पावसाची आठ नक्षत्रं कोरडी गेल्यानं सगळ्यांच्याच घशाला अक्षरशः कोरड पडली असताना शेवटच्या हस्ता नक्षत्रानं सगळ्यांचीच आशा पल्लवीत केली आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीही सुखावला आहे. मात्र एवढ्यावर भागणारं नाही. अजून पावसाची गरज आहे. तेवढं हस्तानं जाता जाता मुक्त हस्तानं द्यावं, हीच भावना सगळ्यांची आहे.
चार महिन्यात पाऊसच झाला नसल्यानं विहिरी, तळी, बोअर सारं काही आटलं आहे. पिण्यासाठी, धुण्या-भांड्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणून आणून जीव मेटाकुटीला आलेला आहे. पुढं काय आणि कसं, याचा विचार करून लोकांच्या आणि सरकारच्या तोंडचं पाणी पळालं आहे. आणि अशा बिकट परिस्थितीत हस्त मदतीला धावून आला आहे, असे वाटते आहे. पावसाळी नक्षत्राचा नववा व शेवटचा हस्त नक्षत्र पाऊस घेऊन आला आहे. त्यानं चोहोबाजूला बरसायला सुरूवात केल्यानं लोकांच्या जिवाची तगमग जरा कमी झाली आहे. पण याच्याने थोडंच भागणार आहे? पाण्याची पातळी पार रसातळाला गेली आहे. आठशे फुट बोअर मारली तरी पाणी निघेना, त्यात पावसानं दगा दिलेला. पण जाता जाता फुंकर मारून लोकांच्या जिवाची आग विझवण्याचं काम हस्त नक्षत्रानं केलं आहे. पण हस्ताला सगळ्यांची हात जोडून विनंती आहे. जाताना पाणी पाणी करून जा. नाही तर लोकांच्या तोंडचं जायला पाणीही शिल्लक राहणार नाही.
एक गोष्ट सांगितली जाते. बादशहाने एकदा दरबारी मंडळींना प्रश्न केला. "सत्तावीस वजा नऊ किती?" दरबारातले सगळे सरदार-मनसबदार एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. किती सोपा प्रश्न... आज बादशहाला झालंय तरी काय? कोड्यातलं विचारायचं कठीण प्रश्न सोडून हे लहान पोराला पुसावं तसं आम्हाला सोपं प्रश्न का पुसतोय, याचा त्यांना उलगडा होईना. कारण उत्तर अठरा येणार, हे शाळेतलं शेंबडं पोरगंही सांगतंय. त्यामुळे बादशहाची तब्येत तरी बरी आहे का, म्हणून दरबारी मंडळी बादशहाला रोखून पाहू लागली. पण प्रत्यक्षात कुणी काहीच बोलेना!
सगळेच असे गप गप आपल्या निरखत्यात म्हटल्यावर बादशहा बिरबलला म्हणाला, "अरे बिरबल, तू तरी सांग याचं उत्तर. का तूही यांच्यासारखा मठ्ठ उभारणार आहेस?" बिरबल उठला आणि म्हणाला, " खविंद, सत्तावीस वजा अठरा म्हणजे शून्य!" बादशहा हसला, म्हणाला," बिरबल! तुझं गणित मोठं अजबच आहे. सत्ताविसातून नऊ गेल्यावर शून्य उरतात, हे कसं काय शक्य आहे ते सांग."
"सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रं गेल्यावर राहिलं काय? पाऊस नसेल तर सगळं शून्यच!" बिरबल म्हणाला. असा हा पाऊस. पाऊस नसेल तर काहीच नाही. सारं जीवनच संपून जाईल. त्यामुळेच बिरबलचं 'शून्य' हे उत्तर अगदी बरोबर म्हणायला हवे. तशी भयंकर अवस्था सध्या दुष्काळी भागाची झाली आहे. सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांची अवस्था पाण्यावाचून खूपच वाईट झाली आहे. पावसाचे चारही महिने असेच गेले. त्यातली पावसाची आठ नक्षत्रंही कोरडीच गेली. जनावरांचा चारा संपला, प्यायला पाणी मिळेना, हाताला काम नाही, अशा दरिद्री अवस्थेत हस्त नक्षत्राने ऊर्जितावस्था आणली. थोडा पाऊस झाल्याने शेतकरी स्फुरला. त्यानं रब्बीच्या कामाला घाई लावली आहे. पुढे पाऊस पडेल न पडेल पण निदान जनावराला बाटुक तरी येईल, या आशेवर पेरणीची घाई करतो आहे.
पाऊस पडावा म्हणून माणसाने नाही नाही ते केले. वरुणराजाची नाना तर्हेने आळवणी केली. बेडकांची लग्नं लावली, गाढवाची मिरवणूक काढली, यज्ञ-याग केले. त्यासाठी विठ्ठलाला, गणपतीला साकडे घातले. पण परिणाम शून्य! शेवटी सगळे दैवाच्या भरवशावर सोडले... पण हस्त नक्षत्राने आशा दिली आहे. शेवटी जाता जात बरसून जा, हीच आळवणी जो तो करतो आहे.
मृग, आर्द्रा,पुनर्वसू,पुष्य,आश्लेषा, मघा,पूर्वा,उत्तरा आणि हस्त ही पावसाची नक्षत्रं. सूर्य मृग नक्षत्रात आला की, पावसाळा सुरू होतो आणि तो चित्रा नक्षत्रात गेला की, पावसाळा संपतो. म्हणून मृग ते हस्त ही सारी पावसाची नक्षत्रे मानली जातात. पाऊस म्हणजे जीवन. आपली शेती याच पावसावर फुलते,पिकते. म्हणून एका लोकगीतात एक बहीण म्हणते-
पड पड तू पावसा।
माळा मुरडाच्या झाल्या वाती।
कुनबी आल्यात काकुळती॥
पड पड तू पावसा।
पिकू दे मूगराळा।
बंधु माझा लेकुरवाळा॥
पड पड तू पावसा।
नको बधू तालामाला।
व्हईल दुबळ्या भाजीपाला॥
No comments:
Post a Comment