Saturday, November 19, 2022

अंतराळ व्यवसायातील खाजगी क्षेत्राची नवी पहाट

भारतातील पहिल्या खासगी प्रक्षेपक ‘विक्रम- एस’चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या साहाय्याने तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या मोहिमेमुळे देशातील अवकाश संशोधनात खासगी क्षेत्राने प्रवेश केला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो)च्या सतीश धवन अवकाश केंद्रावरील तळावरून ‘विक्रम- एस’ने तीन उपग्रहांसह उड्डाण केले. हैदराबाद येथे चार वर्षांपूर्वी सुरू झालेली स्टार्टअप कंपनी ‘स्कायरूट एरोस्पेस’ने ‘विक्रम- एस’ हा अग्निबाण विकसित केला आहे. ‘प्रारंभ’ असे या नाव असलेल्या पहिल्याच मोहिमेत हा संपूर्ण स्वदेशी अग्निबाण यशस्वी ठरला आहे. केंद्र सरकारने 2020 मध्ये अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले. या मोहिमेद्वारे ‘स्कायरूट एरोस्पेस’ ही अवकाश प्रक्षेपणाच्या क्षेत्रातील भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे.या प्रक्षेपकात तीन ‘पे-लोड’ होते. त्यातील दोन स्थानिक व एक परदेशातील आहे. ‘स्कारुट एरोस्पेस’च्या नियोजनानुसार 89.5 किमीची उंची आणि 121.2 किमीचा पल्ला अग्निबाणाने गाठला. कार्बन फायबरमध्ये संपूर्ण बांधणी असलेल्या अग्निबाणाचे वजन 545 किलोग्रॅम आणि व्यास 0.375 मीटर थ्रीडी-प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिनचा समावेश आहे. 

आज परिस्थिती अशी आहे की अनेक युरोपीय देश त्यांचे उपग्रह भारतीय अग्निबाणद्वारे प्रक्षेपित करण्याला प्राधान्य देत आहेत. या मागचं कारण निव्वळ आर्थिक आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना भारतीय अग्निबाणद्वारे उपग्रह पाठवणं स्वस्तात पडतं. याला दुसरं कारण आहे  ते आपल्या भारतीय अग्निबाणच्या यशाचं.  यशाचं प्रमाण खूप चांगलं आहे. रोजगाराच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर सरकारी संस्था आणि विभागांचं खाजगीकरण करणं ही चांगली परंपरा मानली जात नाही. या ट्रेंडमध्ये अनेक त्रुटी आहेत, विशेषत: नोकऱ्यांची संख्या, कामाचा दबाव आणि सामाजिक सुरक्षिततेचे मानक, खाजगीकरणाने अशी अनेक दुखणी दिली आहेत, ज्याच्या तावडीतून बाहेर पडणे देखील शक्य नाही. पण या खाजगीकरणाच्या इतरही काही सकारात्मक बाबी आहेत. उदाहरणार्थ, देशातील अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण झाल्या, जिथे सरकारी विभाग किंवा संस्थांचा हस्तक्षेप नाही. ऑनलाइन अन्न वितरण अॅप  (फूड डिलीवरी ऐप) हे असेच एक क्षेत्र आहे. पण याशिवाय सरकारी खात्यांमध्ये अशा काही शक्यताही निर्माण होत आहेत, जिथे संस्थांचा खर्च कमी करणे, उत्पन्न वाढवणे आणि खासगी संस्थांचा सक्रिय सहभाग वाढवण्याची संधी आहे. आता अवकाश संशोधन आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

