सलील चौधरी हे एक महान संगीतकार होते, ज्यांनी भारतीय चित्रपट जगाला आपल्या मधुर संगीत लहरींनी सजवले. त्यांनी प्रामुख्याने बंगाली, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांना संगीत दिले. चित्रपट विश्वात सलीलदा या नावाने प्रसिद्ध असलेले सलील चौधरी हे अत्यंत प्रयोगशील आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून ओळखले जातात. सलील चौधरी पूर्व आणि पश्चिमेतील संगीताचा मेळ साधून पारंपरिक संगीतापेक्षा खूप वेगळे संगीत तयार करायचे. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1923 रोजी झाला. सलील चौधरी यांचे बहुतांश बालपण आसाममध्ये गेले. लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे कल होता आणि त्यांना मोठेपणी संगीतकार व्हायचे होते. विशेष म्हणजे त्यांनी संगीताचे पारंपारिक शिक्षण कोणत्याही गुरूकडून घेतले नाही.
त्यांचा मोठा भाऊ ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचा. त्याच्या सहवासामुळे सलील चौधरी यांना सर्व प्रकारच्या वाद्यसंगीताची चांगलीच ओळख झाली. काही काळानंतर ते शिक्षणासाठी बंगालमध्ये आले. कोलकाता येथील प्रसिद्ध बंगवासी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, ते 'भारतीय जन नाट्य संघ'मध्ये दाखल झाले. 1940 मध्ये भारतीय स्वातंत्र्यलढा शिगेला पोहोचला होता. सलील चौधरीही देश स्वतंत्र करण्याच्या मोहिमेत सामील झाले आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या गाण्यांचा आधार घेतला. आपल्या संगीतबद्ध केलेल्या गीतांमधून ते देशवासीयांमध्ये जागृती करत असत. गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सलील यांनी या गाण्यांचा शस्त्रासारखा वापर केला.
पन्नासच्या दशकात सलील चौधरी कोलकात्यात संगीतकार आणि गीतकार म्हणून स्वत:ची खास ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले. 1950 मध्ये त्यांच्या स्वप्नांना नवा आकार देण्यासाठी ते मुंबईत आले. त्याच वेळी विमल राय त्यांच्या 'दो बिघा जमीन' चित्रपटासाठी संगीतकाराच्या शोधात होते. सलील चौधरी यांच्या संगीताच्या शैलीने ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना त्यांच्या 'दो बिघा जमीन'मध्ये संगीत देण्याची ऑफर दिली. अशा प्रकारे सलील चौधरी यांनी 1953 मध्ये रिलीज झालेल्या 'दो बिघा जमीन' मधील 'आ री आ निंदिया...' या गाण्यासाठी संगीतकार म्हणून पहिले संगीत दिले. या चित्रपटाच्या यशानंतर सलील चौधरी यांना संगीतकार म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली.
सलील चौधरी यांच्या चित्रपट कारकिर्दीत, गीतकार शैलेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप गाजली आणि चांगले कौतुकही झाले. त्यानंतर गीतकार गुलजार यांच्यासोबतची त्यांची जोडीही खूप गाजली. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काबुली वाला' या चित्रपटातील या दोन कलाकारांची गाणी आणि संगीत सर्वप्रथम पसंद केले गेले. दो बिघा जमीन, नौकरी, परिवार, मधुमती, पारख, उसने कहा था, प्रेम पत्र, पूनम की रात, आनंद, मेरे अपने, रजनीगंधा, छोटी बात, मौसम, जीवन ज्योती, अग्नि परीक्षा आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. सलील चौधरी यांना 1958 मध्ये विमल राय यांच्या मधुमती चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 1988 मध्ये संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांनी लिहिलेल्या नाटकांनी बंगाली रंगभूमी गाजवली आहे.
सत्तरच्या दशकात सलील चौधरी यांना मुंबईची चमक-धमक काहीशी विचित्र वाटू लागली. ते कोलकात्यात परत आले. दरम्यान त्यांनी अनेक बंगाली गाणीही लिहिली. यातील 'सुरेर झरना' आणि 'तेलेर शिशी' श्रोत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. सलील चौधरी यांनी त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीत सुमारे पंचाहत्तर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, आसामी, ओरिया आणि मराठी चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांचा मृत्यू 7 सप्टेंबर 1995 रोजी झाला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment