सोनू गाढव बेरोजगार होता.त्यामुळे त्याचे लग्नदेखील जमत नव्हते. आपल्या या
दुःखी जीवनाला तो पुरता वैतागून गेला होता.
तो कित्येक दिवस कामाच्या शोधात सतत भटकत होता.पण त्याला त्याच्या
योग्यतेची अशी नोकरी मिळत नव्हती. याचे कारण म्हणजे तो जास्त शिकलेलाही नव्हता.
शेवटी वैतागून त्याने नोकरी शोधण्याचे काम त्याने सोडून दिले आणि कुठला तरी एखादा
व्यवसाय करावा, असा निश्चय केला. अर्थात त्याच्याकडे एखादा
मोठा व्यवसाय करावा,इतपत पुरेसा पैसा नव्हता. शेवटी त्याने
कागदाची पाकिटे बनवण्याचा व ते विकण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
तो सकाळ होताच, सायकलला मोठ्या झोळ्या अडकवून सुंदर
वनाच्या गल्ली-बोळांमध्ये जायचा. "ओ द्या...पेपर,रद्दी...
अशी आरोळी ठोकत लोकांकडून वर्तमानपत्रांची,जुन्या
मासिकांची रद्दी गोळा करायचा. मग तो घरी आल्यावर आंघोळ करायचा.जेवण करायचा
आणि निवांतपणे पाकिटे बनवायला बसायचा.संध्याकाळपर्यंत तो खूप अशी पाकिटे
बनवायचा.
दोन-तीन दिवस झाले की,त्याच्याजवळ भरपूर पाकिटे गोळा व्हायची. मग तो ती घेऊन
दुकानदारांना विकून यायचा. यातून त्याला चांगले पैसे मिळायचे.
तो आपले काम मोठ्या कष्टाने मन लावून आणि अगदी प्रामाणिकपणे
करायचा.लवकरच त्याच्या कामाचा चांगला जम बसला. आता तो वनात 'सोनू रद्दीवाला' वाला म्हणून ओळखला जाऊ लागला. तो
प्रत्येक गल्ली-बोळात जाऊन आवाज देऊन रद्दी गोळा करायचा.
रद्दीत त्याच्याकडे विविध प्रकारची जुनी साप्ताहिके,मासिके
आणि जुनी पुस्तकेदेखील यायची. या नियतकालिकांमध्ये छापलेली सुंदर सुंदर चित्रे
त्याला फार आवडायची. त्यामुळे ही नियतकालिके फाडून त्याची पाकिटे बनवण्यासाठी त्याचे
मन तयार व्हायचे नाही.
आता तो फक्त वर्तमानपत्रांचीच पाकिटे बनवायचा आणि विकायचा. रद्दीत आलेली
साप्ताहिके,मासिके तो गोळा करून एके ठिकाणी ठेवून द्यायचा.
वेळ मिळेल,तसे ती वाचायचा. यातून त्याच्या ज्ञानात भर
पडायची. नव-नवी माहिती मिळायची.
अशाप्रकारे त्याच्याकडे पुष्कळ
नियतकालिकं गोळा झाली. एके दिवशी त्याच्या मनात आले की, या जुन्या नियतकालिकांचे दुकान उघडावे. त्याने आपल्या
घराच्या बाहेरच जुन्या मासिकांचे दुकान उघडले. बाहेर एक बोर्ड लिहिला,'सोनू जुन्या पुस्तकांचे दुकान'.
आता सुंदर वनातले प्राणी त्याच्याकडे नियतकालिके विकत घ्यायला किंवा
भाड्याने घेऊन जायला येऊ लागली. काही अभ्यासकदेखील त्यांना हवी असलेली पुस्तके
शोधून घेऊन जाऊ लागली.
हळूहळू तो आपल्या दुकानात नवीन साप्ताहिके,मासिके,
वर्तमानपत्रे, मुलांना लागणाऱ्या शैक्षणिक
वस्तू, वह्या, पुस्तके आणून ठेवू
लागला. त्याचा चांगला उठावही होऊ लागला. त्याच्या दुकानाची भरभराट होऊ लागली. काही
वर्षातच एक वेळ अशी आली की, सुंदर वनातले सगळ्यात मोठे
पुस्तकाचे दुकान म्हणून सोनूचे दुकान नावारूपाला आले.
आता त्याच्या दुकानात ग्राहकांची नेहमीच गर्दी होऊ लागली. कामाचा व्याप
वाढल्याने त्याने त्याच्या दुकानात चार नोकर ठेवले. आता लोक त्याला 'सोनू रद्दीवाला' नाही तर 'सोनू
शेठ' नावाने बोलावू लागले.
लवकरच सुंदर वनातल्या एका धनवान शेठने त्याच्या सुंदर मुलीशी सोनूचे
मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले. अशी सुंदर बायको मिळाल्याने सोनू जाम खूष झाला.
त्याच्या कष्टाचे चीज झाले.
No comments:
Post a Comment