Tuesday, December 5, 2017

विषारी अवकाशाचे काय करायचे?

     आपल्याला जगायचं असेल तर श्वास घ्यावा लागतो,पण आताच्या लोकांना श्वास घेणंही अवघड होऊन बसलं आहे. सगळ्यात वाईट अवस्था आपल्या देशाची राजधानी दिल्लीची झाली आहे. कारण दिल्लीतल्या लोकांचे वय प्रदूषणामुळं सहा वर्षांनी घटतं आहे. त्यामुळे दिल्लीच्या हवेला हत्यारी हवा म्हटले जात आहे. अशीच कमी-जास्त परिस्थिती देशातल्या दुसर्या शहरांचीही आहे. इथल्या लोकांचे वय प्रदूषणामुळे 3.5 ते 6 वर्षापर्यंत घटत आहे. आपल्यासाठी सगळ्यात वाईट बातमी म्हणजे जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये आपल्याही देशाचा समावेश आहे.वायू प्रदूषण आपल्या शरीरासाठी सर्वात मोठा धोका आहे. पण प्रश्न असा आहे की, आपण या फारच भयंकर असलेल्या परिस्थितीबाबत अजूनही गंभीर नाही. शिकागो विद्यापीठाच्या ( अमेरिका) द एनर्जी पॉलिसी इंस्टीट्यूटच्यावतीने वायू गुणवत्ता सूचकांकच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, भारत जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकांनुसार वायू प्रदूषण कमी करण्याचे काम हाती घेतल्यास लोकांचे आयुष्यमान सरासरी चार वर्षांपर्यंत वाढू शकते.

