Wednesday, December 6, 2017

शेतकर्‍यांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग उभारावेत

      शेतकरी पिके,फळे पिकवतो,मात्र त्यांना म्हणावा असा बाजारभाव मिळत नाही. किमान आधारभूत किंमत शासन ठरवूनही त्याप्रमाणे बाजारभाव मिळत नाही.त्यामुळे अनेकदा शेतकर्याला त्याने घातलेला खर्चही मिळत नाही.शासन शेतकर्यांना आम्ही तुमच्या बाजूने असल्याचा निव्वळ कांगावा करीत असते.मात्र त्यांच्या दशेकडे त्यांचे अजिबात लक्ष देत नाही. वीजबिले माफ किंवा कर्जमाफी अशाप्रकारचे तात्पुरते उपाय कधी तरी सत्तेवर असलेले सरकार राबवते आणि आम्ही शेतकर्यांचे कैवारी असल्याचा आभास निर्माण करते. त्यामुळे शेतकर्यांनीच यावर तोडगा काढायला हवा.

     शेतमालाला बाजारात भाव मिळत नाही,परंतु त्याच मालावर प्रक्रिया केल्यावर त्याचे मूल्य चारपटीने वाढते. शेतकर्यांनी पिकवलेला गहू,ज्वारी,बाजरी,मका, टोमॅटो,कडधान्ये आदींवर प्रक्रिया केल्यास आणि त्याची विक्री केल्यास बाजारमूल्य वाढते. अंजीर, सीताफळ,डाळिंब,द्राक्षे,पेरू यांनाही बाजारात म्हणावा असा दर मिळत नाहीत. कधी कधी तर ते रस्त्यातच फेकून द्यावे लागतात. यातून दहा-वीस रुपयेदेखील नफा मिळत नाही. शेतीमालावर प्रक्रिया केल्यावर मात्र शेतकर्याच्या पदरात चांगला मोबदला पडतो. त्यामुळे शेतकर्यांनी एकत्र येऊन आपल्याच परिसरात असे प्रक्रिया उद्योग उभे करावेत. शिवाय त्यांच्याच मुलामुलींना त्यातून रोजगारही मिळणार आहे.त्यामुळे चार-दहा शेतकर्यांनी एकत्र येऊन असे उद्योग आपल्याच शिवारात उभारावेत. शेतमालावर प्रक्रिया केलेल्या मालाबाबतचे इथे एक साधे उदाहरण पुरेसे आहे. वीस नाही तर तीस रुपये किलो दराने सीताफळ विकली जातात. मात्र त्याच सीताफळाचा गर (पल्प) काढला तर त्याचे बाजारमूल्य सव्वशे ते दीडशे रुपये किलो होते. उन्हाळ्यात तर याहीपेक्षा महाग होते. आंबा,चिकू, अननस आदींचे जेलीसारखे पदार्थ बनवता येतात
     खरे तर अलिकडच्या काळात छोटे-छोटे प्रक्रिया उद्योग उभारले जात आहेत. शिवाय यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकर्यांची मुले शेती करत नाहीत,मात्र अशा उद्योगात तरी काम करू शकतात. पुणे,मुंबई,कोल्हापूर आदी शहरांमध्ये जाऊन दुसर्यांच्या कारखान्यांमध्ये जाऊन राबण्यापेक्षा आपल्याच कंपन्यांमध्ये काम केल्यास आणि तो चिकाटी,जिद्द,मेहनत आणि प्रामाणिकपणे केल्यास चांगला नफा मिळू शकतो. ऊसापासूनही बरेच पदार्थ बनवता येतात. शिवाय ज्वारी-बाजरीचा रवा,पोहे,बिस्किटे होतात. मक्याने तर चांगलीच बाजारपेठ मिळवली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजेत. शासनानेही यासाठी खास सवलती दिल्या पाहिजेत. शेतकर्यांनीही एकत्रित येऊन जिद्दीने असे प्रक्रिया उद्योग उभे केले पाहिजेत. शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकरी श्रीमंत व्हायला मदत होते. शेतकरी हा दर पुढच्या वर्षी श्रीमंत होतो, अशाप्रकारचे विचार मांडणारी मंडळी आहेत, त्याला शेतकर्यांनीच आपल्या कृतीतून छेद द्यायला हवा.

No comments:

Post a Comment