Saturday, December 2, 2017

(क्रीडा) आत्मविश्‍वासाने परिपूर्ण मीराबाई चानू

     भारताच्या सईखोम मीराबाई चानू हिने जागतिक विक्रमासह जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत भारताची शान या क्षेत्रात उंचावली आहे. विशेष म्हणजे भारताला तब्बल 22 वर्षानंतर असे यश मिळत आहे.कर्णम मल्लेश्वरी हिने अशी कामगिरी 1994 1995 मध्ये केली होती. अमेरिकेतल्या अॅनाहेम येथे झालेल्या स्पर्धेत मीराबाईने एकूण 194 किलो वजन उचलून जागतिक विक्रमाचीही नोंद केली आहे. तुने स्नॅच प्रकारात 85 आणि क्लिन अॅण्ड जर्क प्रकारात 109 किलो वजन उचलले. 48 किलो वजनी प्रकारात सामिल झालेली मीराबाई चानू हिच्या कामगिरीचे कौतुक करण्यासारखे आहे कारण ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आली आहे. या क्रीडा प्रकारासाठी तिला चिकन आणि दूध डायटसाठी आवश्यक होते.पण चिकन तर सोडून द्याच, दूधसुद्धा तिला मिळत नव्हते. अशाही परिस्थितीत ती आपल्या जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवर पोहचली आहे. तिला रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालयची आहे. आता ती त्यासाठी स्वत: ला सिद्ध करण्यासाठी तयार आहे.

