Wednesday, November 2, 2022

पुस्तकांचा कोपरा

महात्मा गांधींनी पुस्तकांना माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हटले आहे, तेव्हा त्याला आजही एक खोल अर्थ आहे. मात्र आज जसे आपण आधुनिक झालो आहोत तसे तंत्रज्ञानाचे गुलाम होत चाललो आहोत. त्यामुळे आपले पुस्तकांपासूनचे अंतर सातत्याने वाढत चालले आहे. शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्याची व्याप्ती वाढली आहे, प्रत्यक्षात पुस्तकांचा आधार असलेल्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांचे वाढते अंतर हे शिक्षणतज्ज्ञांच्या चिंतेचे कारण ठरत आहे. काळानुरूप शैक्षणिक धोरणे आणि अभ्यासक्रम बदलले आहेत, तरीही विद्यार्थी पुस्तकांशिवाय इतर मार्ग शोधत आहेत. उदाहरणार्थ, नोट्स, पासबुक आणि 'वनवीक' सारख्या मालिका इत्यादींच्या मदतीने शिक्षणाची नौका पार केली जात आहे. जर विद्यार्थी पुस्तकांशिवाय उच्च शिक्षण घेत असतील तर ते किती शिकत आहेत किंवा किती ज्ञान मिळवत आहेत?  आणि कसल्याप्रकारचे नागरिक बनत आहेत, हा मोठा चिंतेचा विषय आहे. सत्य हे आहे की वाचकांना किंवा विद्यार्थ्यांना सल्ले, व्याख्याने देऊनही ते पुस्तकाभिमुख होताना दिसत नाहीत, कारण वातावरण दिवसेंदिवस पुस्तकविरोधी होत चालले आहे. टीव्हीनंतर आता स्मार्टफोन आणि डेटाचा वापर सहजसुलभ झाल्याने सर्व काही ऑनलाइन झाले आहे. ग्राहकांना यापुढे बाजारात जाण्याची गरज राहिलेली नाही तसे  मुलांनाही शाळेत जाण्याची गरज भासेनाशी झाली आहे. कोरोना काळाने कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्याची गरज नसल्याचे दाखवून दिले आहे. 'वर्क फ्रॉम होम' किंवा ऑनलाइन टू वर्क, घरून मीटिंग आणि सर्व प्रकारचे शिक्षण व्हिडीओच्या माध्यमातून घरी बसून केले जात आहे. विद्यार्थी आता ऑनलाईन परीक्षेसाठी जोर देत आहेत. यासाठी आंदोलने झाली आहेत. तासही ऑनलाईन व्हावेत, यासाठी मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत पुस्तक वाचायला कोण बसेल? फक्त डिग्री मिळायची एवढाच उद्देश आता राहिला आहे.

अशा वेळी पुस्तके कोण वाचत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माहितीचा साठा स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर उपलब्ध असताना आणि प्रत्येक माहिती देण्यासाठी पाने न उघडता 'गुगल बाबा'  सज्ज असताना, मग विद्यार्थ्यांनी पुस्तकासाठी शाळा- कॉलेज किंवा ग्रंथालयात का पोहोचावे? पुस्तकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना ही मंडळी ग्रंथालयांची पायरी का चढतील अथवा पुस्तकांचे कप्पे का धुंडाळत बसतील?  युट्युबवर प्रत्येक विषयाचे ऑडिओ-व्हिडीओ आणि प्रत्येक शहरात कोचिंगचे जाळे विणले जात असताना, ग्रंथालये केवळ शोभेच्या वास्तू तर राहणार नाहीत ना? वेळ ही अशी आहे की, तिला कोणत्याही परिस्थितीत मागे वळता येत नाही. हे खरे की,  माणसाचा वेग खूप वाढला आहे. कोणाकडेही मोकळा वेळ नाही किंवा कमीत कमी वेळेत आणि कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे आहे. आता लांब आणि सुरक्षित चालण्याचा विचार पूर्णपणे नाहीसा झाला आहे. संयमाचा, समाधानाचा पूर्ण अभाव निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत सर्वांना शांतता हवी असते, पण आता ती नाही मिळत, ती फक्त थडग्यातच शक्य होईल, कारण प्रत्येकजण 'उद्या शांतता हवी आहे' म्हणून धावाधाव करत आहे. आज प्रत्येकजण सर्व काही साध्य करण्याच्या, अधिक पैसे मिळविण्याच्या शर्यतीत आहे. अशा परिस्थितीत पुस्तकांचे वाचक होण्याऐवजी ते सतत ऑडिओ-व्हिडिओच्या गर्तेत अडकून राहिले आहेत.

साहित्यात आता कथेला महत्त्व आहे, कादंबरीला नाही. वाचकवर्ग कथेला आहे की कवितेला , हा वादाचा मुद्दा ठरला आहे. दरवर्षी ज्या पद्धतीने कादंबऱ्या येत आहेत, त्यावरून हे सिद्ध होते की, महाविद्यालयांमध्ये पुस्तकांकडे कल कमी झाला असला, तरी साहित्य, कादंबऱ्या या लोकप्रिय प्रकाराचे वाचक आजही कायम आहेत. कादंबरीला सध्याच्या काळातील महाकाव्य म्हटले गेले आहे, हे काही उगीच म्हटले गेले नाही. या पुस्तकविरोधी काळातही मोठ्या प्रमाणावर कादंबऱ्यांचे प्रकाशन आणि वाचन हा कादंबरीला वाचक असल्याचा पुरावा आहे. ज्या वाचकाला वेळ आणि समाज खोलात जाऊन समजून घ्यायचा आहे, तो पुस्तके विकत घेतल्याशिवाय राहत नाही. मात्र विद्यार्थी अभ्यासाला टाकलेल्या कादंबऱ्या न वाचता त्याचे नोट्स वाचण्याकडे अधिक प्रमाणात वळला आहे. त्याला पुस्तके आणि त्यातला भाव जाणून घेण्याची आवश्यकता भासत नाहीत. साहित्याचा वाचक असणे आणि विद्यार्थी वाचक असणे यात मोठा फरक आहे.'एक आठवडा'  ( वन विक) या मालिकेतून जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण करतात आणि कधी तरी- केव्हा तरी अध्यापन करतात, तेव्हा या युगाच्या वाचनहीनतामागे दडलेल्या  संदर्भांचा , कारणांचा सहज शोध घेता येईल. असे पुस्तकाचे वाचक न होणारे शिक्षक  नवीन वाचक कसे घडवतील? त्यामुळे या काळात वाचकसंख्या वाढण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात आणि पुस्तकांकडे पाठ फिरवण्याची किंवा पुस्तक संपवण्याची चाललेली प्रक्रिया, त्या सोडवण्याचे मार्गही शोधता येतील, पण वाढत्या तंत्रज्ञानामुळे पुस्तकांच्या विपरीत, बदलत्या विचारसरणी आणि संयम कमी होणे या सगळ्या गोष्टी पुस्तकविरोधी होत चालल्या आहेत.  अशा वेळी पुस्तकांचा वाचक असणं वाळवंटातल्या ओएसिसची अनुभूती देतो. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासात, जवळजवळ प्रत्येकजणच हातातल्या स्मार्टफोनमध्येच गुंगून गेलेला असतो,  जणू काही त्यात सखोल काहीतरी शोध घेत असतो. अशा स्थितीत एखादी व्यक्ती हातात पुस्तक घेऊन वाचताना दिसली, तर जगात काही तरी विचित्र गोष्ट घडत आहे, असे त्या दृश्यातून प्रतीत होत आहे, असं वाटतं.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment