आठ-दहा वर्षाच्या पाठीमागे शहरात ठिकठिकाणी
तर गावागावांमध्ये आपल्या आप्त लोकांना फोन करून संपर्क साधता यावे,म्हणून पीसीओ (पब्लिक कॉल ऑफिस) अस्तित्वात होते.मोबाईलने आपला जम बसवायला सुरुवात केली
होती. त्यामुळे या पीसीओ बूथचा चांगलाच बोलबाला होता.
ग्रामीण भागातल्या लोकांना याचा चांगला उपयोग होत होता.पण स्वस्तातले मोबाईल आणि कॉल रेट कमी व्हायला लागल्याने मोबाईलची संख्या वाढली
आणि या पीसीओ बूथला घरघर लागली. पुढे पुढे तर त्यांचे अस्तित्वच
संपले. कारण आपल्या देशातल्या सव्वाशे कोटी लोकसंख्येपेक्षा अधिक
मोबाईल आपल्या लोकांकडे उपलब्ध झाले आहेत. आता तर कॉल रेटबरोबरच
इंटरनेटसेवाही फ्री मिळायला लागली आहे. आता याहीपेक्षा स्वस्तात
इंटरनेट सेवा मिळण्याची सोय होऊ घातली आहे. पीसीओ प्रमाणेच आता
पीडीओ ( पब्लिक डेटा ऑफिस) बूथ उघडले जात
आहेत. सगळे काही ठीक चालले तर संपूर्ण देशात ही वाय-फाय सेवा केंद्रे उघडली जाणार आहेत. या सेवेमुळे ग्राहकांना
स्वस्तात इंटरनेटसेवा मिळणार आहे.
काही महाविद्यालये, शासकीय,निम्न
शासकीय कार्यालये आणि काही खासगी कंपन्या विद्यार्थी, नागरिक
आणि आपल्या कर्मचारी-कस्टमरसाठी वाय-फाय
सेवा पुरवत आहेत. काही शहरांमध्येही सध्या ही सेवा काही संस्था,
राजकीय पक्ष आणि शासकीय कार्यालयांकडून मोफत अथवा नाममात्र शुल्कासह
दिली जात आहे. मात्र आता अशी सेंटर्सच उघडली जाणार आहेत.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल कंपन्यांनी देशातल्या 415 ठिकाणी अशी सेंटर्स उघडली आहेत. वाय-फाय सेवा मिळवण्यासाठी दोन रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत ची कूपन्स उपलब्ध
करून दिली आहेत. याद्वारा अर्धा तास ते दिवसभर तुम्हाला वाय-फाय सेवा उपलब्ध होणार आहे. मोबाईल कंपन्यांसोबत ट्रायने
ही प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू केली असून 15 जानेवारीपर्यंत
याला प्रतिसाद कसा मिळतो, ते पाहिले जाणार आहे. प्रतिसाद चांगला मिळत असेल तर ही योजना संपूर्ण देशभरात सुरू केली जाणार आहे.
अर्थात आज जे इंटरनेटसाठी पैसे घालवावे लागणार आहेत, त्यापेक्षा कमी दरात ग्राहकांना इंटरनेट सेवा मिळणार आहे.
मोबाईल क्रांतिमुळे
गल्ली-बोळात असलेले पीसीओ बंद करावे लागले.
मात्र आता या नव्या वाय-फाय सेवेमुळे त्याला नवे
रुप येणार असे चिन्ह दिसत आहे. त्याचे नाव पीडीओ असे असणार आहे.
आपल्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये वृत्तपत्रे,मासिके
वाचण्यासाठी टेबलाभोवती गर्दी दिसते, तशी गर्दी आपल्याला वाय-फाय केंद्रांमध्ये पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटणार
नाही. ग्राहक आपापले मोबाईल, लॅपटॉप घेऊन
त्यात डोके खूपसून बसलेले दिसतील. अर्थात ही क्रांतीही फार काळ
टिकणार नाही.पण यामुळे माहिती आणि दूरसंचार क्रांतीची नवी पहाट
पाहायला मिळणार आहे. लोकांचा मोबाईलचा आणि नेटचा वापर सुरूच आहे,पण कॉल रेट संपुष्टात येऊन फक्त इंटरनेटवरच एकमेकांचा संपर्क वाढण्याची शक्यता
आहे. कारण आज व्हिडिओ कॉलिंग आणि वॉट्स अप सारख्या माध्यमातून
व्हाईस कॉलिंग करून संपर्क साधता येत आहे. वाय-फाय सेवा फोर-जी, फाईव्ह-जीवर न अडखळता चालू राहिल्यास कॉल करण्याची आवश्यकता भासणार नाही.
No comments:
Post a Comment