पूर्वीच्या आणि आजच्या गुरु-शिष्यामधील नातेसंबंधांमध्ये फार मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या गुरुकूल पद्धतीमध्ये राजा आणि प्रजा यांची मुले एकत्रितपणे गुरुच्या आश्रमात राहून शिकत होती. गुरुच्या सानिध्यात राहिल्यामुळे शिष्यांचे आचार-विचार, वर्तन आणि आहारदेखील समानतेने होत असे. पुढे हळूहळू गुरुकुलाची जागा शाळांनी घेतली. आपोआपच शिष्याचे रुपांतर विद्यार्थी आणि गुरुचे रुपांतर सर, मॅडममध्ये झाले. आजचे विद्यार्थी आता काही तासच शिक्षकाच्या सान्निध्यात असतात. त्यामुळे त्याच्या आचार-विचारात आहारात भिन्नता दिसू लागली.
एकवीसाव्या शतकात वावरत असताना ज्ञानाचा ज्या प्रकारे विस्फोट होत आहे, त्याचा परिणाम निश्चितपणे विद्यार्थी- शिक्षकाच्या नातेसंबंधावर झाला आहे, होत आहेत. एकलव्यासारखा आपल्या शरीराचा भाग तोडून गुरुला देणारा शिष्य आजच्या घडीला कुणालाच मान्य होणार नाही. खुद्द शिक्षकालादेखील नाही. पूर्वीच्या गुरुजींप्रमाणे विद्यार्थ्यांना अधिक वेळ देऊन ज्ञानार्जनाबरोबरच त्यांच्यावर अधिक योग्य संस्कार करुन एक सुजाण व संवेदनशील नागरिक बनेल, असा विचार करणारे शिक्षकही फार थोडे मिळतील. आज समाजामध्ये शिक्षकांच्या प्रतिमेची उंची मोजली जाते, तीच मुळी त्याच्या गुणवत्ता यादीत येणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन आणि निकालाच्या टक्केवारीवरुन. मात्र संवेदनशील व सुजाण नागरिक मिळवून देणार्या शिक्षकाचा विचारच केला जात नाही.
आजचा विद्यार्थी व्यवहारी बनत चालला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नातेसंबंधांमध्ये आता पालकाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणारे नोकरदार दाम्पत्य -पालक पाल्याची संवेदनशीलता हळूहळू कमी करत आहेत. ते पाल्याशी जशी व्यवहारी भूमिका ठेवतात, तशीच भूमिका तो शिक्षक आणि समाजाशी ठेवताना दिसतो.
गुरु शिष्याच्या नातेसंबंधात बदल व्हायला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे वर्गातील विद्यार्थी संख्या. विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका त्याच्याजवळच राहातात. खासगी शिकवण्यांमुळे तर संवेदनशीलता आणखी बोथट झाली आहे. पैसे देऊन शिक्षण घेण्यामुळे शिक्षकाच्या प्रतिमेला किंमत उरली नाही.
पाठ्यपुस्तकामध्ये असणारे त्रोटक आणि कालबाह्य ज्ञान. हेदेखील गुरु-शिष्याच्या नातेसंबंधाच्या बदलला कारणीभूत आहे. आज मध्यमवर्गीय घरांमध्ये संगणक आला आहे, स्मार्टफोन अवतरला आहे. यातून विद्यार्थ्याला घरबसल्या ज्ञान मिळत आहे. शाळेत मात्र शिक्षक कालबाह्य शिक्षणाचं रतीब घालतो आहे. त्यामुळे शाळेतलं शिक्षण निरुत्साही होत आहे. प्रचलीत शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत, कमी श्रमात अधिक गुण मिळवून देणारं परीक्षा तंत्र हवं आहे. हे तंत्र वापरुन अध्यापन करणारा शिक्षक विध्यार्थ्यांना आणि पालकांना हवा आहे. विध्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाचे धडे देणारे, समाजमूल्यांची रुजवण करणारे शिक्षक अप्रिय वाटत आहेत.
शिक्षक-विध्यार्थ्यांमधले नातेसंबंध दृढ करायचे असेल तर पहिल्यांदा शिक्षणपद्धती बदलली पाहिजे. परीक्षा तंत्राला दुय्यम स्थान असायला हवे. पाठ्यपुस्तके त्रोटक असू नयेत. नव्या तंत्रासह , ज्ञानासह विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. नवी साधने शाळांमध्ये अवतरली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या अध्यापन विषयांबद्दलचे ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. त्याचबरोबर इतर विषयांचे ज्ञानदेखील आत्मसात केले पाहिजे.वेळेच्या चौकटी मोडून विद्यार्थ्यांशी ज्ञानार्जन, हितगुज करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांतील गुण हेरुन, त्याचा कल पाहून त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन देण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.तरच विद्यार्थी-शिक्षकांमधील अपेक्षित नातेसंबंध पाहायला मिळेल.
No comments:
Post a Comment