बॉलीवूडमध्ये कधी काय पॉप्युलर होईल, सांगता येत नाही. एक ट्रेंड चालला की, त्याच धर्तीवर भारंभार चित्रपट निघायला लागतात. बकर्या जसं एकामागून एक चालत जातात.सध्या आयटम नंबर्सचा बोलबाला आहे. त्याच्याशिवाय अलिकडे फिचरच बनत नाहीत, अशी अवस्था आहे. अगोदर आयटम नंबर्स फक्त प्रसिद्ध नट्या करायच्या. पण अलिकडच्या काळात नट्यांची जागा पुरुष कलाकारांनीही घेतली आहे. प्रसिद्ध अभिनेतेही आता आयटम नंबर्स करायला लागले आहेत. शिवाय नृत्याचे वेगवेगळे प्रकार पडद्यावर येऊ लागले आहेत. सध्या लावणीची भन्नाट क्रेझ आहे.
महाराष्ट्राच्या दिलखेचक लावणी नृत्यप्रकारावर बॉलीवूडमधल्या नट्या आख्ख्या देशाला घायाळ करायला निघाल्या आहेत. आतापर्यंत अनेक प्रकारचे नृत्य प्रकार पडद्यावर साकार झाले आहेत. आणि त्यांनी त्याची 'धमाल' ही उडवून दिली आहे. पण बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्याला आपला हा बॉलीवूड तरी कसा अपवाद असणार? त्यामुळे सध्या निर्मात्यांची नजर या लावणी प्रकारावर पडली आहे. महाराष्ट्राच्या फक्कड लावणीनेही धमाल उडवायला सुरुवात केली आहे. बॉलीवूडच्या नट्यांना तर या महाराष्ट्राच्या लावणी नृत्यप्रकाराने वेड लावले आहे. त्या लावणी करायला उत्सुक आहेत. कटरिना कैफच्या 'चिकनी चमेली...' आणि विद्या बालनच्या 'माला जाऊ दे...' नंतर आता राणी मुखर्जीसुद्धा लावणीचे ठुमके लगावणार आहे. तिच्या आगामी 'आइया' चित्रपटात ती चक्क तीन आयटम नंबर्स करते आहे. त्यात एक लावणीही आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात राणी मुखर्जी मराठी मुलीची भूमिका साकारत आहे. या अगोदर 'डर्टी गर्ल' विद्या बालनने 'फेरारी की सवारी' मध्ये 'माला जाऊ दे...' च्या गाण्यावर लावणी सादर करून धूम उडवून दिली होती. वेगळ्या ढंगाने सादर केलेल्या लावणीमुळे विद्यासुद्धा कमालीची खूश होती. तिने यापूर्वी लावणीवर नृत्य कधी केले नव्हते. तिला हा आयटम इतका आवडला की, तिने हे गाणे तीन दिवसांत शुट करून दिले. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच लावणी सादर होतेय, अशातला भाग नाही. कारण यापूर्वी या नृत्य प्रकारावर अनेक गाणी हिट झाली आहेत. प्रसिद्ध नृत्य तारका हेलन हिने 'इन्कार' (१९७८) मध्ये 'मुंगडा...' लावणीवर ठुमके लगावले होते. ते गाणे आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सव, लग्नाच्या वरातींमध्ये हे गाणे हमखास वाजताना दिसते. मात्र मध्यंतराच्या काळात बॉलीवूडच्या पडद्यावरून लावणी गायब झाली होती. पुन्हा लावणीची क्रेझ यायला मराठी चित्रपट कारणीभूत आहेत. ६० -७० च्या दशकातली लावणी आता नव्या रुपात, ढंगात मराठी पडद्यावर आली आहे. 'अजय-अतुल' या संगीतकार जोडीकडे खासकरून याचे श्रेय जाते. 'अग्निपथ' या हिंदी चित्रपटात 'चिकनी चमेली...' ला संगीत त्यांचेच आहे. कटरिना कैफ यात बेधुंद होऊन नाचली आहे. आता त्यामुळे अनेक बॉलीवूड नट्या लावणीवर ठुमके मारायला उत्सुक आहेत.
तुर्तास राणी मुखर्जीने यात बाजी मारली आहे. लावणी म्हटली की हिट होणारच! पण याचा फायदा राणीचे करिअर सावरायला होणार का , हे मात्र पाहावे लागेल.
मैं कोल्हापूर से आयी हूं। ही लावणी शाहरुख खान च्या अंजाम चित्रपटात माधुरी दीक्षित वर चित्रित करण्यात आली होती।
ReplyDeleteहिरोईन बना देना सव्वा डॉलर चडाएनगी बदले में र ही लावणी अय्या चित्रपटात राणी मुखर्जी वर चित्रित करण्यात आली आहे.
ReplyDelete