Sunday, January 22, 2012

सकारात्मक विचारांचा संकल्प!

     १९५२ मध्ये एडमंड हिलरीने जगातल्या सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश मिळाले नाही. काही आठवड्यांनंतर त्याला इंग्लंडमधील एका कार्यक्रमात बोलायला लावले. हिलरी मंचावर आला आणि माऊंट एव्हरेस्टच्या चित्रांकडे पाहत मूठ आवळत म्हणाला,‘माऊंट एव्हरेस्ट, तू मला पहिल्या वेळेस हरवले आहेस, पण पुढच्या खेपेला मी तुला हरवून टाकीन. कारण तू आणखी उंच वाढू शकत नाहीस. मी मात्र प्रगती करू शकतो.’
एका वर्षाने म्हणजे २९ मे रोजी एडमंड हिलेरी माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. त्यावेळी हिलरी म्हणाला होता, माणसाला पर्वतावर नव्हे तर स्वत:वर विजय मिळवावा लागतो. ‘दी सिक्रेट’ची लेखिका रॉन्डा बर्न आपल्या जीवनाविषयी सांगते,‘‘मी पूर्णपणे निराश झाले होते. शारीरिक, भावनात्मक आणि आर्थिकदृष्ट्या पुरती खचून गेले होते. त्यातच अचानक माझे वडील गेले. आता मला माझ्या आईचीही चिंता सतावू लागली. चारी बाजूंनी जसा दु:खाचा डोंगर कोसळला. मी रात्रंदिवस रडत होते... रडत होते आणि फक्त रडत होते, पण अचानक माझ्या मनात आशेचा एक तरंग उमटला. आता मी चांगल्या गोष्टींना माझ्या जीवनाकडे खेचू लागले. चांगल्या गोष्टींची आशा करताच मी प्रसन्नता महसूस करू लागले. चमत्कार होऊ लागला. मी शारीरिक, मानसिकदृष्ट्या अत्यंत समाधानी राहू लागले. श्रीमंत होऊ लागले आणि प्रसिद्धीचे वलयही विस्तारू लागले. हीच ‘दी सिक्रेट’ची सुरुवात होती माझ्यासाठी! मी एक बेस्ट सेलर पुस्तकाची लेखिका बनले होते. कारण मला खात्री होती की, असे होणार!
     नव्या वर्षात आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया की, नेहमी आशेचा पदर धरून चालू. मग पुढ्यात कितीही संकटे येऊ दे. निराश व्हायचं नाही. दु:खी व्हायचं नाही. आपण आशावादी राहिलं की, नशीबसुद्धा आपल्या मागे मागे चालून येईल. ‘युनिवर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलियामधील (यूएस) मानसशास्त्राचे प्रोफेसर बार्बरा फ्रेड्रिक्सन यांनी आपल्या ताज्या संशोधन म्हटले आहे की, सकारात्मक भावनेमुळे मोठमोठ्या संकटांवर मात करण्यासाठी ऊर्जा मिळते, उत्तम क्षमता प्राप्त होते, इतकेच नव्हे तर त्यामुळे एकाग्रता आणि शिकण्याच्या ऊर्मीत वाढ होते. फ्रेड्रिक्सन म्हणतात, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही पॉझिटिव्ह गोष्टी,विचार आणि प्रसन्नतेच्या संबंधातली काही रंजक तथ्ये अभ्यासली आहेत. सकारात्मक विचाराने जीवनात महत्त्वपूर्ण यशात्मक बदल घडवता येतात याचा शोध लागला आहे.’
     रॉन्डा बर्न म्हणतात,‘‘तुम्ही या ब्रह्मांडातले सर्वात शक्तिशाली चुंबक आहात. जसा विचार कराल तसेच घडेल. चांगल्याची आशा करा... चांगल्या गोष्टीची खात्री बाळगा... सगळे काही चांगलेच होईल. तुम्ही आशावादी राहिलात आणि एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टी व विचारांवर फोकस करीत राहिलात, तर त्याक्षणी तुम्ही ब्रह्मांडातल्या सकारात्मक वस्तूंना आपल्याकडे खेचत असता.’’
‘‘आशावादी माणसे आजारी पडल्यावरही रूटिन जीवनाशी जोडलेली असतात. आपल्याला कुठला तरी आजार आहे आणि त्याचाच रात्रंदिवस विचार करता आहात, तुमच्या भेटीला येणार्‍या लोकांशी याच विषयांवर बोलता आहात तर मग खात्रीने समजा की, तुम्ही या आजाराच्या अधिक कोषिका निर्माण करता आहात. दिवसभर स्वत:ला शंभरदा म्हणा, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, फिट आहे, मला मस्त वाटते आहे. असे म्हणून स्वत:ला ऊर्जा द्या आणि सामान्य जीवनाशी एकरूप व्हा.’’ रॉन्ड बर्न
     जो नेहमी आशेवर जगतो. आशेचा पिच्छा सोडत नाही. त्यांनाच जीवनाची साथ मिळत राहते. आशावादी माणसे अगदी पर्वतसुद्धा हलवून सोडतात असे म्हटले जाते. सकारात्मक चिंतन आणि शास्त्रज्ञांच्या नव्य संशोधनाने आशेवर जगणार्‍यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत राहतात हे सिद्ध केले आहे. त्यामुळे माणसाने काहीही होवो, आपला सकारात्मक विचार दृष्टीकोन सोडायचा नाही. त्यामुळे आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या ऊर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य, पण त्यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ताकरविता आहे. मन दिसत नाही, पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडों मैलाचा पल्ला पार करू शकते. मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा, मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर... सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात.
- मच्छिंद्र ऐनापुरे           saamana.utsav  22/1/2012

No comments:

Post a Comment