Monday, January 9, 2012

बालकथा तेलही गेले , तूपही गेले

एका गावात बाबूराव नावाचा शेतकरी राहात होता. तो स्वतःला मोठा शहाणा समजायचा. मोठमोठ्या बढाया मारायचा. गावातल्या जुन्या-जाणत्या लोकांना त्याचे हे वागणे आवडायचे नाही. ते त्याला समजावून सांगत, जग खूप मोठं आहे. या भूतलावर जशी खूप मोठमोठी विदवान मंडळी आहेत, तशी भामटी, चतुर आणि वाईट माणसेही आहेत. त्यामुळे गरजेला जुन्या-जाणत्यांचा सल्ला घ्यावा. आपण चुकत तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी. यासाठी चार उन्हाळे -पावसाळे अधिक झेललेल्या लोकांची मदत घ्यावी. पण, बाबूरावला या सगळ्या गोष्टी व्यर्थ वाटायच्या. आपणच शहाणे, आपणच ज्ञानी, आपल्यापुढे दुसरा कोणी नाही, असे त्याला वाटायचे.
एकदा त्याला बाजारातून म्हैस खरेदी करून आणायची होती. ही गोष्ट त्याने गावातल्या काही लोकांपुढे बोलून दाखवली. त्यातल्या काहींनी जुन्या- जाणत्यांचा सल्ला घेण्याबाबत सुचविले. तर काहींनी अशा कामाला एकटया-दुकटयाने जाण्यापेक्षा आणखी कोणाला तरी सोबत घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यांना बाबूराव हेकडपणे म्हणाला," मी एकटा चार माणसांना भारी आहे. मला कुणाच्या मदतीची अजिबात गरज नाही." हे ऐकून सारे गप्प झाले.
बाबूराव बाजारातून म्हैस खरेदी करून माघारी येत होता. वाटेत एक गाव लागले. गावात एक भामटा ठक राहात होता. एकटा बाबूराव आणि म्हैस पाहिल्यावर त्याच्या मनाला हाव सुटली. तो हात खाजवत म्हैस हडपण्याची योजना बनवू लागला.
तो बाबूरावच्या मागोमाग चालू लागला. गावापासून काही अंतर गेल्यावर त्याने हळूच म्हैशीचा दोर मागून मधोमध कापला. आणि म्हैस घेऊन मागच्या मागे सटकला. बाबूरावला कळलेसुद्धा नाही. तो आपल्याच मस्तीत हातात एक दोर घेऊन चालत होता. बरेच अंतर गेल्यावर त्याने अचानक मागे वळून पाहिले तर म्हैस गायब! त्याला कळायचेच बंद झाले. भ्रमिष्टासारखा इकडे-तिकडे पाहू लागला. पण त्याला म्हैस काही दिसली नाही. मग त्याने म्हैशीच्या पावलांचे ठसे न्याहळले. ठसे दिसतील त्या दिशेने माग काढत चालू लागला.
बाबूराव ठकाच्या गावाजवळ आला तेव्हा त्याने एका विहिरीजवळ एक इसम डोके धरून रडत बसलेला पाहिला. तो म्हैशीचा विचार सोडून माणसाजवळ गेला. त्याला रडण्याचे कारण विचारले," मी बाजारात माल विकून माघारी गावी परतत होतो. वाटेत मला फार तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी इथे विहिरीजवळ आलो. विहिरीतून शेंदून पाणी प्यावं, असा विचार करून पुढे झुकलो. आणि अचानक कमरेला बांधलेली नाण्यांची थैली सुटली आणि खाली विहिरीत जाऊन पडली. त्यात पाचशेची चांदीची नाणी होती. कमावलेले पैसे घेऊन फार दिवसांनी गावाकडे चाललो होतो, पण सगळी कमाई पाण्यात गेली. आता रिकाम्या हाताने घरी कसा जाऊ?" असे म्हणत तो मोठमोठ्याने रडू लागला.
पाचशेची चांदीची नाणी असल्याचे ऐकल्यावर बाबूरावला तोंडालाही पाणी सुटले. लोभाने त्याच्या मनाला घेरले. तो आपली हरवलेली म्हैस विसरून गेला. बाबूराव म्हणाला," मी विहिरीतून थैली काढून दिल्यावर मला काय देशील?" तो इसम म्हणाला," मी तुला निम्मी चांदीची नाणी देईन." बाबूरावने विचार केला, फक्त थोडेशे कष्ट केल्यावर अडीचशेची नाणी मिळणार असतील तर यापेक्षा आणखी दुसरा धंदा कुठला?" आता म्हैशीला शोधण्यात काही अर्थ नाही, असा विचार करून त्याने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. आपल्याजवळचे पैसे त्या इसमाच्या हातात सोपवून बाबूरावने विहिरीत उडी घेतली. पाण्यात डुबकी घेऊन वर आला. पण थैली सापडली नाही. असा बराच वेळ पाण्यात थैली शोधत राहिला, पण व्यर्थ. विहिरीचा सारा तळ त्याने धुंडाळून पाहिला, पण हाताला काहीच लागले नाही. शेवटी हताश होऊन तो विहिरीबाहेर आला.बाहेर आल्यावर पाहतो तर कपडे आणि पैशाबरोबर माणूसही गायब! तेलही गेले आणि तूपही गेले, अशीच त्याची अवस्था झाली.
आता मात्र बाबूरावला आपल्या मूर्खपणाचा पश्चाताप होऊ लागला. म्हैस गमावल्यावर गाठीचे पैसेही लोभापायी कपड्यासकट गमावून बसला होता. बाबूराव गावात पोहचल्यावर त्याची ती अवस्था पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले आणि वाईटही. मात्र आता बाबूराव पुरता बदलला. त्याला कळून चुकले की जग खूप मोठे आहे. आणि यात खूप चतुर आणि बुद्धीमान माणसेही आहेत. ठकास महाठकही आहेत. त्याने बढाई न मारता आपली सगळी चूक स्वीकारून गाववाल्यांना सगळे काही खरे खरे सांगून टाकले आणि भविष्यात जुन्या-जाणत्यांचा सल्ला मानण्याचा व त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.

No comments:

Post a Comment