Sunday, September 16, 2012

पारंपारिक शिक्षणाची चौकट मोडायला हवी

     बदलत्या काळाचा वेग लक्षात घेता  पारंपरिक शिक्षण कुचकामी ठरत आहे. आता ही पारंपारिक चौकट मोडण्याची  नितांत गरज असून  आता  येणार्‍या काळात कौशल्याधारित शिक्षण अनिवार्य बनले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्याशाखांच्या बंधनातून मुक्त करून स्वायत्त शिक्षणाची कवाडे खुली करून देणे आवश्यक आहे. शिवाय ज्ञानाचा उपयोग इथेच केला जावा, अशी व्यवस्था, सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत.
सध्या उच्च शिक्षणापुढे अनेक आव्हाने उभी आहेत.  दहा वर्षांतील स्थित्यंतराने सारे काही ढवळून निघाले आहे. पारंपारिक शिक्षणापलिकडे परिस्थिती गेली आहे. त्यादृष्टीने काळाची पावले ओळखून उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल अपेक्षित आहे. खरे तर मुळात उच्च शिक्षणाकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच कमी आहे.  त्यातच  पायाभूत सुविधांचा अभाव, चांगल्या शिक्षकांची कमतरता, अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्याची कसरत आणि  विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षण घेण्याच्या सुविधेचा अभाव अशी अनेक आव्हाने उच्च शिक्षणापुढे आहेत. मात्र, त्यासाठी केवळ विद्यार्थी किंवा प्राध्यापकांना जबाबदार धरता येणार नाही, तर ती सामुहीक जबाबदारी असूनतासाठी सगळ्यांनीच  या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला  हवा.
     सध्या इंग्रजी शिक्षणाचा बाऊ अगदी पूर्वप्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत करण्यात आला आहे. त्याचा दवाब सर्वच स्तरावर आहे. त्याची गरज असली तरी मातृभाषेतूनही पर्याय शोधला जाऊ शकतो. चीनसारख्या देशाने त्याचा चांगला उपयोग केला आहे. आपण त्यादृष्टीने प्रयत्न केलेच नाहीत. इंग्रजी शिकणे म्हणजे उच्चकोटीचे ज्ञान मिळवणे, असा काही तरी चुकीचा समज करून घेतला गेला आहे.   या इंग्रजीच्या प्रभावाखालील शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांमद्ये कमालीचे न्यूनत्व निर्माण झाले आहे. पहिल्यांदा त्यातून बाहेर काढन्याची आवश्यकता आहे.  आज मिळणार्‍या उच्च शिक्षणानंतर आपण परदेशांतील समस्या सोडवण्यावर आपले ज्ञान खर्ची घालत आहोत. ही स्थिती बदलून आपल्यासमोरील आव्हानांचा शोध घ्यायला हवा आणि  त्यानुसार शिक्षणपद्धती आखायला हवी.
     प्राथमिक व माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र अजून तशा भौतिक साधनांच्या सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तेथून लगेच आऊटपूट निघणार नाही. त्याला थोडा काळ जावा लागणार आहे. महाविद्यालयातसुद्धा   विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. आज तशी व्यवस्था शाळेपासून ते महाविद्यालयांपर्यंत  काही अपवाद सोडले तर फारसा वावच नाही.  

     आज  विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असेल तर त्यांच्यासाठी संधींची वानवा कधीच नाही.  विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची प्रेरणा देण्याऐवजी आपण त्यांना शिकवत बसतो. त्यामुळे प्रवेश, परीक्षा, निकाल या दुष्टचक्रात विद्यार्थी अडकतो व त्याचा विकास खुंटतो. शिक्षणाची नवीन मॉड्युल्स विकसीत होणे गरजेचे आहे. आपल्याकडील  परंपरागत शिक्षणाला आता फाटा देण्याची ही काळाची गरज आहे. आपल्याकडे परदेशातील उदाहरणे दिली जातात. मात्र, त्या प्रकारची पायाभूत सुविधा मात्र उपलब्ध नाहीत. सरकारने यागोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांनीही निव्वळ पैसा कमावणे, हे आपले उदिष्ट्य कदापि ठेवता कामा नये. गल्लीबोळातल्या शिक्षण सम्राटांमुळे शिक्षण कमालीचे उथळ झाले आहे. चांगल्या प्राध्यापकांची मोठी कमतरता आहे. कुशल बुद्धीमत्ता असणारे शिक्षकी पेशाकडे आकर्षित होत नाही, ही मोठी समस्या आहे. यावरही विचार व्हायला हवा आहे.
     शिक्षणामध्ये आजकाल फॅशन वाढत चालली असून, त्याचे झपाट्याने व्यावसायिकीकरण होत आहे. ज्ञान, समज, कौशल्य आणि प्रत्यक्ष वापर ही शिक्षणाची तत्त्वे विसरतोय. शिक्षणामध्ये सातत्य, स्थिरता, प्रगती आणि विकास या बाबी येणे गरजेचे आहे. शिक्षण ही आंतरिक गरज बनून त्यातून सर्जनशीलतेचा विकास व्हायला हवा. तरच खर्‍या अर्थाने विद्यार्थी घडविणे शक्य होणार आहे.
     प्राध्यापक आणि पालकांनीही मुलांच्या जडणघडणीत योगदान देणे व डोळस राहणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. हवे ते शिक्षण घेण्यासाठी कर्जाची सुविधा सहजसुलभपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे गुणवत्ता वाया जात आहे. गुणवानांना संधी मिळण्याच्यादृष्टीकोनातून सामाजिक संस्था, सरकारे यांनी अधिकाधिक प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी नॅशनल फंड उभारावा व माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभारली गेली पाहिजे. .
      महत्त्वाची बाब म्हणजे आपली भारताची  अर्थव्यवस्था आजही कृषीकेंद्रीत आहे. पण या क्षेत्राच्या शिक्षणाकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही.  सध्याचा ट्रेंड फक्त आयटी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी भोवती घुटमळणारा आहे. कृषी क्षेत्रातही आयटीचा वापर करून उच्च शिक्षणात त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.                                        

No comments:

Post a Comment