Monday, February 5, 2018

आरसा आरोग्याचा..


     आपल्या शरीरात नेमके काय चाललेय, हे कळतच नाही. शरीराचे बाहय़ अवयव मात्र याची सूचना वेळोवेळी देत असतात. विशेषकरून हात आणि नखांवरून एखाद्या विकाराची ओळख पटू शकते. त्यामुळेच या दोन्ही अवयवांना आरोग्याचा आरसा म्हटल्यास वावगे ठरू नये. काय सांगतो हात आणि नखांमधला बदल? जाणून घेऊ.

नखांलगतचा भाग निळा पडणे हे रक्ताभिसरण नीट होत नसल्याचे लक्षण असू शकतं. ही स्थिती फार धोकादायक नसली तरी हातापायांची बोटं लाल, निळी किंवा पांढरी दिसू लागतात. यासोबत वेदना, बधिरता, मुंग्या येण्यासारख्या समस्या उद्भवतात. या लक्षणांसोबत ताप आल्यास न्यूमोनिया असण्याची शक्यता असते.
1.तळहातांना घाम येणे हे ताणाचे लक्षण असू शकते. तसेच जास्त कार्यरत असणार्‍या थायरॉइडमुळेही ही समस्या निर्माण होते. अशा थायरॉइडमुळे चयापचय क्रिया वाढते. यामुळे आपण जास्त कॅलरी खर्च करतो आणि तळव्यांना घाम येतो. ही सततची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
2. नखांवर असलेल्या उभ्या रेषा म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारपणातून नुकतेच उठल्याचे लक्षण असू शकते. खूप आजारी असल्यावर नखांची वाढ होत नाही आणि ही समस्या निर्माण होते.
3. निरोगी व्यक्तीच्या नखांचा रंग सर्वसाधारणपणे पांढरट गुलाबी असतो. नखं दाबली तर पांढरी दिसू लागतात आणि दाब सोडल्यावर ती पुन्हा गुलाबी होतात. पण बराच काळपर्यंत नखं पांढरीच राहिली तर शरीरात लोहाची कमतरता म्हणजे अँनिमिया असल्याचे समजावे.
4. कॅफिनचे अतिरिक्त प्रमाण, ताण-तणाव, अस्थमा आणि नैराश्यावरची औषधे यामुळे हात थरथरू लागतात. हे थरथरणे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. पण हाच प्रकार वारंवार होत असेल तर मेंदूशी संबंधित विकार असण्याची शक्यता असते. हे पार्किन्सन्स या विकाराचे लक्षणही असू शकते.
5. तुमची बोटं सुजली असतील तर आहारात मीठाचे प्रमाण जास्त आहे हे लक्षात घ्यावे. तसेच तुम्हाला थोड्या-फार प्रमाणात डिहायड्रेशनची समस्या असू शकते. यासोबत थायरॉइड सारख्या समस्येमुळेही बोटं सुजू शकतात. 

थंडीतील विकार
शरीराच्या एखाद्या भागात वेदना जाणवली की वेदनाशामक औषधं घेऊन आपण मोकळे होतो. होईल त्रास कमी.. असे म्हणत डॉक्टरांकडे जाणे टाळले जाते. पण या वेदनांच्या माध्यमातून शरीर आपल्याला काही तरी सांगत असतं. शरीराचे वेळेत ऐकले नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. कोणत्या वेदनांकडे दुर्लक्ष करणं ठरतं घातक? जाणून घेऊ.
सगळीकडेच नाही तरी काही ठिकाणी थंडीचा पारा पुन्हा एकदा घसरलाय. वाढत्या थंडीसोबत लोकांना आजारांचा विळखा पडू लागलाय. सर्दी, खोकला आणि वाहते नाक या समस्यांनी लोक हैराण झाले आहेत. हिवाळ्यातील या विकारांविरोधात लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती तितकीशी सक्षम असतेच असे नाही. कितीही काळजी घेतली तरी विषाणू आपल्या शरीराचा ताबा घेतातच. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेत औषधोपचार घेऊन या विकारांना आटोक्यात ठेवणे गरजेचे असते. या विकारांकडे केलेले दुर्लक्ष महागात पडू शकतं. सर्दी-खोकल्यासोबतच अस्थमाही या काळात रौद्र रूप धारण करतो. तसेच घशाच्या तक्रारी उद्भवतात. तसे पाहायला गेले तर थंडीतले हे सर्वसामान्य विकार आहेत. त्यांचा प्रतिबंध करण्याचे हे काही उपाय..
1. सर्दी हा विकार बारमाही आहे. पण थंड वातावरणात ती लवकर हल्ला करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना वरचेवर सर्दी होते. वर्षातून तीन ते दहा वेळा अशी सर्दी होऊ शकते. यासोबत नाक चोंदणे नाक गळणे, घोरणे, कफ, घसा खवखवणे, डोकदुखी आणि हलका ताप या समस्या जाणवतात. सर्दीपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे ठरते. सर्दीचे जंतू वातावरणात सगळीकडे असतात. या जंतूंची बाधा होऊ नये यासाठी डोळे आणि नाकाला सतत हात लावू नये.
2. या काळात फ्लूही डोकं वर काढतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा ही लक्षणे यात दिसून येतात. लसीकरण आणि स्वच्छता या मार्गांनी फ्लूपासून बचाव करता येणे शक्य आहे. हा साथीचा रोग असल्याने फ्लू झालेल्या रुग्णांपासून लांब राहायला हवे. फ्लू झाल्यानंतर श्‍वसनासंबंधीच्या तक्रारी असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
3.  या दिवसात ब्रोंक्रायटीसची समस्या दिसून येते. लहान बाळं आणि मुलांमध्ये याचे प्रमाण बरेच जास्त असते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्येही ही समस्या दिसून येते. याची लक्षणं सर्दीसारखीच असतात. या विकाराची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांची भेट घ्या.
4. जंतूसंसर्गामुळे घसा बसण्याची समस्या उद्भवते. तापमानातील चढ-उतारांमुळेही घसा बसतो. अशा वेळी गरम पाणी प्यावं. थंड पदार्थ खाणं टाळावं तसेच मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
5. थंडीत अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. हे टाळण्यासाठी शारीरिक हालचालींवर भर द्यावा. सांधेदुखीमुळे एका ठिकाणी बसला असाल तर वेदना जास्त तीव्र होतील. त्यामुळे थंडीत एका जागी बसणं टाळावं. व्यायाम किंवा चालायला सुरुवात करावी. 

No comments:

Post a Comment