Saturday, February 24, 2018

रोज नवे नवे ... हवे हवे


सतत थकवा जाणवतो?
व्यग्रता जाणवणं, कोणत्याही कामात मन न लागणं, औदासिन्य भेडसावणं, कमालीचा थकवा जाणवणं या आणि अशा तक्रारी वारंवार भेडसावत असतील तर तुम्हाला बर्न आऊटची समस्या असू शकते. या समस्येची लक्षणं जाणून घ्यायला हवी.
* सतत जाणवणारा थकवा शारीरिक, मानसिक किंवा भावनिकही असू शकतो. 
* कोणतेही काम करताना उत्साह वाटत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची तसंच आरामाची गरज आहे असं समजावं. 
*अशा वेळी दैनंदिन काम हे ओझं वाटू शकतं. मनात नकारात्मक भावनांनी घर केलं असेल तर गडबडून न जाता स्वतच्या भावनांवर नियंत्रण राखणं गरजेचं असतं. 
* लक्ष केंद्रित होत नसेल, ताण-तणावांमुळे गांगरून गेला असाल तर ही परिस्थिती गंभीर मानसिक विकारांकडे अंगुलीनिर्देश करते, असं समजावं. 

* तुमची शारीरिक क्षमता नष्ट होणं हे काही मोठय़ा आजारांचं लक्षणं असू शकतं. त्यामुळे सर्वप्रथम सगळ्या तपासण्या करून घ्या. आपल्या कामाचं स्वरूप समजून घेऊन प्राधान्यक्रम ठरवा. यामुळे काही प्रमाणात त्रास कमी होतोय का ते पहा. त्रास कमी झाला नाही तर मात्र त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मुलाखतीची पूर्वतयारी
नोकरीचा शोध घेत असताना इंटरव्ह्यू पॅनलसमोर कसं व्यक्त व्हायचं असा प्रश्न पडतो. पण यासाठी काही अँप्स आणि वेबसाईट्सची मदत घेता येईल. अशाच काही अँप्स आणि वेबसाईटविषयी..
* मुलाखतीत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची तयारी करण्यासाठी '0१ एचआर इंटरव्ह्यू क्वेश्‍चन' हे अँप तुमच्या मदतीला येईल. यात विविध क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहेत. गुगल प्ले स्टोअरमधून हे अँप डाऊनलोड करता येईल. 
* मुलाखतीला गेल्यावर सर्वप्रथम तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. म्हणूनच अशा ठिकाणी जाताना योग्य पेहराव करावा लागतो. याबाबतची माहिती या साईटवर मिळते. ही साईट तुम्हाला पर्सनल स्टायलिस्टची मदत मिळवून देते. यावर महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे विभाग आहेत. यासोबतच साईटवर इंटरव्ह्यू टूल्सही आहेत. यामुळे तुम्ही घरबसल्या तयारी करू शकता. 
* व्हिडीओंचा वापर करून तुम्ही मुलाखतीचा सराव करू शकता. हा मॉक इंटरव्ह्यूसारखा प्रकार आहे. प्रश्नांची उत्तरं रेकॉर्ड करता येतात. इथे इंटरव्ह्यूचे काही जुने व्हिडीओ आहेत. तेही तुम्ही बघू शकता. मुलाखतीची भीती वाटत असेल तर या अँप्स आणि साईट्सची मदत घ्या आणि बिनधास्त मुलाखत द्या.

टाळा खारवलेले पदार्थ
आहारात मीठाचे प्रमाण किती असावे याविषयी चर्चा करताना आपण काही मुद्दे अभ्यासले. याविषयी विस्तृत चर्चा करताना अन्य काही मुद्देही लक्षात घ्यायला हवे. आहारात मीठाचे जास्त प्रमाण असेल तर रक्तप्रवाहाचा वेग वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो. संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह योग्य दाबाने सुरू राहण्यासाठी मग हृदयाला खूप मेहनत करावी लागते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराची समस्या निर्माण होते. तसेच ऑस्टिओपोरोसिस, मूतखडा, अस्थमा आणि गॅस्टिक कॅन्सर असे विकार होण्याची शक्यताही वाढते.
मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी चीज, पापड, लोणची, खारवलेले काजू, पिस्ते, वेफर्स, फरसाण, सोया, टोमॅटो, मायोनिज आणि इतर सॉस, ब्रेड, इस्टंट सूप, नूूडल्स, पास्ता असे पदार्थ टाळावेत. पोटॅशियममुळे शरीरातले सोडीयमचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे केळं, संत्र, पीच, टरबूज, पालक अशी पोटॅशियमचं प्रमाण जास्त असणारी फळं आणि भाज्या खाव्यात. शरीरातलं सोडीयमचं प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचं प्रमाण वाढवावं. मांस आणि भाज्या साठवण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे हे घटक स्वच्छ धुऊन घ्या.

