रशियाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला उल्का धडकल्याने त्याचा बचाव होणे अशक्य असल्याचे मानले जात आहे. रशियाच्या अंतराळ स्थानकातील कुपीत गळती होऊ लागल्याने अंतराळवीरांना पृथ्वीवर येण्यास अडचण निर्माण झाली आहे. अवकाश स्थानकावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर अंतराळवीरांना साधारणपणे तीन तासांत पृथ्वीवर परत आणले जाते. पण रशियाच्या अवकाशस्थानकातील सध्याची स्थिती नाजूक असून जर परिस्थिती आणखी बिघडली तर सर्व सात अंतराळवीरांना आणणे शक्य होणार नाही, अशी भीती डिडियर शुमेट यांनी व्यक्त केली. अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नवीन अंतराळयान 20 फेब्रुवारी रोजी पाठविणार असल्याचे रशियाची अवकाश संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने सांगितले आहे.
अंतराळात वैश्विक वस्तूंचा आणि मानवनिर्मित कचरा लक्षणीय प्रमाणात आढळून येत आहे. लहान-लहान उल्का अवकाशयानावर आदळणे हे काही दुर्मिळ नाही, असे युरोपीय अवकाश संस्थेतील मानव आणि रोबोटिक संशोधन विभागाचे प्रमुख डिडियर शुमेट यांनी सांगितले. सूक्ष्म उल्का एका सेकंदाला 19 ते 30 किलोमीटर वेगाने फिरू शकतात. बंदुकीतून झाडलेल्या गोळीपेक्षाही खूप वेगाने त्या फिरत असतात. म्हणूनच अवकाश स्थानकाची मोठी निरीक्षण खिडकी ही जेव्हा वापरात नसेल तेव्हा संरक्षक साधनाच्या अत्यंत जाड आवरणाने बंद केलेली असते. लहान उल्का दूरवरच्या विश्वातून आणि अत्यंत वेगाने येत असल्याने त्यांचा माग ठेवणे शक्य होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. परंतु अवकाश संशोधन संस्था ज्ञात उल्कावर्षावांचे निरीक्षण करतात. यंदा ऑगस्टच्या सुरुवातीला उल्कावर्षाव होणार आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात जेमिनिड उल्कावर्षावाची दिशा बदलल्याने सोयुझच्या कुपीला धडकण्याची शक्यता नसल्याचे ‘नासा’ आधी सांगितले होते. असंख्य लहान मोठ्या उल्का सतत विघटनाच्या अवस्थेत असतात. सृष्टीचे हे चक्र कधीच थांबणारे नाही.
शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांसाठी क्षेपणास्त्रांद्वारे उपग्रह नष्ट करणाऱ्या देशांकडून अवकाशातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लक्षणीय भर पडत आहे. मॉस्कोने क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान स्वतःचा एक उपग्रह 2021 मध्ये नष्ट केला. त्यावेळी त्याचे दीड हजारापेक्षा जास्त तुकडे झाले होते. यामुळे ‘आयएसएस’वरील अंतराळवीरांना सुरक्षित आश्रय घ्यावा लागल्याने ‘नासा’ने रशियावर टीका केली होती.चीनने 2007 मध्ये त्याचा एक हवामान उपग्रह पाडला, त्यावेळी साडेतीन हजारपेक्षा जास्त तुकडे निर्माण झाले होते, असा ‘नासा’चा दावा आहे. उपग्रह आणि अवकाशातील वस्तूंच्या अपघातातूनही कचरा वाढत असल्याचे दशकभरापासून दिसत आहे. रशियाच्या सैन्याचा एक निरुपयोगी उपग्रह 2009 मध्ये ‘यूएस इरिडियम कम्युनिकेशन’ उपग्रहाला धडकला होता. भविष्यात अशा घटना गंभीर स्वरूप घेतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अंतराळातील वाढता कचरा ही पृथ्वीसाठी गंभीर समस्या बनत चालली आहे. हा कचरा केवळ मानवनिर्मित नाही, तर त्याहीपेक्षा अधिक वैश्विक वस्तूंचाही आहे. परंतु मानवनिर्मित अवकाशातील कचरा पृथ्वीवरील रहिवाशांसाठी धोका वाढवत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था - नासाही याबाबत चिंतेत आहे.याविषयी विज्ञान मासिक- सायन्समध्ये, नासाचे शास्त्रज्ञ जे.सी. लिओ आणि एन.एल. जॉन्सन यांनी एका संशोधन अहवालात लिहिले आहे की, आपल्या जवळच्या अंतराळात असे कितीतरी हजार मानवनिर्मित तुकडे पृथ्वीच्या कक्षेत तरंगत आहेत, जे आगामी काळात भयावह दृश्य देऊ शक्तीक. या अहवालात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या अंतराळ मोहिमा अजिबात थांबवल्या गेल्या तरी (जे आता शक्य नाही) अंतराळात इतके उपग्रह आहेत की ते तेथे कचऱ्याचेचे प्रमाण वाढवत राहतील.