     राष्ट्रीय मानकांची आपण अंमलबजावणी केल्यास देशातले लोक सरासरी एक वर्ष अधिक जिवंत राहू शकतात. राजधानी दिल्लीकडून जर डब्ल्यूएचओच्या मानकांचे पालन केल्यास दिल्लीतले लोक नऊ वर्षे अधिक जिवंत राहू शकतात. आणि जर दिल्लीतल्या वायू प्रदूषणासंबंधीत राष्ट्रीय मानकांचे पालन केल्यास इथल्या लोकांचे आयुष्य सहा वर्षांपर्यंत वाढू शकते. या अहवालामध्ये भारतातल्या पन्नास सर्वात प्रदूषित शहरांचे आकडे देण्यात आले आहेत.यात दिल्लीशिवाय मुंबई,बेंगलोरसह आग्रा, लखनौ, पाटना,कानपूर अशा मोठ्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.राष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी केली गेली तर इथल्या  लोकांचे आयुष्य साडेतीन ते सहा वर्षापर्यंत वाढू शकते. वायू गुणवत्ता जीवन सूचकांक (एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स) च्या साहाय्याने असा अंदाज काढण्यात आला आहे की, वायू प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केल्यास सध्याच्या सरासरी वयाच्या तुलनेत लोकांचे आयुष्य निश्चितच आश्चर्यकारक वाढणार आहे.याचा विचार करायला हवा.
     डब्ल्यूएचओनुसार प्रदूषणाची मात्रा सांगणारे पीएम 2.5 च्या स्तराला 70 ते 20 मायक्रोग्रॅमवर क्यूबिक मीटरपर्यंत कमी केल्यास वायू प्रदूषणांनी होणारे मृत्यू जवळपास 15 टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतात. राष्त्रीय मानकांनुसार आपल्या देशात पीएम 2.5 चा स्तर 40 मायक्रोग्रॅम/ क्यूबिक मीटर व्हायला हवा. आणि पीएम 10 साठी हाच स्तर 60 मायक्रोग्रॅम/ क्यूबिक मीटर व्हायला हवा. पण भारतात पीएम 2.5 चे मानक डब्ल्यूएचओच्या मानकांच्या चारपट अधिक आहे. हवेत उपलब्ध असलेले हे पीएम कण श्वासांद्वारा फुफ्फुसात पोहचतात आणि आपल्यासोबत विषारी रसायने आपल्या शरीरात पोहचवतात.यामुळे फुफ्फुस आणि हृदय यांना हानी फचते.
थंडीच्या दिवसांत तापमानात घट येण्याबरोबरच या दोन्ही कणांचा स्तर वातावरणात वाढत जातो. म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर आणि धोकादायक बनते. ग्लोबल एक्सपोजर टु एयर पोल्यूशन अँन्ड इट्स डिजीज बर्डन नावाच्या एका अमेरिकन संस्थेने आपल्या आहवालात म्हटले आहे की, जगातील 52 टक्के लोक अशा प्रदेशात राहतात, जेथील हवा स्वच्छ नाही. भारत प्रदूषणच्या सगळ्यात मोठ्या विळख्यात अडकत चालला आहे.
     ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉरपोरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट (ओआयसीडी)नुसार सन 2060 पर्यंत वायू प्रदूषणाने जगाला 135 कोटी रुपयांचे नुकसान होईल आणि ही रक्कम आपल्या सध्याच्या जीडीपीपेक्षा फक्त 10 लाख कोटी रुपयांनी कमी आहे. हे नुकसान आजारांमुळे घेतलेल्या सुट्ट्या,उपचारावर होणारा खर्च आणि शेतीत होणारे कमी उत्पादन आदींमुळे होणार आहे. याचा सगळ्यात जास्त परिणाम चीन,रशिया आणि भारतावर होणार आहे. प्रदूषण श्वसनासंबंधीचे आजार देण्याबरोबरच लोकांचे हृदयदेखील सातत्याने कमकुवत बनवत आहे. सरकारी आकड्यांनुसार दिल्लीतल्या लोकांना हृदयविकाराच्या आघाताचा धोका गेल्या वीस वर्षात तीस टक्क्यांनी वाढला आहे.यासाठी वायू प्रदूषणच जबाबदार आहे.
     एडिनबरा विद्यापीठ आणि नेदरलँडच्याही काही संशोधकांनी सांगितले आहे की, वाहनांमधून निघणारे धुराचे नॅनो पार्टिकल्स  रक्त प्रवाहात मिसळून हृदयापर्यंत पोहचतात. वाहनांच्या धुरांमधून निघणारे कण इतके सुक्ष्म असतात की, ते फुफ्फुसाच्या फिल्टर यंत्रणेतूनही आरपार होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रदूषणाचे हे कण हृदयाच्या रक्त पंप करणार्या धमन्यांमध्ये थोडे थोडे करत साचून राहतात. मग एकवेळ अशी येते की, या धमन्या अंकुचन व्हायला लागतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. काही प्रदूषक चुंबकीय कण मेंदूपर्यंत पोहचतात आणि मेंदूच्या आजाराचे कारण बनतात.
     या गंभीर परिस्थितीपासून सुटका करून घेण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी नेदरलँडचे एक उदाहरण घेता येईल, तिथल्या रॉटरडॅम शहराला त्याच्या ऐतिहासिक वास्तू स्थापत्यासाठी ओळखले जाते. पण कधी काळी रॉटरडॅम सर्वात प्रदूषित शहरांमध्ये नाव घेतले जात होते.डच डिझायनर आणि इनोवेटर डार्न रोजगार्ड याने काळ्या धुरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जे डिझाईन तयार केले, ते भारताल्या शहरांना शुद्ध वातावरण देऊ शकते. जगातला पहिला धूम्र-रहीत टॉवर नेदरलँडने 2015 मध्ये आपल्या रोटरडॅम शहरात उभा केला होता. हा ओझोन फ्री टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हा टॉवर दर तासाला 30 हजार क्यूबिक मीटर प्रदूषित हवा स्वच्छ करू शकतो. सात मीटर उंच अशा या टॉवरला अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले की, ती दूषित हवा एकाद्या वॅक्यूम क्लिनरसारखा आपल्यामध्ये खेचून घेतो.
     हा टॉवर दूषित हवा फिल्टर करतो आणि धूम्र-रहीत हवा बाहेर काढतो. नेदरलँडमध्ये झालेल्या आउटडोर टेस्टच्या दरम्यान असे आढळून आले आहे की, हा टॉवर साठ टक्के प्रदूषित हवा शुद्ध करू शकतो.हा पीएम 2.5 आणि पीएम 10 सारख्या भयंकर कणांना 75 टक्क्यांपर्यंत आपल्या आतमध्ये शोषून घेऊ शकतो. यानंतर शुद्ध हवा टॉवरच्या आजूबाजूला पसरते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातल्या काही शहरांचे प्रदूषण नियंत्रणात आणू शकतो. रोजगार्ड यांनी यासाठी स्वत: आपली इच्छा जाहीर केली आहे.पण यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे पुढे येण्याची आवश्यकता आहे. ही यंत्रणा भारतात उभी केल्यास इथे प्रदूषणपासून काही प्रमाणात सुटका होऊ शकते.
     या प्रदूषणाच्या आपत्कालीन परिस्थितीत सामान्य लोक कशा प्रकारे सुरक्षित राहू शकतात,याबाबत काही उपाय योजले जाऊ शकतात. 1. पाच रुपयेचा किंवा डिस्पोजल मास्क कधीही वापरू नका. हे मास्क प्रदूषित कणांपासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. अशा मास्कचा वापर करायला हवा, ज्यामध्ये कार्बन फिल्टर लेयर असेल. 2. शक्य असेल तर घरी एयर फ्युरीफायर आवश्य बसवा. का वॅक्युम क्लीनरसारखा काम करतो. आणि हवेत उपलब्ध असलेल्या धोकादायक कणांना फिल्टर करतो.3. दिवसापेक्षा रात्रीच्यावेळी प्रदूषणचा धोका अधिक असतो. तापमान कमी झाल्याने हवेत उपलब्ध प्रदूषकाची मारक क्षमता अधिक होतो. त्यामुळे रात्री बाहेर जाताना काळजी घ्यायला हवी.4. घरामध्ये लावली जाणारी रोपे विषारी हवा स्वच्छ करण्यास मदत करू शकतात. स्नॅक प्लांट, पीस लिली, स्पायडर प्लांट,बीपिंग फिगसारखी रोपे घरातील प्रदूषित हवा 50 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात.

No comments:

Post a Comment