परदेशात, विशेषत: अमेरिकन स्पेस एजन्सी नासामध्ये खाजगी कंपन्यांच्या योगदानाचा मार्ग फार पूर्वीच खुला झाला आहे. आता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) सारख्या प्रतिष्ठित संस्थेतही अशी सुरुवात होत आहे. या अंतर्गत, हैदराबादस्थित कंपनी - स्कायरूट एरोस्पेस इस्रोच्या मदतीने भारतातील पहिले खाजगी अग्निबाण विक्रम-एस लॉन्च करण्यात आलं आहे. श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या प्रक्षेपण केंद्रातून भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावाने असलेले विक्रम-एस अग्निबाणाच्या करण्यात आलेल्या प्रेक्षपणाला खूप मोठा अर्थ आहे. तथापि, असे म्हणता येईल की इस्रोची सहयोगी संस्था - अँट्रिक्स कॉर्पोरेशन अंतराळ बाजारपेठेला टॅप करण्याच्या दृष्टीने अनेक खाजगी कंपन्यांचे सहकार्य घेत आहे. परंतु इस्रोच्या बहुतेक कामांवर आणि संशोधनावर   या सरकारी संस्थेचे वर्चस्व राहिले आहे. इस्रोने  अग्निबाणची निर्मिती, प्रक्षेपण आणि अवकाशाच्या कक्षेत उपग्रह स्थापित करण्याचे काम यापूर्वी कोणत्याही खासगी संस्थेच्या हाती दिले नव्हते. पण विक्रम-एस नावाच्या या पहिल्या खाजगी अग्निबाणने इस्रोची कहाणीच बदलणार आहे. इस्रो यापूर्वीही असे खाजगी उपग्रह अवकाशात पाठवत आला आहे. 

अलीकडेच, इस्रोने आपल्या शक्तिशाली अग्निबाण जीएसएलवी मार्क 3 च्या सहाय्याने ब्रिटीश कंपनी वनवेबचे 36 उपग्रह नियुक्त कक्षांमध्ये पोहोचवून एक नवीन विक्रमही केला आहे. आता विक्रम-एस अग्निबाण हा त्या संबंधातील महत्त्वाचा दुवा मानला जाईल. परंतु या संपूर्ण मालिकेत अधिक जान आली ती  जेव्हा 'इंडियन स्पेस असोसिएशन' म्हणजेच इस्पा भारतात अंतराळ कार्यक्रमांवर काम करणाऱ्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांना एकत्र आणण्यासाठी सुरू करण्यात आली. आता इस्रो व्यतिरिक्त टाटा, भारती आणि एलएंडटी सारख्या मोठ्या खाजगी कंपन्याही यामध्ये सहभागी झाल्या आहेत. अवकाश क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाने काय होईल, याचे उत्तर इस्रोच्या एका आकडेवारीतूनच मिळते. खरं तर, इस्रोच्या मते, जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था सुमारे 360 अब्ज डॉलर इतकी आहे, परंतु भारताचा वाटा केवळ दोन टक्के आहे. इस्रोचा अंदाज आहे की जर भारतातील अंतराळ क्षेत्राचा आणखी विस्तार झाला तर देश 2030 पर्यंत हा वाटा नऊ टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो.

पण त्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. सर्वप्रथम, अंतराळ बाजारपेठेतील कोणत्याही देशाने चंद्र किंवा मंगळ मोहिमांच्या कामांबरोबरच शक्तिशाली अग्निबाण तयार करणे, उपग्रह प्रक्षेपित करणे आणि अवकाशात त्यांची स्थापना करणे यामध्ये आपली योग्यता आणि क्षमता सिद्ध करणे आवश्यक आहे. भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे की, गेल्या काही वर्षांत इस्रोने आपल्या सर्व कामगिरीसह आपली क्षमता जगासमोर ठेवली आहे. यामुळे संपूर्ण अवकाश बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयटी आणि बीपीओ उद्योगानंतर, अंतराळ वाहतूक हे जगातील तिसरे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे, ज्यामध्ये भारत पाश्चिमात्य देशांसाठी काम करून चांगली कमाई करत आहे. इस्रोकडून उपग्रह प्रक्षेपित करण्याचा खर्च इतर देशांच्या तुलनेत 30 ते 35 टक्के कमी असल्याचे मानले जाते. इस्रो याची किंमत जाहीर करत नसला तरी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी तो साधारणतः 30 हजार डॉलर प्रति किलोग्रॅम आकारतो. 

पीएसएलवी सारख्या अग्निबाणच्या बळावर भारताने हे सिद्ध केले आहे की जगातील सर्वात मोठी प्रक्षेपण सेवा प्रदाता बनण्याची त्याची प्रबळ क्षमता आहे. परदेशी उपग्रहांना स्वतःच्या अंतराळात पाठवण्याचा उपक्रम हे खरं तर आधीच प्रचंड बजेट असलेल्या भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी पैसे उभारण्याचे एक साधन आहे. आज परिस्थिती अशी आहे की अनेक युरोपीय देश भारतीय अग्निबाणने त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यास प्राधान्य देतात. याचे कारण निव्वळ आर्थिक आहे. भारतीय अग्निबाणद्वारे उपग्रह पाठवणे स्वस्त पडते आहे. याशिवाय भारतीय अग्निबाणचा यशाचा दरही खूप चांगला आहे. गेल्या काही वर्षांत पीएसएलव्ही अग्निबाणने अनेक परदेशी उपग्रहांना कक्षेत यशस्वीपणे पाठवले आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पाश्चिमात्य देश भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची खिल्ली उडवत होते, तेच देश आज आपले उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारतीय अग्निबाणचा सहारा घेत आहेत. 

अग्निबाणचे यशस्वी प्रक्षेपण करणे आणि उपग्रह अवकाशाच्या कक्षेत प्रस्थापित करणे यातून कमाई करण्यात इस्रोने एकामागून एक मोठी आघाडी घेतली आहे. 21 जानेवारी 2008 रोजी पीएसएलवी सी-10 चे प्रक्षेपण हे परदेशी उपग्रह प्रक्षेपणाच्या दिशेने पहिले मोठे यश मानले जाते कारण त्यातून पाठवलेला एकमेव उपग्रह हा इस्रायलचा पोलारिस परदेशी उपग्रह होता. या यशाचाच परिणाम आहे की, आतापर्यंत पीएसएलव्ही वरून पाठवलेल्या देशी-विदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे, इस्रोची सहयोगी कंपनी - अँट्रिक्स कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड एक फायदेशीर आस्थापना बनली आहे. आता इस्रोचे विशेष लक्ष अंतराळातून देशासाठी भांडवल उभारण्यावर आहे. खाजगी क्षेत्राच्या मदतीने उपग्रह आणि अग्निबाणच्या निर्मितीला गती देण्याचा आणि त्या अग्निबाणच्या माध्यमातून अत्यंत स्पर्धात्मक किमतीत विविध देशांचे उपग्रह अवकाशात सोडण्याचा आणि त्यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न आहे. या क्रमाने, हे लक्षात ठेवावे लागेल की खर्च आणि कमाईच्या बाबतीत, इस्रो आता नासापेक्षा अधिक सक्षम संस्था मानली जात आहे. 

पण या गोष्टींचा अर्थ असा नाही की चंद्र किंवा मंगळ संशोधनात किंवा गगनयानसारख्या मोहिमांमध्ये इस्रो हलगर्जीपणा करेल. खरेतर, खाजगी संस्थांसोबत काम शेअर करण्याचा थेट फायदा म्हणजे इस्रो आता अधिक कठीण आणि उपयुक्त अंतराळ प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करू शकतो, ज्यामुळे त्याला नासापेक्षाही अधिक प्रतिष्ठा मिळू शकते. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात स्वत:ला महासत्ता म्हणून सिद्ध करण्याच्या त्यांच्यातील स्पर्धेतून अमेरिका किंवा रशियाच्या अवकाश मोहिमांचा जन्म झाला आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. या उलट अगदी कमी खर्चात कोणताही गाजावाजा न करता इस्रोचा जन्म झाला.  अंतराळ मोहिमेद्वारे देशाचा आणि भारतातील लोकांचा विकास सुनिश्चित करणे हे इस्रोचे ध्येय आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment