशी काठी धरली होती.
"अरे, तू तर परी .... आय मीन मेल परी आहेस." सुलक्षणाने आश्चर्याने तोंड वासला.
"पण मी तर फक्त फीमेल परींबाबतच...!"
सुलक्षणा काही क्षण थांबली, आणि पुन्हा म्हणाली,"अरे हो,हातिमताईच्या गोष्टींमध्ये मेल परी म्हणजे परीजाद्यांचादेखील उल्लेख आला आहे. काय तुम्ही तेच आहात का?"
पण  पेरी जेड सुलक्षणाच्या प्रश्नांचे उत्तर देणार त्या पूर्वीच कुणीतरी सुलक्षणाचा खांदा धरून जोर- जोरात  हलवलं. तिचं स्वप्न भंग पावलं.तिने दचकून इकडे-तिकडे पाहिलं. अरे, ती तर  भारतीय अंतरिक्ष संघटनेच्या प्रशिक्षण विभागाच्या विश्रांतीगृहात बसून तिच्या प्रशिक्षकाची वाट पाहत होती.
"याचा अर्थ मी स्वप्न....?" सुलक्षणाला स्वतःचेच हसू आले.
सुलक्षणासमोर तिचे प्रशिक्षक शास्त्रज्ञ पीरजादा रहमान उभे होते.ते अंतरिक्ष संघटनेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुलक्षणा पुढच्या आठवड्यात अंतरिक्ष प्रवासाला निघणार होती. 
अंतरिक्ष प्रवासासाठी सुलक्षणाची निवड भारत सरकारच्या एका महत्त्वपूर्ण मोहिमेनूसार झाली होती. मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने 'हुशार शास्त्रज्ञ' या नावाची योजना सुरू केली होती. या अंतर्गत निवडलेल्या एका मुलाला अंतरिक्ष प्रवासाला जाण्याची संधी मिळणार होती.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावर एका ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मुलांची आय क्यू चाचणी आणि शारीरिक तपासणीनंतर सुलक्षणा हीच सर्व परीक्षकांच्या कसोटीवर उत्तीर्ण झाली होती.
या मोहिमेत निवड झाल्यावर सुलक्षणाला एक महिन्याचे अंतरिक्ष प्रवासासंबंधी प्रशिक्षण दिले जात होते.या दरम्यान तिला भारहिन परिस्थितीत राहण्याचे ट्रेनिंगसह अन्य तंत्रज्ञानांची माहिती दिली जाणार होती.
आज सुलक्षणाच्या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस होता.ती अंतरिक्ष प्रवासाला जाण्यासाठी अगदी उतावीळ झाली होती.यामुळेच ती आज ठरल्या वेळेपेक्षा 15 मिनिटे अगोदर अंतरिक्ष संघटनेच्या प्रशिक्षण भवनात येऊन पोहचली होती. अजून शास्त्रज्ञ पीरजादा प्रशिक्षण भवनात आले नव्हते.त्यामुळे ती आराम खुर्चीत बसून त्यांची वाट पाहात होती. या दरम्यान तिचा डोळा लागला आणि ती स्वप्नलोकांत पोहचली.
"काय झालं सुलक्षणा? स्वप्नात अंतरिक्ष सफर करून आलीस की काय?" शास्रज्ञ पीरजादा यांनीही हसत विचारलं.
" हो हो,सर!"सुलक्षणाने गडबडून उत्तर दिलं. "सर,मी स्वप्नात  'सिग्मंड' प्लॅनेटच्या 'पेरी जेड सिग्मा 090' ला भेटले.तो अगदी परीसारखा दिसत होता.तसेच पंख,तशी जादूची काठी ...."
"कम ऑन सुलक्षणा, तू तर एक भावी शास्त्रज्ञ आहेस आणि अशा बालिश गोष्टी करतेस?"
शास्त्रज्ञ पीरजादा यांची गोष्ट ऐकून सुलक्षणा नरम पडली. काय बोलावे,हे तिला कळेना. पीरजादा पुढे म्हणाले,"तुला माहीत नाही का या ब्रम्हांडात एकमात्र असा  पृथ्वी ग्रह आहे,जिथे जीवन आहे."
"पण सर,आपण तर अजून आपल्याच ब्रम्हांडाबाबत जाणून घेऊ शकलो नाही, अशा परिस्थितीत कसे काय म्हटले जाऊ शकते की संपूर्ण ब्रम्हांडात फक्त पृथ्वीवरच ..." सुलक्षणा इच्छा असूनही  स्वतः ला रोखू शकली नाही.
"तुला 'वायजर-1' आणि 'पायिनियर-10' ही नावं माहीत आहेत का?" शास्त्रज्ञ पीरजादा यांनी प्रश्नार्थक नजरेने सुलक्षणाकडे पाहिले.
"हो सर,ती दोन्ही याने अमेरिकेने पृथ्वीशिवाय अन्य कुठे मानवी जीवन आहे का,याचा शोध लावण्यासाठी सोडले होते."
"अगदी बरोबर!"पीरजादा अगदी एकाद्या शिक्षकाप्रमाणे बोलले." तुला माहीत असेल 'वायजर-1' मध्ये सोने या धातूसह बऱ्याच वस्तू आणि जगभरातल्या 55 भाषांमध्ये संदेश आणि पृथ्वीवर जीवन असल्याबाबतची माहिती देणारी दृक्-श्राव्य सामुग्री ठेवण्यात आली आहे.असे यासाठी करण्यात आले आहे,जर पृथ्वीव्यतिरिक्त अन्य कुठे जीवन असेल तर ते लोक या गोष्टी पाहून किंवा वाचून आपल्याविषयी जाणून घेतील. आपल्याशी संपर्क साधतील.पण आजपर्यंत असा पुरावा आपल्या समोर आला नाही. 37 वर्षे झाली हे यान आपल्या सौरमंडळाच्या बाहेर भटकत आहे."
सांगताना काही क्षण पीरजादा थांबले.त्या॑नी सुलक्षणाच्या दिशेने पाहिले आणि मग आपले बोलणे सुरू केले."अशाच प्रकारे नासाने जवळजवळ चार दशकापूर्वी जीवन शोधण्यासाठी 'पायोनियर-10' अंतरिक्षयानदेखील पाठवले होते. आपले सौरमंडल पार करून हे यान अनंत अशा ब्रम्हांडात हरवून गेले होते.मात्र डिसेंबर 2017 मध्ये त्याचा पुन्हा पृथ्वीशी संपर्क झाला. मात्र यातून अन्यत्र कुठे जीवन असल्याचा पुरावा मिळालेला नाही."
पीरजादा यांचे बोलणे ऐकल्यावर ती पुढे काहीच बोलली नाही.खरे तर तिला काय उत्तर द्यावे यासाठी पुढे काही सुचलेच नाही.हे पाहून पीरजादा म्हणाले," म्हणून मी सांगत होतो की, पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवन असल्याचा समज करून घेणे म्हणजे एक प्रकारचा बालिशपणा आहे."
"सर, प्रशिक्षण कक्ष तयार आहे." तेवढ्यात पीरजादा यांच्या असिस्टंटने येऊन सूचना दिली.
"चल, आपण आपले काम सुरू करू. म्हणजे तू तुझे प्रशिक्षण पूर्ण करशील आणि स्वप्नात नाही तर प्रत्यक्षात अंतरिक्ष प्रवास करू शकशील." असे म्हणत पीरजादा प्रशिक्षण कक्षाच्या दिशेने निघाले.
सुलक्षणादेखील हळूहळू शास्त्रज्ञ पीरजादा यांच्या मागे मागे निघाली. तिच्या मेंदूने पीरजादा यांचे बोलणे मानले असले तरी का कुणास ठाऊक मात्र तिचे मन या गोष्टी स्वीकारायला तयार नव्हते.तिला वाटत होते की, ब्रम्हांडाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात पृथ्वीसारखा एकाद्या ग्रह असेल आणि या ग्रहावर 'पेरी जेड अल्फा 090' यासारखा किंवा त्याच्यासारखे लोक नक्की  राहत असतील.आणि कधी ना कधी एक दिवस हे लोक आपल्याशी संपर्क साधतील.

No comments:

Post a Comment