Saturday, March 3, 2018

बहुगुणी चिंच


     आंबट-गोड चिंचेमुळे तोंडाला चव येते. मीठ लावलेली लालचुटूक चिंच पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो. चिंचेची चटणी विविध पदार्थांची चव वाढवते. स्वयंपाक चविष्ट करण्यासोबतच चिंचेचे इतरही काही लाभ आहेत. चिंच कॅल्शियमचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. अशी ही चिंच उत्पन्नाचे चांगले साधनही आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एका चिंचेच्या झाडापासून वर्षाला सुमारे 3 ते 5 हजाराचे उत्पन्न सहज मिळते. 10 वर्षांच्यापुढे दीर्घकाळ उत्पन्न देऊ शकते.

     चिंचकुळात सुमारे 24 उपजाती आहेत. हा वृक्ष मूळचा आफ्रिकेतला. आशिया आणि अमेरिकेत पसरला आहेच शिवाय दक्षिण युरोपातही वाढतो आहे. भारतात तर तो असा एकरूप झाला आहे की, तो भारताचाच वृक्ष बनला आहे. तमर--हिंद म्हणजेच भारताचा खजूर असेही पारशी भाषेत म्हटले जाते.खजुराप्रमाणेच टिकाऊ फळ आहे. हे चिंचफळच मुख्य उत्पन्न आहे. एका पूर्ण वाढ झालेल्या वृक्षापासून साधारणपणे 200 ते 500 किलो चिंच उत्पादन मिळू शकते.
     इतर भाज्या आणि फळांच्या तुलनेत चिंचेत कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण सर्वाधिक आहे. चिंचेच्या गरात कॅल्शियम, फॉस्फरस, रायबोफ्लेविन, नियासिन, थियामिन यासारखी ब परिवारातील जीवनसत्त्वे असतात. असे हे फळ सूर्य प्रकाशात झाडावरच वाळते. त्याचे टरफल गरापासून सुटे होईपर्यंत त्या झाडावरून उतरवल्या जात नाहीत. चिंच फळात सुमारे 55 टक्के भाग हा गराने व्यापलेला असतो. यातला 15 टक्के भाग हा चिंचोक्यांचा असतो. 10 टक्के भाग कवच आणि रेषा (फायबर) असतात.
     या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याने याला मागणीही मोठी आहे. फळांमध्ये प्रती 100 ग्रॅम 150 ते 600 एमजी कॅल्शियम असतं. चिंचेच्या गरातील कॅल्शियमचे प्रमाण 3000 एमजी असते. चिंचेची चटणी, सरबतांच्या नियमित सेवनामुळे शरीराची कॅल्शियमची गरज भागून हाडं, सांधे बळकट होण्यास मदत होऊ शकते. मळमळ, उलटी, अपचन यावर चिंचेचा गर लाभदायी ठरतो. भूक मंदावणे, अन्नावरची वासना उडणे अशा विकारांमध्ये चिंचेचा गर उपयुक्त मानला जातो. चिंचेतील क जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढल्याने अनेक विकारांना दूर ठेवता येतं. चिंचेपासून तयार करण्यात आलेले मिरेपूड घातलेले गरमागरम रस्सम सर्दी घालवण्याचा रामबाण उपाय आहे.  चिंचेचा गर तापावरचं औषध म्हणून वापरला जातो. अर्धा लिटर दुधात 30 ग्रॅम चिंचेचा गर मिसळून हे मिश्रण उकळून घ्यावे. त्यात खजूर, लवंग, साखर, वेलची, कापूर घालावा, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. हे पूर्णपणे घरगुती औषध आहे. खूप खोकला झाल्यास किंवा घसा बसल्यास चिंचमिश्रित पाण्याने केलेल्या गुळण्या लाभदायी ठरतात.
     अशा आरोग्याला अगदीच लाभकारक असलेल्या चिंचेचे सॉस आणि सरबतही बनवतात. चिंचेचे कैर्याच्या पन्हेप्रमाणे पन्हेही बनवतात. भेळ,पाणीपुरी अशात चिंचेशिवाय गोडीच नाही. अनेक खाद्य पदार्थांमध्ये चिंचेचा वापर चव आणण्यासाठी वापरतात.
चिंच जशी उपयोगाची आहे,तशीच तिचे बी म्हणजेच चिंचोकाही फार फायदेशीर आणि लाभकारक आहे. आदिवाशी भागात लोक चिंचोक्याच्या पिठाची भाकरी करून खातात. चिंचोक्याचे खळ बनवतात. इोकर, रेशीम आदी धाग्यांचे कापड विणताना आणि  घोंगड्यांना खळ देताना चिंचोक्याच्या सालीचा उपयोग करतात. चिंचोके भाजून किंवा भिजवून आणि उखडून खातात. चिंचोक्याची पावडर बनवून त्याचा उपयोग गोळ्या आणि बिस्किटे तयार करताना वापरतात. यात पेक्टिन नावाचे द्रव्य असते.त्याचा जेली आणि मुरांबा बनवण्यासाठी उपयोग होतो.
     तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंच वापरतात. चिंचेमध्ये असलेले अॅसिड भांडी अगदी लख्ख आणि स्वच्छ करते. असे बहुगुणी उपयोगाचा असलेला चिंच शेतकर्याला चांगले उत्पन्न देण्यात हातभार लावतो. शिवाय ही मदत त्याला दीर्घकाळापर्यंत मिळत राहते.शेतकरी एका हेक्टरमध्ये 100 झाडांची लागवड करू शकतो. त्यामुळे वर्षाला तो 3 ते 5 लाखांचे उत्पन्न मिळवू शकतो.

No comments:

Post a Comment