Tuesday, January 3, 2012

स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती: सावित्रीबाई फुले

    क्रांतिदूत ज्योतिराव फुले व सावित्रीबाई यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली.१८५३ साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी देशातील पहिली शाळा काढून परंपरावाद्यांच्या गुलामगिरीत असनार्‍या स्त्रिया, दलित, मागासवर्गीय यांच्यासाठी ज्ञानाची कवाडे उघडून हजारो वर्षे अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असणार्‍या या समाजात ज्ञानज्योत पेटवून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्याची किमया केली. नायगावच्या सावित्री खंडोजी नेवसे पाटील पुण्याच्या सावित्रीबाई जोतिराव फुले झाला. तेव्हापासून  त्यांच्या जीवनाला आणि देशाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले. भारतीय समाजात वेगळेच स्थित्यंतर घडून आले. सार्‍या जगाला वंद्य ठरलेल्या जोतिरावांच्या कार्याला सक्रिय साथ-संगत देत त्यांनी कार्यकर्तृत्व घडवले ही साथसंगत केवळ ‘मम’ म्हणणारी आणि उखाण्यात सांगणारी कधीच नव्हती. अंत:प्रेरणांसह परिवर्तनाचे मैदान त्यांनीही निवडले. परिवर्तनासाठी समाजभूमी तयार करणारी भूमिका घेतली.जात, वर्ण, वंश, लिंग, धर्म या आधारावर विषमता पोसणार्‍या समाजाला छेद दिला. भेदाभेद करणार्‍या तथाकथित संस्कृतीला आव्हान दिले. शोषितांच्या उत्थापनाचा ध्यास आणि शोषकांच्या स्वार्थी प्रवृत्तीविरुद्धचे युद्ध जोतिराव गोविंदराव फुले आणि सावित्रीबाईंनी पुकारले. त्यामुळेच, आज भारतभर अनेक सावित्री विविध क्षेत्रांत आपली मुद्रा उमटवीत आहेत.
      शूद्र-अतिशूद्रांसाठी शिक्षण खुले करायचे असेल, अनाथ मुलांचा, फेकून दिलेल्या मुलांचा सांभाळ करायचा असेल, घराचेच अनाथालय करायचे असेल किंवा अशा अनाथांचे आई-वडील बनायचे असेल तर प्रत्येक वेळी सावित्रीबाई आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहताना दिसल्या आहेत. अशी भूमिका करताना त्या अनेकदा स्वतःची प्रज्ञा, स्वतःचा विचारही ठामपणे वापरतात. केवळ पतीभक्त आणि पतीनिष्ठा म्हणूनच त्या हे सारे करीत आल्या, असे नाही तर समाज बदलाची तीव्र आकांक्षा पतीप्रमाणे त्यांच्याही मनात सतत होती. पतीचे आदेश पालन करणारी एक पत्नी एवढीच त्यांची भूमिका नाही, तर स्वतंत्रपणे अनेक लढायांना निमंत्रण देणारी आणि त्या लढणारी वीर पत्नी, वीर महिला म्हणूनही त्यांची भूमिका होती. खरोखरच त्या स्वतःचा विचार आणि स्वतःचा कणा घेऊन जगणाऱ्या महिला होत्या, हे फुल्यांच्या निधनानंतरही सिद्ध झाले. फुल्यांच्या सर्व लढाया तर त्यांनी पुढे नेल्याच, शिवाय स्वतःच्या लढायाही त्या लढल्या. पायाला भिंगरी लावून त्या फिरल्या. अनेक आंदोलनांचे स्वतः नेतृत्व केले. रुग्णांची सेवा केली. शिक्षणाची चळवळ पुढे नेली आणि व्यवस्थेच्या मानेवर तर उभ्या राहिल्याच राहिल्या.महात्मा फुले आणि क्रांतिज्योती फुले त्यापैकी एक होते. त्यांचे अवघे जीवन, अवघा श्‍वास, अवघ्या हालचाली या समाजाशी, लढायांशी जोडल्या गेल्या आहेत. स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत हे पती-पत्नी एकाच विषयावर चर्चा करताना दिसतात आणि तो विषय म्हणजे गड्या आपल्याला समाज बदलायचा, व्यवस्था बदलायची, माणसांचे अवमूल्यन थांबवायचे आणि त्यासाठीच जगायचे. समाजक्रांती हेच या दाम्पत्याच्या जगण्याचे प्रयोजन होते. त्यासाठीच ते जगले.

     स्त्रियांना कोणतेच स्वातंत्र्य नव्हते त्या काळात स्त्रियांसाठी परिवर्तनाचे प्रशस्त मार्ग त्यांनी निर्माण केले. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या सामाजिक, धार्मिक कौटुंबिक स्वातंत्र्यासाठी नवा विचार, नवे कार्य आरंभिले आणि पूर्णत्वास नेले. आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे सामाजिक युद्धात घालविली. या युद्धात झालेले आघात, छळ सहन केला. मात्र, आपला मार्ग आणि शेवटी अपले यश कायम ठेवले. सार्‍या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. विविध वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार केले. असंख्य मुलींना प्रेरणा देऊन ज्ञानक्षेत्रात आणले. शिक्षण नव्हे, ज्ञान दिले. त्यातूनच मुक्ता साळवेंचा विद्रोही आविष्कार घडला. आधुनिक भारताच्या शिक्षणाचे नायकत्व सावित्रीबाई फुले यांच्याकडे जाते.
    सामान्यांच्या आशा-आकांक्षांचे, शोषितांच्या संपन्न स्वप्नांचे जग निर्मिण्याची मागणी होते आहे. सावित्रीबाईंच्या कार्य-विचारांना व्यापक, विशाल, अथांग अर्थ प्राप्त झाला आहे. नवा समाज आणि नव्या समाजाची नवी संस्कृती याचा ध्यास या कार्य-विचारातून प्रकट झाला. त्यासाठीच सावित्रीबाईंच्या विचारांची, कार्याची वर्तमानाला गरज आहे. त्यातून भविष्य निर्माण होईल. गर्भातच स्त्री संपविणार्‍या या वर्तमानाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे, विचाराचे सरण अटळ आहे.

1 comment: