Monday, February 5, 2018

डॉक्टरी व्यवसाय आणि ग्राहक संरक्षण


     मध्यंतरी डॉक्टर मंडळी अव्वाच्या सव्वा बील आकारतात आणि रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लुटतात.  याबाबत बराच गदारोळ उठला होता,मात्र शासनाच्या नेहमीच्या दुर्लक्ष करण्याच्या पद्धतीमुळे हा विषयदेखील आंदोलन किंवा डॉक्टरांविरोधात उभे राहिलेल्या लोकांना तडीस न्हेता आला नाही. ज्या डॉक्टरी व्यवसायाकडे लोक अतिशय सांगलीतील वस्तू संग्रहालयआदराने पाहतात त्या क्षेत्रातही इतक्या टोकाचे लुटीचा आणि गैरप्रकाराचा प्रकार  होत आहे, विशेष म्हणजे या पेशातील लोकांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे या क्षेत्रावर सामान्य माणसाचा विश्‍वास उडाल्याचे दिसून येते. या वैद्यकीय क्षेत्रात गर्भलिंग चिकित्सापासून ते अवैध गर्भपातापर्यंत तसेच डॉक्टरांकडून उकळल्या जाणार्‍या बेसुमार शुल्कापासून ते डॉक्टरांना मिळणार्‍या औषधी कंपन्यांच्या लाचेपर्यंत अनेक प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असतात, जी शरमेची व चिंताजनक बाब ठरते आहे. वैद्यकीय हा व्यवसाय जरी असला तरी त्याची अन्य व्यवसायांशी तुलना करता येत नाही. कारण समाजातले असे काही व्यवसाय असतात की त्याची नीतीमत्ता हेच भांडवल असते आणि असे व्यवसाय जगवणे, टिकवणे किंवा चालवणे ही समाजाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ठरत असते.

     शिक्षक, डॉक्टर, विविध प्रकारची धार्मिक कार्ये करणार्‍या व्यक्ती या सर्वांचा श्रद्धा, नीतीमत्ता, निष्ठा या गोष्टींशी अधिक संबंध येत असतो आणि त्यांनी त्याचा सन्मान करावा तसेच संवर्धन करावे, अशी अपेक्षा असते. मात्र, दुर्दैवाने आजच्या स्पर्धेच्या आणि व्यापारी युगामध्ये या सगळ्याच गोष्टींना धाब्यावर बसवण्याचे काम होत आहे आणि कोणत्याही पद्धतीने पैसा कमवणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवल्या जाते. मागील काही वर्षात वैद्यकीय व्यवसाय जास्त चर्चेमध्ये आला आहे आणि म्हणून रुग्णालयांमध्ये डॉक्टरांवर हल्ले करण्याचा प्रकारही वाढत असलेल्याचे पाहायला मिळते. काही वैद्यकीय इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांनी पुढाकार घेऊन या व्यवसायातल्या कट पॅ्रक्टिसला विरोध करण्याचे धाडस दाखवल्याचे दिसते अणि तसेच औषधी कंपन्यांकडून डॉक्टरांना मिळणार्‍या लाचेविरोधात काही डॉक्टरांनीच आवाज उठवला होता. ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या आणि एकूणच वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा जपणारी ठरते. कारण आजच्या या स्पर्धेच्या युगात डॉक्टरांनासुद्धा पैशाचा मोह दाखवून औषध कंपन्या जेव्हा आपला माल खपवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा डॉक्टर हे औषधी कंपन्यांना विकले गेले आहेत, असे चित्र निर्माण होते. आपली औषधे विकली जावीत म्हणून डॉक्टरांना खरेदी करण्याचा प्रकार एकूणच नीतीमत्तेचा लिलाव मांडणारा ठरतो. 
      काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने औषधी कंपन्यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली होती. त्या कंपनीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी होत्या. त्यावेळेला मोठय़मोठय़ा डॉक्टर्सला रोख स्वरूपात पैसे देण्याचा प्रकार आणि विविध प्रकारच्या सवलती देण्याची आमिषे दाखवून रुग्णांच्या माथी औषधे मारण्याचेही उद्योग उघडकीला आले होते. याचा अर्थ औषधांची गुणवत्ता तसेच परिणामकारकता लक्षात न घेता रुग्णांच्या काही अंशी जीवाशी खेळ करताना हा प्रकार नीतीमत्तेचा बाजार ठरतो. उलट डॉक्टरांनी कोणते औषध चांगले आहे, याची खातरजमा केली पाहिजे. ज्या औषधांचा रुग्णांच्या आजारावर परिणाम होत नाही, त्या औषधांविरुद्ध तक्रार करण्याची गरज आहे. परंतु आज समाजामध्ये असा एकही डॉक्टर सापडत नाही, ही दुर्दैवी बाब ठरते. याकरिता राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाला पुढाकार घेऊन दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे. म्हणूनच ज्या रुग्णांवर उपचार होतात. त्यांना एक माणूस म्हणून न वागवता एक ग्राहक म्हणून जेव्हा डॉक्टरांकडून वागणूक मिळत असते त्या वेळेला या सामाजिक अध:पतनाविरुद्ध प्रचंड संताप निर्माण होत असतो.
     आजपर्यंत आपल्या समाजाला या गोष्टींची कल्पना नव्हती तसेच त्याबाबत माहिती करून घेण्याची इच्छाही नव्हती. कारण डॉक्टरांविषयी त्यांच्या मनामध्ये विश्‍वास होता. डॉक्टर अपल्याला फसवणार नाहीत किंवा चुकीची औषधे देणार नाहीत, याबाबत लोकांच्या मनामध्ये श्रद्धा बाळगली जात होती. मात्र, आज ही परिस्थिती पाहायला मिळत नाही. कट प्रॅक्टीस  करून रुग्णांनाच लुबाडण्याचा हा प्रकार समाजातील विघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारा ठरतो. या पद्धतीने होत असलेला औषधी कंपन्यांकडून होणारा गैरप्रकार अधिक कठोरपणे शोधून काढण्याची गरज आहे, असे वाटते. तसेच त्यावर प्रभावी उपाय राबविले गेले पाहिजे. केवळ आयकर विभागाने धाडी घातल्याने कोणताही वचक निर्माण होणार नाही. प्रत्यक्ष कारवाई करणारे कडक कायदे तसेच नियम तयार केले पाहिजे. त्याशिवाय डॉक्टरांना हाताशी धरून आपले मार्केटिंग करण्याचा हा प्रकार थांबणार नाही.
     आरोग्य क्षेत्रामध्ये आणखी एक प्रकार बोकाळल्यामुळे या व्यवसायातील स्पर्धा प्रचंड वाढलेली पाहायला मिळते. मेडिक्लेम पॉलिसी काढल्यानंतर औषधांवर होणारा खर्च हमखासपणे हॉस्पिटल्स किंवा डॉक्टरांना मिळत असतो, ते लक्षात घेऊनच औषधांचा देखील भडीमार केला जात असतो. मेडिक्लेममुळे हॉस्पिटल्स अणि औषधी कंपन्या यांचे उखळ पांढरे झाल्याचे दिसून येते. या वैद्यकीय क्षेत्रात वाढलेली नफाखोरी कोणकोणत्या मार्गाने रचता येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. म्हणूनच अशा प्रकारची व्यापारी प्रवृत्ती वैद्यकीय क्षेत्रात वाढीला लागणे तसेच त्याला डॉक्टरांकडून संरक्षण मिळणे घातकच आहे. डॉक्टरी व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आणणे आवश्यक ठरते.

No comments:

Post a Comment