इरीदु नगरात राहत होता अदमा. एक सर्वसामान्य मनुष्य. दिसायला दुसऱ्या मनुष्यांसारखाच! ना श्रीमंत, ना गरीब. पण खूप कष्टाळू होता,त्यामुळं त्याचं आयुष्य छान चाललं होतं. पण तरीही त्याच्यात असं काही तरी होतं, जे दुसऱ्या मनुष्यांमध्ये नव्हतं. त्याला देवानं निवडलं होतं, कारण तो नित्यनेमाने देवळात जायचा. मनोभावे पूजा करायचा.निष्ठेनं देवळातील सर्व कामं करायचा.
एके दिवशी अदमा देवळात गेला. त्याला आवाज ऐकू आला,"मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्यावर माझी सदोदित कृपा राहील. अशा प्रकारे भक्तिभावाने आपले कार्य करीत राहा.मी प्रत्येक संकटात तुझ्या मदतीला धावून येईन. मी तुझा संरक्षक देवता आहे,हे लक्षात ठेव."
अदमाने निष्ठापूर्वक, मनोभावे देवाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि मग नित्य कामे उरकून तो बाहेर पडला. तो आनंदी होता. नगरातील लोक अदमाचा आदर-सन्मान करायचे. कुठली अडचण आली तर ती सोडवण्याचा मार्ग जाणून घेण्यासाठी ते अदमाकडे येत.तो त्यांना योग्य सल्ला, मार्गदर्शन करत असे. उपाय सांगत असे.
एके दिवशीची गोष्ट. अदमा नदीवर मासे पकडत होता. तेवढ्यात आकाशात काळे ढग जमले. वादळ घोंगावू लागले. आणि यात अदमाची नाव उलटली. तो पाण्यात पडला. अदमाने विचार केला,'ही तर मोसम येण्याची वेळ नाही. मग असं का घडलं? ' त्यानं आकाशाकडं पाहिलं. आकाशात वादळपक्षी जोरजोराने आपले पंख फडफडवत होता. तो अगदी शांतपणे त्याला म्हणाला,"ये वादळपक्षी, जरा थांब. ही बघ,तुझ्यामुळं माझी होडी उलटली. आता मला देवळात जायला उशीर होईल."
पण वादळपक्ष्यानं त्याचं काहीएक ऐकलं नाही. तो आपले पंख जोरजोराने फडकवित राहिला. आता अदमाला भयंकर राग आला. तो त्याच्याकडे पाहत म्हणाला,"देव करो आणि तुझे पंख गळून पडो. त्यामुळे तू पुन्हा अवेळी वादळ निर्माण करणार नाहीस."
अदमा एवढे म्हणतोय तोच एकदम वारा शांत झाला.कारण खरोखरच वादळपक्ष्याचे पंख गळून पडले होते.
बरेच दिवस वारा शांत शांत असल्याचं पाहून देवराज मर्दुकनं दरबारात विचारणा केली,"वाऱ्याला काय झालंय?"
"असं कळतं की, हे सगळं अदमामुळं घडलं आहे. त्याने वादळपक्ष्याचे पंख कापले आहेत." दरबारी म्हणाले.
मर्दुकला क्रोध आला.एक सामान्य मनुष्य देवतांच्या पक्ष्याचे पंख छाटण्याचं धाडस करू कसं शकतो? तो म्हणाला,"त्या गुन्हेगार मनुष्याला माझ्यासमोर हजर करा."
त्याच संध्याकाळी अदमा देवळात गेला, तेव्हा त्याला आवाज ऐकू आला,"अदमा, सावध रहा. देवराज मर्दुक तुझ्यावर क्रोधीत झाले आहेत. तुला त्यांच्यासमोर हजर व्हावं लागेल."
अदमा घाबरला. त्यानं विचारलं,"आता मला काय करावं लागेल?जे काही झालं,त्यात माझा काहीच दोष नाही. वादळपक्ष्यानं अवेळी वादळ निर्माण करून माझी होडी उलटवली. त्यामुळे मला देवळातील नित्यकर्म करण्यास विलंब झाला."
आवाज आला,"काही काळजी करू नकोस." मग संरक्षक देवतेने त्याला पुढे काय करायचं ते समजावून सांगितलं. अदमानं सगळं लक्षपूर्वक ऐकून घेतलं. रात्र झाली. देवदूत त्याच्यासमोर प्रकट झाला. त्याला देवराज मर्दुकचा आदेश ऐकवला. सोबत यायला सांगितलं. अदमाने फाटके, जीर्ण कपडे परिधान केले आणि जायला सज्ज झाला. देवदूतने त्याला सोबत घेऊन आकाशात भरारी घेतली.
देवराज मर्दुकच्या महालाच्या द्वारासमोर दोन देव उभे होते. ते होते अडोनिस आणि गिजिदा. ते दोघे आर्द्रतेचे रक्षक होते. वर्षातले सहा महिने पृथ्वीवर असायचे आणि उर्वरित सहा महिने मर्दुकच्या आकाशातील महालाचे द्वारपाल म्हणून काम पाहायचे.
अदमाला अशा फाटक्या अवस्थेत आणि उदास पाहून अडोनिस आणि गिजिदाने विचारले,"अरे , हे काय! तू देवराजच्या महालात अशा फाटक्या वेशात का चालला आहेस?"
यावर अदमा म्हणाला,"मी एक विनंती घेऊन आलो आहे. अडोनिस आणि गिजिदा अर्धे वर्षं पृथ्वीवर नसतात.त्यामुळे तिथे दुष्काळ पडतो. जमीन उजाड होऊन जाते. नदी,ओढे-नाले सुकून जातात. मी देवराजांना विनंती करेन की, या दोघा देवतांना नेहमी पृथ्वीवरच राहण्याची अनुमती द्यावी."
अदमाचे बोलणे ऐकून दोन्ही देव त्याच्यावर प्रसन्न झाले. कारण त्यांना पृथ्वीवरची आर्द्रता आवडत होती.त्यांना वर्षातले सहा महिने देवराज मर्दुकच्या महालाची पहारेदारी पसंद नव्हती. देवता अडोनिस गिजिदाला म्हणाला,"अदमा भला माणूस आहे. तो आपल्यासाठी विनंती करायला आला आहे. आपल्याला याची मदत केली पाहिजे."
अदमाने दोन्ही देवतांचे बोलणे ऐकले. त्याला आनंद झाला. देवलोकमध्ये त्याने दोन मित्र बनवले.
अडोनिस आणि गिजिदा या दोघांनीही अदमाला आपली ओळख सांगितली नाही, परंतु संरक्षक देवतेने त्यांची ओळख अगोदरच अगदी चांगल्या प्रकारे करून दिली होती. अदमाने त्यांना ओळखले होते, पण तोही तसा काही बोलला नाही.
अडोनिस आणि गिजिदा यांनी त्याला आत जायला रस्ता मोकळा केला. देवदूताने अदमाला देवराज मर्दुकसमोर उभे केले. तिथली भव्यता पाहून अदमाचे डोळे दिपून गेले. कक्षात देवराज मर्दुक उच्च अशा सिंहासनावर आरूढ होता. तिथे आणखी काही देवता उपस्थित होत्या.
अदमाने मर्दुकला लवून प्रणाम केला आणि मग मान खाली घालून उभा राहिला. त्याला पाहिल्यावर मर्दुकचा क्रोध जागा झाला. तो म्हणाला," अच्छा, तर तो तू आहेस,जो देवतांच्या कार्यात विघ्न आणण्याचे धाडस करतोस. तू वादळपक्ष्याचे पंख कापण्याचा शाप का दिलास? पटकन उत्तर दे."
अदमा विनम्र आवाजात म्हणाला,"देवांचे देव श्री मर्दुक महाराजांचा विजय असो. महाराज, वादळामुळे माझी होडी उलटली. मी पाण्यात पडलो. यामुळे माझा वेळेत देवळात जाण्याचा नियमभंग झाला. माझ्याकडून एक मोठा गुन्हा घडला." तो पुढे म्हणाला, "खरं तर वादळ येण्याचा कुठलाच मोसम नव्हता. तरीही वादळ आले. त्यामुळे मी घाबरलो. मला काळजी वाटू लागली की, वेळेत देवळात गेलो नाही तर मला संरक्षक देवता शाप देतील. त्यामुळेच माझ्या तोंडून ती शापवाणी निघाली. मला त्याचा खेद आहे. मी क्षमाप्रार्थी आहे."