उन्हाळ्यात त्वचा जपा
उन्हाळा सुरू होताच टॅनिंगचा धोका वाढतो. सतत उन्हात फिरणं असेल तर त्वचा काळवंडेतच शिवाय अन्य समस्याही उत्पन्न होऊ शकतात. शुष्कता, तेज हरपणं, मृत त्वचेचा थर जमा होणं यासारख्या समस्यांमुळे सौदर्य डागाळतं. हे टाळण्यासाठी उन्हाळा सुरू झाल्यावर सौंदर्यरक्षणाचे विशेष उपाय योजायला हवेत. 

* त्वचेची शुष्कता, निस्तेजता टाळण्यासाठी व्हिटॅमिन सीचा पुरवठा गरजेचा असतो. म्हणूनच या दिवसात सायट्रसयुक्त फळांवर भर द्या. त्वचा तेजस्वी दिसण्यासाठी व्हटॅमिन सी युक्त तेल अथवा क्रीमचा मसाजही लाभदायक ठरतो. पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्सपासून सुटका करून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त सिरमचा वापर करा.
* हलक्या स्क्रबिंगद्वारे मृत त्वचेचा थर काढून टाकायला हवा. हा थर निघून जाताच त्वचा सतेज आणि टवटवीत दिसू लागेल.
* या दिवसभरात शक्य तेवढं पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेट राहील.
* उन्हाळ्यात फेशियल करून घेण्याची वारंवारिता वाढवा. या दिवसात ब्लॅक हेडस, व्हाईट हेडस, क्लॉग्ड पोर्स आदी समस्या भेडसावतात. नियमित फेशियल केल्यामुळे त्या दूर होतात.

वेळ वाचवा
कितीही नियोजन केलं तरी वेळ पुरत नाही ही तुमची तक्रार आहे का? वेळ पुरत नसल्यामुळे तुमची चिडचीड होते का? केवळ या कारणामुळे तुम्ही अन्य उपक्रमांमधील सहभागापासून दूर राहता का? या सगळ्यांची उत्तरं होकारार्थी असतील तर एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती जवळपास ३0 टक्क्यांपेक्षा जास्त वेळ वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करण्यात घालवत असते. एकप्रकारे कल्पनारंजनातच आपल्या एकूण वेळेचा बराच भाग खर्च होत असतो. म्हणूनच तो वाचवा.

धूर्त कोल्हा
एकदा प्राण्यांच्या राज्यात रोगाची साथ सुरू झाली आणि हजारो प्राणी मरू लागले. हा देवाचा कोप असल्याचं समजून प्रत्येकाने आपली वाईट कृत्यं कबूल करायचं ठरवलं आणि सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाला शांत करण्यासाठी बळी जावं असं निश्‍चित झालं. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले आणि न्यायाधीश म्हणून कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने कबुली दिली, 'मी अनेक निरागस कोकरांना ठार मारलं आहे.' त्यावर न्यायाधीश महाराज म्हणाले, 'एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. दुसरं म्हणजे त्या मूर्ख बकर्‍या खाणं हा काही अपराध नाही.' या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. 

यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनीही आपापल्या चुका मान्य केल्या आणि कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव म्हणालं, 'मी एका शेतकर्‍याच्या जमिनीतलं हिरवं गवत खाल्लं.' हे ऐकतात न्यायाधीश झालेला कोल्होबा ओरडला, 'अरे पाप्या, तुझ्या पापामुळेच देवाचा कोप झालेला आहे. याला मरणाची शिक्षाच योग्य आहे!
तात्पर्य : बळी तो कान पिळी.


वाढवा सामान्यज्ञान
1)चाबुककाणी हा रोग कोणत्या पिकावर पडतो?
२) कोणती बँक शेतकर्‍यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते
३) आयोडिन अल्पता विकार नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो
४) कशाच्या चौकशीसाठी न्या. जी. शिवराजन समिती नेमण्यात आली होती
५) २00१ च्या जनगणनेच्या वेळचे जनगणना आयुक्त कोण होते?
उत्तर : १) गहू २) भू-विकास बँक ३) २१ ऑक्टोबर ४) सौर पॅनल घोटाळा ५) जे.के.भाटीया

विनोद
बक्षीस!
रंगूबाई : साहेब, फरशी स्वच्छ करताना मला दोन रुपयांचं नाणं सापडलं.
मालक : राहू दे तुझ्याकडे. प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दिलं आहे असं समज.'
दुसर्‍या दिवशी साहेबांनी रंगूबाईला विचारलं, 'अगं, इथे शंभर रुपयांची नोट दिसली का तुला?'
रंगूबाई 'हो दिसली होती ना. प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून ती ठेवून घेतली.


No comments:

Post a Comment