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठी अडचण म्हणजे हा कचरा गोळा करून पृथ्वीवर परत आणण्याची कोणतीही योजना नाही. तथापि, अनेक देश आता या स्पेस वेस्ट मॉनिटरिंग योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहेत. काही काळापूर्वी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो) ने अंतराळ परिस्थिती जागरूकता आणि व्यवस्थापन संचालनालय (डीएसएसएएम) स्थापन केले, जे अंतराळातील कचऱ्याचे निरीक्षण करते. या संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गेल्या वर्षी इस्रोने आपल्या उपग्रहांना कचऱ्याच्या टक्करी होण्यापासून वाचवण्यासाठी वीस बचाव कार्ये हाती घेतली होती. वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कचरा कुठून येतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा कचरा सूर्यमालेतील लघुग्रहांच्या झीज आणि तुटण्या-फुटण्यातून उद्भवतो असा एक सामान्य समज आहे. काही कचरा बाहेरच्या अवकाशातून उल्काच्या रूपातही येतो. पण ही समस्या तेव्हा वाढू लागली जेव्हा मानवाने आपले अवकाशयान अवकाशात पाठवायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या कक्षेत कृत्रिम उपग्रह बसवायला सुरुवात केली. जेव्हा यापैकी काही उपग्रहांनी काम करणे बंद केले किंवा वाहनांमधील काही वस्तू अवकाशातून बाहेर पडल्या किंवा त्या खराब झाल्या, तेव्हा हे सर्व कचऱ्यामध्ये बदलले.
याचे ताजे उदाहरण म्हणजे रशियाने अंतराळ स्थानक सेंटरला (आयएसएस) सहकार्य करण्यास नकार दिल्याने 2030 मध्ये ते कचरा ठरण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये रशियन स्पेस एजन्सीचे तत्कालीन संचालक दिमित्री रोगोझिन यांनी अवकाशात अमेरिका आणि युरोपच्या आर्थिक निर्बंध आणि सहकार्याला उत्तर देताना म्हटले होते की, रशियाशिवाय युरोप, आशिया आणि अमेरिका अवकाशात टिकू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आयएसएस अनियंत्रित होऊन कचऱ्यात रूपांतरित होण्यास किंवा भारत-चीनमध्ये कुठेही पडण्यापासून रोखता येणार नाही. हे खरे आहे की आता अंतराळ क्षेत्र देखील मानवी हस्तक्षेपापासून वाचलेले नाही. माणसाला अंतराळात पोहोचण्याचे अनेक फायदे आहेत आणि तसे तोटेही. गैरसोय म्हणजे एकीकडे तिथे कचरा निर्माण होत आहे आणि दुसरे म्हणजे अंतराळ युद्धाचा धोकाही वाढत आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल, परंतु हे खरे आहे की सर्वात जुना मानवनिर्मित कचरा अजूनही अवकाशात आहे.
2018 मध्ये चिनी अंतराळ केंद्र थियांगॉन्ग-1 कचऱ्याच्या रूपात कधीतरी पृथ्वीवर आदळू शकते, अशी बातमी आल्यावर अंतराळ कचऱ्याच्या भीतीने डोके वर काढले. 2016 मध्ये चिनी अंतराळ संस्थेशी या केंद्राचा संपर्क तुटला. नंतर तो पृथ्वीवरच पडल्याचे सांगण्यात आले. मात्र, पृथ्वीच्या पृष्ठभागावर येईपर्यंत सुमारे नऊ टन वजनाच्या अंतराळ स्थानकाचे वजन एक ते चार टनांपर्यंत कमी झाल्याच्या बातमीने काहीसा दिलासा मिळाला. पण नासाचे पंचाहत्तर टनांहून अधिक वजनाचे स्कायलॅब 1979 साली पृथ्वीवर पडले तेव्हा जगभरात खळबळ उडाली होती, पण कोणतीही हानी न होता समुद्रात पडून ती नष्ट झाली होती.गेल्या सहा-सात दशकांमध्ये विविध देशांच्या अवकाशातील हालचाली वाढल्याने तेथे पृथ्वीवरून पोहोचणारा कचरा वाढत आहे. जुलै 2016 मध्ये, यूएस स्ट्रॅटेजिक कमांडने अंतराळातील सतरा हजार आठशे बावन्न कृत्रिम वस्तूंची नोंद केली, त्यात एक हजार चारशे एकोणीस कृत्रिम उपग्रहांचा समावेश होता. पण तो फक्त मोठ्या वस्तूंचा विषय होता. यापूर्वी 2013 च्या अभ्यासात असे एक सेंटीमीटरपेक्षा लहान 17 कोटी तुकडे आढळले होते आणि एक ते दहा सेंटीमीटर आकाराच्या कचऱ्याची संख्या सुमारे 7 कोटी होती. अंतराळात यादृच्छिकपणे फिरणाऱ्या या गोष्टी कोणत्याही अंतराळ मोहिमेचा काळ बनू शकतात.
काही काळापूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टनच्या संशोधकांनी, गुगल आणि स्पेस एक्स सारख्या खाजगी कंपन्यांच्या भविष्यातील अंतराळ कार्यक्रमांवर नजर टाकून अवकाशात तयार होणाऱ्या कचऱयांच्या नवीन शक्यतांचे मूल्यांकन केले. संशोधकांच्या मते, एकीकडे गुगल आणि एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स येत्या काही वर्षांत जगात वायरलेस इंटरनेटचा वेगाने विस्तार करण्यासाठी आणि पर्यटकांना अंतराळात नेण्यासाठी शेकडो रॉकेट, वाहने आणि उपग्रह अवकाशात पाठवणार आहेत. या योजनांच्या आधारे पुढील काही वर्षांत हे उपग्रह अवकाशात आल्यामुळे त्यांच्यातील टक्करींचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या दरवर्षी उपग्रह आणि त्यांचे तुकडे यांच्यात टक्कर होण्याच्या अडीचशेहून अधिक घटना घडतात.काही काळापूर्वी नासाने अंतराळातील या कचऱ्याला जबाबदार असलेल्या देशांची यादी तयार केली होती. यातील पहिला क्रमांक रशियाचा आहे. त्यापाठोपाठ अमेरिका, फ्रान्स, चीन, भारत, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांचा क्रमांक लागतो. सर्वात जास्त कचरा पृथ्वीपासून पाचशे पन्नास मैल ते सहाशे पंचवीस मैलांपर्यंत पसरलेला आहे. पहिला स्पुतनिक-1 उपग्रह अवकाशात पाठवल्यापासून मानवाने हजारो टन कचरा पृथ्वीच्या बाहेर अंतराळात फेकला आहे.
गेल्या सुमारे पन्नास वर्षात दळणवळण उपग्रह, अवकाश प्रयोगशाळा, मानवरहित वाहने, अंतराळात पाठवलेली मालवाहू वाहने यामुळे अवकाश हे पृथ्वीबाहेरचे एक मोठे कचरा हाऊस बनले आहे. याशिवाय निसर्गाने अशा हजारो लहान-मोठ्या वस्तूंना आपल्या पृथ्वीजवळ अंतराळात स्थान दिले आहे, जे केव्हाही पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकतात आणि मानवी संस्कृतीचा संपूर्ण विनाश करू शकतात. आगामी दशकात उपग्रह अवकाशात सोडताना अवकाशात सोडले जाणारे प्रक्षेपकाचे तुकडे पृथ्वीवर कोसळून व्यक्तीला गंभीर इजा होण्याची किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची सहा ते दहा टक्के शक्यता असेल, असा इशारा एका अभ्यास अहवालात देण्यात आला आहे. हे टाळण्यासाठी प्रक्षेपण करतानाच संबंधित देशाने प्रक्षेपकाचे विलग झालेले भाग सुरक्षित ठिकाणी कोसळविण्याची सोय करावी; यासाठी त्यांना अधिक खर्च आला तरी चालेल, पण जीव वाचू शकतो, असा सल्लाही अहवालाद्वारे देण्यात आला आहे. उपग्रह अवकाशातील कक्षेत सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रक्षेपकाचे काही भाग टप्प्याटप्प्याने विलग केले जातात. ते अवकाशात पृथ्वीच्या कक्षेजवळ तसेच फिरत राहतात. प्रक्षेपकाचे काही तुकडे पृथ्वीच्या कक्षेत शिरताच वेगाने खाली येतात. यातील बहुतेक तुकडे आकाशातच जळून खाक होतात, मात्र काही मोठे तुकडे जमिनीपर्यंत पोहोचतात. कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया या विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या तीस वर्षांत अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची माहिती संकलित करून त्याचा अभ्यास केला आणि पुढील दहा वर्षांत अवकाशातील या कचऱ्यापासून उत्पन्न होणाऱ्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. त्यांचा हा अभ्यास अहवाल ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.2020 मध्ये एका प्रक्षेपकाचा बारा मीटर लांबीचा पाइपचा तुकडा आयव्हरी कोस्ट येथील इमारतीवर कोसळला होता.
प्रश्न असा आहे की या समस्येवर उपाय काय? हा कचरा अवकाशातून गोळा करून पृथ्वीवर परत आणणे हाच यावर उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.मात्र आजही एवढ्या प्रभावी तंत्रज्ञानाचा शोध लागलेला नाही, ज्यामुळे अवकाशातील कचरा साफ करता येईल. परंतु असे तंत्रज्ञान भविष्यात प्रक्षेपित होणार्या उपग्रहांच्या इंजिनांमध्ये आणि बूस्टर रॉकेटमध्ये बसवता येऊ शकते जेणेकरुन वापर केल्यानंतर ते अंतराळात न राहता ते पुन्हा पृथ्वीवर पडतील. एक स्वस्त पर्याय असू शकतो की शटल आपले मिशन पूर्ण करून आणि थोडा फार कचरा गोळा करून सोबत घेऊन येवू शकते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment