Tuesday, October 20, 2020

महिलांवर होणारे सोशल मीडियावरील आभासी अत्याचार


देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या उद्विग्न करणाऱ्या, धक्कादायक घटना मोठ्या संख्येने वाढत आहेत तर दुसरीकडे त्याचे राजकारण केले जात आहे. यामुळे देशातला प्रत्येक नागरिक पार गोंधळून गेला आहे. काय चाललं आहे आपल्या देशात असा त्याला प्रश्न पडला आहे. आणि जो तो विचारतो आहे, शेवटी या घटना थांबणार तर कधी? मुलगी कुणाचीही असली तरी शेवटी ती या भारत मातेचीच आहे.या देशाची पुत्री आहे, मग यावर राजकारण का होत आहे? संयुक्त राष्ट्रच्या एका अहवालानुसार संपूर्ण जगभरात जवळपास पस्तीस टक्के महिला कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडत आहेत. प्रत्यक्ष शारीरिक, मानसिक त्रासाला त्यांना तोंड द्यावे लागत आहेच, शिवाय दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडियाचा वापर आता अनिवार्य झाला आहे,पण याबाबतची  धक्कादायक गोष्ट अशी की, ज्या सोशल  मीडियाचा सर्वाधिक वापर केला जातो, त्यावरच जगातील साठ टक्के महिलांसोबत विविध प्रकारच्या अत्याचार करणारे व्यवहार पाहायला मिळत आहेत. जरी हे अत्याचार शारीरिक नसले तरी या ऑनलाईन दुर्व्यवहाराला,अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची मानसिक अवस्था शारीरिक अत्याचारास बळी पडलेल्या महिलांसारखीच होऊन जाते.  या अत्याचाराला कंटाळून सोशल मीडियावरील अत्याचारास बळी पडलेल्या सुमारे वीस टक्क्यांपेक्षा अधिक महिलांनी आपले सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करून टाकले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व्हेक्षण भारतासह 22 देशांतील चौदा हजारापेक्षा अधिक महिलांमध्ये करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणानुसार 39 टक्के महिलांसोबत ऑनलाईन अत्याचाराच्या घटना फेसबुकवर होतात. इंस्टाग्रामवर अत्याचारास बळी पडलेल्या महिलांची संख्या 23 टक्के आहे. चौदा टक्के महिलांसोबत व्हॉटसअपच्या माध्यमातून अत्याचार केले जातात. स्नॅपचॅटवर दहा टक्के,ट्विटर वर नऊ टक्के आणि सहा टक्के अन्य ऍपच्या माध्यमातून महिलांना अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. याच वर्षी दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये केल्या गेलेल्या एका सर्व्हेक्षणामधून कळलं आहे की, इंटरनेटवर महिलांसोबत अत्याचाराच्या घटना 36 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तर या ऑनलाईन अत्याचाराच्या बाबतीत शिक्षेचे प्रमाण मात्र चाळीस टक्क्यांवरून घटून 25 टक्क्यांवर आले आहे. याचा सरळ अर्थ असा की, या माध्यमातून स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यामुळेच त्यांचे धाडस आणखी वाढलं आहे. ऑनलाईन अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांची मानसिक स्थिती वास्तव आयुष्यात अत्याचारास बळी ठरलेल्या महिलांपेक्षा अधिक वाईट होते. अत्याचार जर कुठल्या वर्चुअल प्लॅटफॉर्मवर होत असेल तर ती वास्तव जीवनात होणाऱ्या अत्याचारापेक्षा अधिक भयंकर असते. सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्मचा खरा हेतू  तर लोकांना जवळ आणण्याचा आहे. पण आता याला वेगळेच वळण मिळत आहे. ऑनलाइन अत्याचार आणि छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे आता जवळपास 69 टक्के महिला आपले अकाउंट प्रायव्हेट ठेवण्यास पसंद करत आहेत. महिलांच्याबाबतीत असुरक्षा आणि भेदभावसारखी परिस्थिती वास्तव जीवनात तर आहेच पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी दुनियेवरही प्रभाव टाकत आहे. म्हणजे एकंदरीत महिलांसोबत छेडछाडीसारख्या घटनांना आता घराच्या बाहेर नाहीतर सोशल मीडियावरदेखील घरबसल्या ( जिथे आहे तिथे) तोंड द्यावे लागत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्यावेळेला वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्मला सुरुवात झाली,त्यावेळेला सांगितलं जात होतं की, या आभासी दुनियेत सगळ्यांना समसमान संधी मिळेल, इथे महिला आणि पुरुष असा कुठला भेदभाव असणार नाही. पण आजची एकूण परिस्थिती पाहिल्यावर असे दिसते की, सोशल मिडीयाच आता समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांसोबत भेदभाव करणारे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. भविष्य काळाबाबत विचार केला गेला होता की, डिझिटल दुनियेत तरी महिलांना सन्मान मिळेल,पण दुर्दैव हे की, डिझिटल दुनियेतही महिलांविरोधात होणारे अत्याचार आणि त्यांचा होणारा अपमान आता सगळ्या मर्यादा ओलांडत आहे. याविरोधात पीडित महिलांनी आवश्य आवाज उठवण्याची गरज आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दाद मागता येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे यासाठी सायबर समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या समित्या अन्य काही राज्यातही स्थापन झाल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीडित  महिलांनी अत्याचार सहन करत बसू नये किंवा त्यापासून पळून जाऊ नये. कायद्याच्या आधारावर त्याला तोंड द्यायला हवे आणि अशा अत्याचार करणाऱ्या लोकांना शिक्षा व्हायला हवी, तरच महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबणार आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment