Sunday, December 10, 2017

युवा पिढीचे आयुष्य धोक्यात

     आपल्या महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा,माव्याच्या विक्रीला बंदी आहे. पण तरीही ही बंदी आपल्याला कुठे जाणवत नाही.चौका-चौकातल्या पान टपरीवर अगदी उघडपणे हे पदार्थ मिळतात. साहजिकच याचा फायदा महाराष्ट्राला होत असून युवापिढी याच्या आहारी गेल्याचे एका सर्व्हेक्षणानुसार उघड झाले आहे. यासाठी आपल्या शासनाला धन्यवाद द्यायला हवेत. अर्थात फक्त तंबाखूबाबतच असे कायदे करण्यात आलेले नाहीत तर अन्य अनेक अवैध धंद्यांसाठीही कायदे आहेत. हे कायदेसुद्धा फक्त कागदावर असून अगदी आबादी- आबाद असल्यासारखा महाराष्ट्र भविष्य काळासाठी वाटचाल करीत आहे. युवा पिढीदेखील भविष्याबाबत अशीच बेफिकीर बाळगत स्वत:च्या शरीराचे मात्रे करून घेत आहे. त्यामुळे शासनाला सवाल केला जात आहे, कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र!
     2010 ते 2017 या गेल्या सात वर्षात राज्यातल्या तरुणांमध्ये तंबाकूजन्य पदार्थाच्या सेवनात वाढ झाल्याची आकडेवारी जागतिक प्रोढ तंबाखू पाहणीत आढळून आले आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनात 31.4 टक्क्यावरून 26.6 टक्क्यावर आल्याचे सुखद चित्र आढळून येत असले तरी याच दरम्यान 15 ते 17 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये 2.9 वरून 5.5 टक्के वाढले आहे. शिवाय आपल्या राज्यात 2 कोटी 40 हजार लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचेही या पाहणीत आढळून आले आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील व्यसनांचे प्रमाण राष्ट्रीय पातळीवर कमी होत असताना महाराष्ट्रात मात्र ही टक्केवारी वाढत आहे, ही मोठी चिंताजनक बाब म्हटली पाहिजे. राज्यात तीन पुरुषांमागे एक तर स्त्रियांमध्ये सहापैकी एक तंबाखूच्या आहारी गेले आहेत.
     आपल्या राज्यातच काय देशभरात तंबाखूजन्य पदार्तांविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असताना राज्यातील मुले 15 व्या वर्षीच या व्यसनांच्या आहारी जात असल्याने आपले काही तरी चुकते आहे, हे उघड आहे. विशेष म्हणजे खैनी, जर्दा, पान मसाला खाण्याच्या आहारी 31.7 पुरुष तर 24.4 महिला गेल्या आहेत. यात खैनी आणि गुटखा खाण्याचे प्रमाण 8.6 वरून 15.5 टक्के इतके वाढले आहे. धुम्रपानावर महिन्याला सरासरी खर्च 1028 रुपये येत आहे. हाच खर्च 2010 मध्ये 778 रुपये होता. काहीही न कमवता ही मुले शरीर नाश करणार्या बाबींवर खर्च करतात, हे दुर्दैवी आहे. पालक याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न आहे.
     ज्याच्या घरात दारू,गुटखा,तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगरेट याचे व्यसन असेल तर त्या घरातील मुले लवकर या गोष्टींकडे आकर्षित होतात. त्यांना यात काही वावगे आहे, असे त्यांना वाटत नाही. या सगळ्या गोष्टी कॉमन असताना शासन या गोष्टींवर विनाकारण बंदी घालत आहे आणि जाहिरातींवर पैसा खर्च करत आहे, असे त्यांना वाटत असते. शाळा-कॉलेजमध्ये याबाबत जनजागृती कार्यक्रम होत असतील तर ही मुले या गोष्टी हसण्यावारी नेतात. त्यामुळे या व्यसनाला घरातूनच लगाम बसायला हवा आहे. दिवसभर काम-धंदा करणार्या लोकांना तंबाकू अथवा दारू त्यांचा शीण घालवणारी असते. या समजुतीतून यावर फारसे कुणी बोलत नाही. नवरा दारू पिऊन धिंगाणा घालत असेल तर घरातली माऊली त्याच्याकडे वाया गेलेली केस म्हणून दुर्लक्ष करते आणि आपले पोट भरण्यासाठी कामाधंद्याला लागते. आता महिलाही नवर्याचा मार खायच्या सहनशिलतेच्याबाहेर गेल्या आहेत. अशा दारुड्या बापाला बायको-पोरं बदडून काढतात आणि त्याला कोपर्याची जागा देतात. पण सवय झालेल्या माणसांना याचे फारसे काही वाटत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.
     आज काम-धंदा न करता पैसा कसा मिळेल,याकडे ही युवा पिढी आकर्षित झाली आहे. त्यांना काही राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी आश्रय देतात. त्यांना खाऊ-पिऊ घालतात. यातूनच मुले अशा व्यसनाच्या आहारी जातात. पैसा मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठी वाईट मार्गाला लागतात. चोर्या,मार्या, वाटमारी, धमकावणे अशा गोष्टी करून ही युवापिढी आपली व्यसने आणि सवयी पूर्ण करून घेताना दिसतात. ॠाहजिकच यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालणे आगामी काळात खरेच जड जाणार आहे. आज मूल्यांची खरी गरज आहे. पण या मूल्यांची शिकवण देणार कोण, असा प्रश्न आहे. शाळांमधले मूल्यांचे तासही बंद पडले आहेत. आणि शाळांमध्ये मूल्ये शिकत असला तरी समाजात, घरात मात्र याच्या अगदी विपरीत परिस्थिती असते. त्यामुळे साहजिकच त्याला घर-समाज जवळचा वाटतो. शाळा-महाविद्यालयांमधील मौलिक शिक्षण त्यांना प्रत्यक्षात कामाला येत नाही. यासाठी संस्कार केंद्रे उभारण्याची गरज असून मुले किंवा युवापिढी जास्तीत जास्त काळ या क्षेत्रात रमली पाहिजेत,यासाठी त्यांच्या आवडीच्या विषयांवर उपक्रमही राबवले जायला हवीत. त्याशिवाय संस्कारशील पिढी निर्माण होणार नाही.

No comments:

Post a Comment