     आपल्या खेळाविषयी आतून उत्कटता नसेल तर तुम्ही कधीही यश मिळवू शकत नाही. हा काही व्यवसाय नाही, जिथे निर्धारित वेळेत यावे आणि जावे. आव्हानांना न घाबरता स्वत:वर विश्वास ठेवायला हवा, असे एका मुलाखतीदरम्यान सांगणार्या मीराबाईने आपल्या आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या आहेत. लहानपणी ती मणिपूरच्याच कुंजराणीदेवीचा वेटलिफ्टिंह खेळ पाहतच मोठी झाली आहे. तिचा खेळ पाहूनच ती या खेळाकडे आकर्षित झाली आणि आपल्या घरच्यांना तिने आपण हा खेळच खेळणार असा हट्ट धरला. बर्याच प्रयत्नानंतर तिला तिच्या घरातून संमती मिळाली.
     कुंजराणीचा खेळ पाहून तिला प्रश्न पडायचा की, ती इतके वजन कशी उचलायची. तिच्या मणिपूर राज्यात कुंजराणी देवीची तुलना देशाची टेनीस खेळाडू सानिया मिर्झाच्या लोकप्रियतेशी व्हायची. त्याकाळात प्रत्येक मणिपूरची मुलगी तिच्यासारखी बनण्याची स्वप्ने पाहायची. मीराबाईच्या लहानपणी ती इंफाळमधल्या ज्या गावात राहायची, तिथे आणि आसपास कुठेच वेटलिफ्टिंग प्रशिक्षण सेंटर नव्हते.तिला प्रशिक्षणासाठी साठ किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा.
     2007 मध्ये ती तेरा वर्षांची होती, त्यावेळेला तिने इंफाळमध्ये प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. 2011 मध्ये तिने आंतरराष्त्रीय युथ चॅम्पियनशिप आणि दक्षिण आशियाई ज्युनिअर खेळात सुवर्णपदक पटकावले होते.दोन वर्षांनंतर ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिला सर्वश्रेष्ठ वेटलिफ्टरचा पुरस्कार मिळाला. वास्तविक तिच्यासाठी 2013 पर्यंत ज्युनिअर स्तरापर्यंतच्या स्पर्धा तिला सोप्या गेल्या. पण जसे तिने ज्युनिअर स्तर खेळायला सुरुवात केली, तसे तिच्यापुढे आव्हाने उभी राहिली. 2014 मध्ये ग्लासगो राष्ट्रकूल खेळात तिने कास्य पदक पटकावले, तशी तिला आत्मविश्वासाची नवी उंची मिळाली.
     या खेळात करिअर करण्याचे तिने आपल्या लहानपणीच निश्चित केले होते.तिने ज्युनिअर स्तरावर खेळायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या आर्थिक परिस्थिती अभावी तिला या खेळासाठीच्या पायाभूत सुविधाही उपलब्ध झाल्या नाहीत. प्रशिक्षक त्यांना डायट चार्ट द्यायचे,त्यात चिकन आणि दूध अनिवार्य होते. या चार्टनुसार भोजन करण्याइतपत तिची घरची परिस्थिती नव्हती. चिकन तर सोडूनच द्या,पण दूधसुद्धा तिच्या नशिबात नव्हते. घरात जे काही खायला मिळायचे,त्यावरच ती वेटलिफ्टिंगचा सराव करायची. अर्थात याचा परिणाम तिच्या खेळावर व्हायचा. पण तिच्यात आत्मविश्वास प्रचंड होता. आपलेही दिवस बदलतील,याची तिला खात्री होती. आताच्या या स्पर्धेतल्या यशाने तिच्यातला आत्मविश्वास दुणावला आहे.
     रिओ ऑलिम्पिकचा सुरुवातीचा काळ तिच्यासाठी आणि तिच्या करिअरच्यादृष्टीने महत्त्वाचा राहिला. त्या दरम्यान एक काळ असा आला की, आपल्या आर्थिक परिस्थितीअभावी आपल्याला ऑलिम्पिकसाठी क्वालिफाई करता येणार नाही. तिच्या घरच्यांनीही तिला हा खेळ सोडून देण्याचा सल्ला दिला होता. पण तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ऑलिम्पिकसाठी क्वालिफाई करण्यात यश मिळवले. अर्थात तिथे तिला आपली कामगिरी उंचावता आली नाही,पण तिच्यात आत्मविश्वास वाढत राहिला. तिचा तिच्यावर प्रचंड विश्वास होता.
     जागतिक अंजिक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पदक पटकावल्यावर तिने लगेच आपल्या आईला फोन केला.ती तिच्यापासून बरेच दिवस लांब होतील. त्यामुळे ती अक्षरश: ओरडून आपल्याला झालेला आनंद व्यक्त करत होती. या विजयानंतर तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण आल्याचे ती एका मुलाखतीत सांगते. या यशाचे श्रेय ती आपल्या घरच्यांना आणि प्रशिक्षकाला देते.प्रशिक्षकानेही तिच्याएवढीच मेहनत घेतल्याचे ती सांगते. या खेळामुळे तिला तिच्या बहिणीच्या लग्नालाही जाता आले नाही. पण आता मागचे सारे विसरली आहे. आता तिच्यापुढे रिओ ऑलिम्पिक स्पर्धा आहेत. त्यात तिला यश मिळवायचे आहे. यासाठी जीव तोडून मेहनत करण्याची तिची तयारी आहे. या खेळात ती जिला आपला आदर्श मानते, ती कुंदराणी देवी हिने तिच्या कारकिर्दीत अनेक पदके मिळवली आहेत.या रौप्य पदकांचा अधिक वाटा आहे.पण, ती जागतिक स्पर्धेत 1989 ते 1999 या दरम्यान सहभागी झाली होती,मात्र तिला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही. आता मीराबाई तिच्या आदर्शावरच एक पाऊल पुढे गेली आहे. याचा तिला मणिपूरची खेळाडू म्हणून मोठा अभिमान आहे. गेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत चानूने अजिंक्यपद पटकावले होते. आता तिला पुढच्या स्पर्धांचे वेध लागले आहेत. ऑलिम्पिकमध्ये आपण पदक मिळवू याचा तिला आत्मविश्वास आहे.

1 comment:

  1. मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४८ वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. चानूने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. यानंतर तिने ८४ आणि ८६ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.

    मीराबाई चानूकडून भारताला पदकाची आशा होती. मीराबाईनेही तिच्या चाहत्यांना निराश केले नाही. मीराबाईने फक्त सुवर्णपदकाचीच कमाई केली नाही, तर तिने हे सुवर्णपदक विक्रमी कामगिरी नोंदवून पटकावले. तिसऱ्या प्रयत्नात ८६ किलो वजन उचलून मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी कामगिरीची नोंद केली. याआधी ऑगस्टिना नवाओकोलोने २०१० मध्ये नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७७ किलो वजन उचलून विक्रम केला होता. हा विक्रम मीराबाई चानूने मोडीत काढला.

    राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सनी चांगली कामगिरी केली आहे. गुरू राजाने 56 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करत भारताला स्पर्धतील पहिले पदक मिळवून दिले. 28 वर्षीय गुरू राजाने 249 किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. सुरूवातीला गुरूराजाने 111 किलो वजन उचलले. यानंतर तिसऱ्या फेरीत त्याने 138 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. शेवटच्या फेरीत 249 किलो वजन उचलत गुरू राजाने रौप्य पदक मिळवले. 5/4/2018

    ReplyDelete