Wednesday, September 30, 2020

स्त्री-स्वातंत्र्य आणि गांधीजी


महात्मा गांधी यांनी भारतातल्या दबलेल्या व दाबलेल्या जनसमुदयाच्या विकासासाठी कार्य केले आहे. भारतीय स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना न्यूनगंड व भयगंडमुक्त केले. त्यांची योग्यता आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे असलेले महत्त्व यांची जाणीव करून दिली. आपणही देशासाठी काहीतरी करू शकतो, याचा विश्वास स्त्रियांमध्ये निर्माण केला. खरे तर गांधीजींना स्त्री-शक्तीची जाणीव पहिल्यांदा आफ्रिकेत झाली. आफ्रिकेतील सत्याग्रहाचे नेतृत्व करताना गांधींनी स्त्रियांना पाहिले,तेव्हा त्यांना जाणवले की सहनशक्ती आणि विश्वास यातून निर्माण झालेले कणखर मन यांची नेतृत्वासाठी गरज आहे. आणि या दोन्ही गोष्टी स्त्रियांमध्ये असल्याचे दिसून आले. भारतात आल्यावर स्त्रियांना स्वातंत्र्य लढ्यात आणण्याचे काम त्यांनी केले. स्वयंपाक घरातून सामान्य स्त्रीला त्यांनी सत्याग्रहासाठी घराबाहेर काढण्याची किमया केली. 

गांधीजी स्त्रियांना उद्देशून म्हणत असत,'भगिनींनो, तुम्ही राष्ट्राची अर्धी शक्ती आहात.राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी तुमचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्य व अहिंसेवर आधारित माझ्या संकल्पित लढ्यात भाग घेण्यास तुम्ही समर्थ आहात.तुमची शक्ती जागृत झाली की, तुमच्यात सामर्थ्य येईल. त्या सामर्थ्यावर या देशात जी परकीय सत्ता आपल्या इच्छेविरुद्ध आपल्यावर राज्य करत आहे ती नाहीशी झाल्यावाचून राहणार नाही. या देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे. पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा अधिक निष्ठेने कार्य करण्याची शक्ती तुमच्यात आहे. 

आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ते म्हणत, 'स्वातंत्र्य हा प्रत्येक राष्ट्राचा व प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे व ते तो मिळवणारच ,असा विश्वास असेल तर तुम्ही आपल्या घरातील स्त्रियांना प्रथम अनिष्ट प्रथा व चालीरीती यांपासून मुक्त केले पाहिजे. त्यांची सर्वांगीण वाढ व प्रगती केली पाहिजे.' गांधीजींच्या या विचारामुळेच स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्याऱ्या दाम्पत्याची संख्या अधिक होती. स्त्रियांचा सहभागही उल्लेखनीय होता. गांधीजींनी फक्त भारतीय राजकारणात क्रांतिकारक बदल घडवून आणला नाही तर स्त्रियांच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनातही बदल घडवून आणला. स्त्रियांचा अहिंसेच्या मार्गाने देशाच्या राजकारणात प्रवेश झाल्यामुळे आश्चर्यकारक परिणाम स्वातंत्र्य लढ्यावर दिसून येऊ लागला. एका बाजूला स्त्रियांना आपल्या कुवतीची व ताकदीची जाणीव झाली तर दुसऱ्या बाजूला अहिंसेच्या मार्गाने मानवी व नैतिक मूल्ये राजकारणात आली. 

गांधीजींचा आपल्या अहिंसेच्या मार्गावर पूर्ण विश्वास होता. ग्रामीण व नागरी स्त्रिया ,शिक्षित व अशिक्षित , भारतीय व विदेशी महिला गांधीजींच्या विचारसरणीकडे आकृष्ट झाल्या. यात सरोजिनी नायडू, अनसूयाबेन साराभाई, विजयालक्ष्मी पंडित, मीराबेन, लक्ष्मी मेनन, सुशीला नय्यर, राजकुमारी, अमृत कौर यांचा समावेश आहे. गांधीजींनी स्त्रियांच्या मनात फक्त स्वातंत्र्य मिळवण्याचा अंगार फुलवला नाही तर त्यांनी स्त्रियांना आत्मोद्धाराचीही प्रेरणा दिली. मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह आदी सर्व सत्याग्रहांमध्ये शेकडो स्त्रिया सामील झाल्या. स्त्रियांनी समाजजागृतीसाठी कीर्तने,भजने, बैठका, स्वातंत्र्य लढ्यावरील पुस्तकांची विक्री, खादी विक्री, दारूच्या दुकानांवर निदर्शने, परदेशी मालाच्या व कपड्यांच्या होळया करणे आदी कार्यक्रम राबवले. शेकडो महिला तुरुंगात गेल्या.

गांधीजींनी स्वदेशी चळवळीसाठी स्त्रियांना प्रोत्साहित केले. यामुळे  परदेशी वस्तू घरी आणायच्या नाहीत, असे महिलांनी पुरुषांना बजावले. परिणामी विदेशी वस्तू आणल्या तर जाळून टाकू, असे स्त्रिया घरोघरी सांगू लागल्या. आणि तसे त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलेही. विशेषतः श्रीमंत पारशी व गुजराथी स्त्रियांनी आपल्या नवऱ्यांचे कपडे आगीत भस्म केले. गांधीजी स्त्रियांशी बोलताना अनेक वेळा त्यांच्यासमोर परंपरागत आदर्श नव्या स्वरूपात मांडत. सीता, द्रौपदी, मीराबाई या थोर स्त्रिया होत्या. ही गोष्ट भारतीय स्त्री-पुरुषांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्यात नवीन काही नाही. गांधीजींनी नव्या विचारांना चालना दिली. ते सांगत,'सीता दुबळी नव्हती.अतिशय कठीण व गंभीर परिस्थितीत तिने नैतिक धैर्य दाखविले होते. मीराबाई ही असामान्य धैर्यवती होती. तिने जो विचारपूर्वक मार्ग निवडला, त्या मार्गावरून सामाजिक व कौटुंबिक विरोधाला न जुमानता ती चालत राहिली. म्हणून या गोष्टी स्त्रियांना आजही आदर्शच आहेत.'

स्त्रीला दुबळी मानणं हा पुरुषांनीत्यांच्यावर केलेला अन्याय आहे, असे ते मानत. 'शक्तीचा अर्थ जर नैतिक शक्ती हा असेल तर स्त्रिया या पुरुषांपेक्षा किती तरी पटीने सशक्त आहेत. स्त्रियांची सहनशक्ती, स्वार्थत्याग, अतुल धैर्य या गोष्टी त्यांच्या सशक्ततेची उदाहरणे आहेत. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे.' अशी मांडणी ते करीत. गांधीजी म्हणत की, स्त्रीला गुलामाचा दर्जा हा शेकडो वर्षे चालत आलेल्या अनिष्ट प्रथेतून दिला गेला. कायदे सगळे पुरुषांनीच केले. स्वतःच्या फायद्याचे केले. ही

परिस्थिती सुधारण्याचा स्त्रियांसमोर असलेला एकमेव मार्ग म्हणजे त्यांची आग्रही इच्छाशक्ती. आपल्याला नेमके काय हवे ते ठरवून ते प्राप्त करून घेण्याबाबत त्या सजग व समर्थपणे उभ्या राहिल्या पाहिजेत. स्त्रियांनी बेजबाबदार व सुखलोलुप बनू नये, असे त्यांचे म्हणणे असे. गांधीजींनी बालविवाह, विधवांचे दमन, जरठ कुमारी विवाह, हुंडा व पडदा पद्धतीला विरोध केला. हरिजनांच्या प्रश्नाशी त्यांनी स्त्रियांना अगदी तर्कशुद्धतेने जोडले. हरिजन व भंगी हे जर घाण काम करणारे लोक आहेत म्हणून अस्पर्श असतील तर आई मुलासाठी हेच काम करते ना? ती अस्पर्श असते का? आई जे काम आपल्या मुलासाठी करते, ते काम हरिजन समाजाकरिता करतात. ते समाजाची आईप्रमाणेच सेवा करतात ना? मग ते अस्पर्श कसे? म्हणून गांधीजींनी स्त्रियांना सांगितले की, जातीयवादातून पुरुषांची मुक्तता करणे, हे स्त्रियांनाच शक्य आहे. 'पुरुषांनी हरिजनांना घरात घेतले पाहिजे व माणूस म्हणून वागवले पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही घरात स्वयंपाक करणार नाही. कारण हेच काम आम्हीही आमच्या मुलांसाठी करतो...' असे म्हणत नगरच्या जानकीबाई आपटे, मालवणच्या महालसा भांडारकर यांनी हरिजन मुलींना घरात ठेवून घेऊन घेतले आणि समाजाला धडा घालून दिला. गांधींच्या विचारसरणीत भारतीय स्त्रीला स्वतःची नवी प्रतिमा प्राप्त झाली. आपल्या अंगभूत गुणांची जाणीव झाली आणि स्त्री- पुरुष समानतेचे महत्त्वही कळले. 


No comments:

Post a Comment