देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना माहित होतं की, आपल्याला गुजरातची निवडणूक सोपी जाणार नाही. आपण हात-पाय हालवले नाही तर आपण आपली होम-पीच गमावून बसू, याची खात्री वाटल्याने त्यांनी गुजरातमध्ये
भारताचे पंतप्रधान असतानादेखील सर्वाधिक सभा घेतल्या. गुजरातच्या
लोकांना आपला माणूस सांगत भावनिक आवाहन केले. काँग्रेसच्या मणिशंकर
अय्यरच्या नीच टिप्पणीचा फायदा उठवला. काँग्रेस कुठे कुठे फसेल,
त्याचा ते फायदा घेत गेले. निवडणूक जिंकण्यासाठी
त्यांनी चक्क प्रामाणिक अशा माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनाही आरोपीच्या पिंजर्यात उभा करताना पाकिस्तान गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत आहे, असे बरळूनही टाकले. काहीही झाले तरी सत्ता सोडायची नाही,
याचा ध्यास आणि काँग्रेसचा धसका घेऊन त्यांनी रणनीती अवलंबली.
काँग्रेसच्या काही चुका त्यांना टाळता आल्या असत्या तर आज वेगळे चित्र
दिसले असते. काही ठिकाणी थोडक्यात काँग्रेसचे उमेदवार पराभूत
झाले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने अगदी मतदान
केंद्रानुसार जे काटेकोर नियोजन केले होते,त्याचा त्यांना फायदाच
झाला. काँग्रेस याबाबतीत मागे पडली. अर्थात
सत्ताधारी पक्षाचे याबाबतीत वजन पडतं.
हिमाचल प्रदेश
काँग्रेसच्या हातून जाणार होतीच,कारण तिथे जनता दर पंचवार्षिक निवडणुकीला आलपालटून सत्ता देते, हा गेल्या पस्तीस वर्षाचा अनुभव आहे. शिवाय काँग्रेसच्या
मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. वगैरे वगैरे...
पण गुजरातची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती.
इथे करो या मरो या धर्तीवर भाजप-काँग्रेस राबली
आहे. नुकतेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले राहूल गांधी
यांनीही ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली आणि ते तितकेच राबलेदेखील! त्यामुळे त्यांना सत्तेजवळ पोहचता आले नसले तरी त्यांनी भाजपच्या तब्बल
20 जागा हिरावून घेतल्या आहेत. त्यामुळे भाजपला
दोन अंकी आकड्याच्यावर जाता आले नाही. त्यांना 99 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजप 150 जागांच्या बाता मारत होती. त्यांच्या विश्वासाला गुजरातवासियांनी तडा दिला आहे. गुजरातची जनता
भाजपवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला
आपली रणनीती बदलावी लागत आहे. आणि त्यांनी तशी भूमिका राबवण्याच्या
दिशेने पावलेही टाकली आहेत.
नरेंद्र मोदींना
गुजरातमध्ये दोन आकड्यांवर आऊट केल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या नव्या
अध्यक्षावर विश्वास ठेवत असून त्यांच्या कारकीर्दीत काँग्रेस
दमदार वाटचाल करेल, असे त्यांना वाटत आहे. आगामी वर्षभरात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड आणि
कर्नाटक या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यादृष्टीने
काँग्रेस आणि अन्य विरोधक अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. काँग्रेस
शेतकर्यांचा मुद्दा घेऊन आणखी आक्रमक होऊन राज्य सरकारांवर हल्ला
करण्याच्या तयारीत आहे. बहुतांश राजकीय जाणकारांनीही ही भाजपसाठी
धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. राहूल गांधी यांनी तर गुजरातचे परिणाम भाजपासाठी मोठा झटका
असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी विकासाची निवडणूक म्हटले होते,पण प्रचारात त्यांनी विकास आणि भ्रष्टाचाराची गोष्ट बोललीच नाही. त्यामुळे मोदींच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित होतो, असे म्हटले आहे. सगळीकडूनच भाजपावर तोंडसुख घेतले जात आहे. शिवसेनेचे
मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात तर राहूल गांधी यांचे कौतुक करताना भाजपच्या हम करे
सो कायदा या नीतीवर टीका केली आहे. आपल्याला हा निर्वाणीचा इशारा
असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गुजरातमधील ही भाजपची आवस्था
महाराष्ट्रातल्या 2019 च्या निवडणुकीत दिसू नये, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.
राहूल गांधी यांनी
मोदींच्या भ्रष्टाचारावर सातत्याने बोलण्याच्या विषयावर प्रश्न उपस्थित केला आहे. राहूल गांधी म्हणतात की, मोदींनी जय शाह आणि फ्रांसच्या
लडाकू विमान राफेलवर एक ब्रदेखील काढला नाही. देश राफेल घोटाळा
आणि जय शाहच्या मुद्द्यावर सत्य जाणून घेऊ इच्छितो. जय शाहने
50 हजार रुपयांचे तीन महिन्यात 80 कोटी कसे केले?
हा मामला विश्वसनीयतेचा आहे.
आता भाजपच्या अजेंड्यामध्ये
शेतकरी आणि बेरोजगार या प्रश्नांना प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे.नीती आयोगाचे
उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि युवकांना रोजगार देणे हे मुद्दे प्रमुख आहेत.
निवास आणि निर्यात यावरही अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
केंद्र आर्थिक सुधारणेच्या अजेंड्यावर पुढे पावले टाकत राहील.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील सत्ता मिळवल्यावर भाजप 19 राज्यांमध्ये सत्तेवर आली असून काँग्रेस आता फक्त 5 राज्यांमध्ये
उरली आहे. मात्र या गुजरात निवडणुकीमुळे चित्र बदलल्याचे जाणवत
आहे. याचा धसका भाजपनेही घेतला आहे. महाराष्ट्रात
2019 मध्ये निवडणुका होणार आहेत, याचा परिणाम नक्कीच
महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे भाजपला अगदी काळजीपूर्वक पावले
टाकावी लागणार असून नाराज लोकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना कंबर कसावी लागणार
आहे. मोदी आणि शाह या जोडगोळी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला
आहे,परंतु हिमाचल प्रदेश आणि खास करून गुजरातच्या जनतेने त्यांना
काँग्रेसयुक्त भारत असल्याची जाणीव करून दिली आहे. यामुळे आगामी
काळ भाजपसाठी कसोटीचा आहे, हे नक्की!
No comments:
Post a Comment