अदमाचे बोलणे ऐकून मर्दुक विचार करू लागला. त्याला वाटलं की, जे काही घडलं ,त्यात अदमाचा काही दोष नाही. तो तर वेळेत मंदिरात जाता येत नसल्याकारणानं काळजीत होता. पण मर्दुकने हे विचार बोलून दाखवले नाहीत. शेवटी त्याने अदमाला गुन्हेगार ठरवून शिक्षा सुनावण्यासाठी देवलोक बोलावणे धाडले होते. अशा परिस्थितीत त्याला एकदम क्षमादान करणं योग्य नव्हतं. आता पुढे काय करायचं, याचाच तो विचार करत होता,तेवढ्यात अडोनिस आणि गिजिदा उठून उभे राहिले. त्यांनी देवराज मर्दुकला प्रणाम घातला आणि बोलण्याची अनुमती मागितली. आज्ञा मिळाल्यावर दोघेही म्हणाले,"महाराज,अदमा हा धर्मप्राण आणि नियमाला धरून वागणारा मनुष्य आहे.हा देवतांना पूजतो. त्यांच्या शापाला घाबरतो. खरं तर तो आमच्यासाठीदेखील तुमच्यासमोर एक विनंती घेऊन आला आहे. नक्कीच त्याने अपराध केला आहे,पण हा त्याचा पहिलाच अपराध आहे. निश्चितच याला क्षमादान मिळायला हवं."
हे ऐकून मर्दुकला मार्ग सापडला. त्याने अगोदरच मनोमन अदमाला क्षमादान करण्याचा निश्चय करून टाकला होता. तो म्हणाला," तुम्ही दोघे देवगण अदमाची शिफारस करत आहात म्हटल्यावर मला क्षमादान करावंच लागेल."
मर्दुकच्या बोलण्याला समर्थन म्हणून दरबारी मंडळींनीही मान हालवून संमती दिली. मर्दुक म्हणाला,"अदमावर त्याच्या संरक्षक देवतेची कृपा आहे. पण हा तर मनुष्यप्राणी आहे. का नाही याला देवपण प्रदान केलं जावं?" यानंतर त्यांनी देवभोज आणि अमृतजल पात्र आणण्याचा आदेश दिला.
देवभोज आणि अमृतजल पात्र अदमासमोर ठेवण्यात आले. मर्दुक म्हणाला,"अदमा, तू दोषमुक्त झाला आहेस. देवभोजन सेवन करून अमृतजल प्राशन करावं."
अदमाला त्याच्या संरक्षक देवतेचा इशारा ध्यानात होता. त्याने चुकूनसुद्धा देवभोज आणि अमृतजल पात्रास स्पर्श करू नये, असं संरक्षक देवतेनं बजावलं होतं.
अदमा गपचूप उभा राहिला. आपल्या संरक्षक देवतेच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास तो अजिबात तयार नव्हता. परंतु मर्दुकसमोर नकारसुद्धा देऊ शकत नव्हता. त्यामुळे तो गपचूप उभा होता. त्याने देवभोज आणि अमृतजल पात्रांकडे पाहिलेदेखील नाही. देवभोज करण्याची आणि अमृतजल पिण्याची त्याची इच्छा नव्हती,हे उघड होतं.
मर्दुक अगदी लक्षपूर्वक अदमाचे हावभाव निरखीत होता. तो हसला आणि त्याने अमृतजल व देवभोज माघारी नेण्याचा आदेश दिला. तो मनातल्या मनात म्हणाला,'अदमा शेवटी मनुष्यप्राणी आहे आणि तो तिथेच राहू इच्छितो. असो, जसे असेल तसे. तो अजून देवपंक्तीमध्ये सामील होण्यास स्वतःला योग्य समजत नसावा.'
तो म्हणाला,"अदमा, मी तुझ्यावर नाराज नाही. हीच मनुष्यनियती आहे. पण तू एक भला मनुष्य आहेस, जो देवपूजा करतो. तुझ्यावर देवतांचा आशीर्वाद कायम असेल."
आणि मग देवदूतांनी परत अदमाला पृथ्वीवर आणून सोडले. संध्याकाळी अदमा नेहमीप्रमाणे वेळेत पूजा करण्यासाठी देवळात गेला. त्याच्या मनात एक प्रश्न होता-'काय मी देवता न बनण्याचा निर्णय योग्य होता?'
त्याच्या या प्रश्नाचं उत्तर कुठल्याच मनुष्याजवळ नाही.
मूळ बेबीलोन कथा-पीरी ग्रिमल
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment