'द डर्टी पिक्चर' मध्ये विद्या बालनने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील 'बोल्ड' अभिनेत्री म्हणून एक काळ प्रसिद्धी पावलेल्या सिल्क स्मिताच्या वादग्रस्त आयुष्यावरची भूमिका साकारली आहे. रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच अशा प्रकारचे बोल्ड कॅरेक्टर साकारण्याचे धाडस करून विद्याने प्रेक्षकांना चकित करून टाकले. मात्र प्रेक्षकांनीही तिच्या या धाडसाला सलाम करीत भरभरून दिली आहे. आगामी 'कहानी' चित्रपटासुद्धा विद्याचा नवा अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘कहानी’ या सुजॉय घोष दिग्दर्शित आगामी चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ झळकला असून विद्या बालनने या चित्रपटात गरोदर आईची व्यक्तिरेखा साकारली आहे.
आतापर्यंत आपल्या फिल्मी करिअरमध्ये विद्याने बहुविध अशा भूमिका साकारल्या आहेत. रेडिओ जॉकी, प्रोजेरियाने पिडित असलेल्या १२ वर्षाच्या मुलाची आई आणि याशिवाय प्रेमिका ते फिजिकली चॅलेंज्ड गर्ल अशा किती किती तरी भूमिका तिने केल्या आहेत. आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात ती नव्या रुपात दिसली आहे. आपल्या अभिनयाची वैविधतता दाखवली आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळा तिचा अभिनय सहजसुंदर आणि विश्वसनीय वाटतो. कदाचित हाच खरा अभिनय आहे, हीच कलाकारी आहे, असे म्हटले पाहिजे. या काळातल्या दुसर्या कुठल्याच अभिनेत्रीने इतक्या अनेकविध भूमिका साकारल्या नाहीत.
करिअरच्या प्रारंभी विद्याने ऍडवरटायजिंग, सिरिअल, रीजनल चित्रपट, म्युझिक व्हिडिओ अशा विविध क्षेत्रात नशीब अजमावले आहे. बराच स्ट्रगल केल्यावर मग कुठे तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. चित्रपटातील आतापर्यंतचा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. कित्येकदा तिला रिजेक्टही करण्यात आले. पण विद्याने हार मानली नाही. खरं तर विद्या चांगले काम मिळावे यासाठी प्रार्थना करायची म्हणे! कठीण काळात मनापासून केलेल्या प्रार्थनेचा परिणाम होतो, यावर तिचा विश्वास आहे. त्यानुसार तिला चांगले दिवस आले आहेत. ‘परिणीता’ चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण करून पदार्पणातच पुरस्कार मिळविल्यानंतर विद्या बालनने ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘भूलभुलय्या’, ‘इश्किया’, ‘पा’ यांसारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकरल्या. 'परिणिता' चित्रपटात ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वाभिमानी मुलीच्या भूमिकेत होती. विद्याने विचारसुद्धा केला नव्हता की, हा चित्रपट मोठे यश मिळवेल. आणि आपल्या कामाची प्रसंशा होईल. पण या चित्रपटात काम केल्याचा तिला खूप आनंद वाटतो. यानंतर विद्याने 'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये रेडिओ जॉकी बनली. यात 'गुड मॉर्निंग मुंबई' म्हणण्याच्या तिच्या विशिष्ट अंदाजाने तर तिने प्रेक्षकांना घायाळ करून टाकले. यानंतर आलेल्या 'गुरू' मध्ये विद्याचा रोल छोटा असला तरी पायाने अपंग, आणि व्हीलचेअरवर बसलेल्या मुलीची भूमिका निभावून तिने पुन्हा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाचे नवे रुप दाखवले. 'सलामे इश्कः द ट्रिब्यूट ऑफ लव' , ' एकलव्यः द रॉयल गार्ड', ; हे बेबी' पासून विद्या आपली टिपिकल इंडियन ब्युटी' वाली इमेज बदलण्याचा प्रयत्न केला.
' भूलभुलैया' मध्ये मंजुलिका बनलेली विद्या 'डीसोसिएटीव आयडेंटिटी डिसऑर्डर' या एक प्रकारच्या मानसिक आजाराने पिडित होती. या चित्रपटात विद्याचा डांस आणि ड्रामाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या नव्या पैलूची ओळख देऊन गेला. विद्या म्हणते की, प्रत्येकवेळा काही तरी नवीन करण्याची मनीषा बाळगून असते. स्वतः ला रिपीट करायला तिला आवडत नाही. कामात, भूमिकेत स्वतः ला झोकून द्यायला विद्याला आवडते. एक ऍक्टर म्हणून माझ्यात काही नवीन करण्याची ऊर्मी आहे. कदाचित या कारणामुळेच तिला प्रत्येकवेळेला काही तरी नवीन करण्याची संधी मिळत असावी.
'पा' मध्ये विद्याने एक अशा मुलाच्या आईची भूमिका केली आहे, जो १२ वर्षाचा मुलगा आहे. व तो 'प्रोजेरिया' नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. अशा मुलाच्या आईची भूमिका करणं काही सोपी गोष्ट नाही. पण विद्याने या भूमिकेलासुद्धा न्याय दिला. विद्या सांगते की ही भूमिका जगण्याची प्रेरणा तिला आईकडून मिळाली. तिची आई पाच वर्षाची होती, तेव्हा तिच्या आजीचं निधन झालं होतं. एक चांगली आई बनणं तिच्या आईचे तिच्या आयुष्यातले मिशन होते. आईने तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला. ती म्हणते की, या चित्रपटातला अभिनय पाहून एका महिलेने फोन केला होता. त्यात ती
तुमच्यासारखी आई बनू इच्छिते, असे म्हणाली होती. इतक्या चांगल्याप्रकारे आईची भूमिका साकारायला मिळाले, हे माझे भाग्यच , असे विद्या सांगते.
'इश्किया'मध्ये विद्याने पुन्हा एकदा जरा हट के काम केले. अपशब्द वापरण्यापासून चुंबनपर्यंतची दृश्ये या चित्रपटात होती. पण विद्या स्वतः ला यासाठी तयार केले. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी तिला 'इश्किया'ची स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हा ही भूमिका करू शकू की नाही, या विषयी विश्वास नव्हता. परंतु आव्हान पेलण्याचीताकद तिच्यात आहे. त्यामुळे तिने ही भूमिका सहज पेलून नेली. कामाचे प्रचंड कौतुकही झाले. विविध प्रकारच्या भूमिका करणे मला आव्हानात्मक वाटते. त्यामुळे ‘किस्मत कनेक्शन’मधील भूमिकेपेक्षा ‘इश्कियाँ’मधील भूमिका अधिक जवळची वाटते. चरित्र अभिनेत्री म्हणवून घेण्यापेक्षा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणवून घेणे मला अधिक भावते , असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. 'इश्किया' नंतर 'नो वन किल्ड जेसिका' मध्ये विद्याने सबरिना लालच्या डिग्लॅमरची भूमिका स्वीकारली. या चित्रपटातही विद्याच्या कामाचे कौतुक झाले.
आपली पूर्वीची सोज्वळ अभिनेत्रीची प्रतिमा संपूर्णपणे बदलून टाकण्याचे आव्हान पेलून आपल्या सहजाभिनयाची उत्कृष्ट झलक विद्या बालनने आताच्या 'डर्टी पिक्चर' चित्रपटामध्ये दाखवली आहे. तिच्या यापुढील अभिनय कारकीर्दीला वेगळे वळण देणारा हा चित्रपट आहे, असे म्हणायला हरकत नाही. ती अभिनेत्री तर उत्कृष्ट आहेच; पण त्याशिवाय ती प्रयोगशीलही आहे. हिरोईनपणाचं ग्लॅमरही वेळप्रसंगी बाजूला ठेवत भूमिकेला न्याय द्यायचा ती शंभर टक्के प्रयत्न करते. अलिकडे तिला डोळ्यांसमोर ठेऊन संहिता लिहिली जात आहे, यासारखे तिचे आणखी दुसरे ते यश कोणते? भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला ती तयार आहे. कलाकाराचे ते कर्तव्यच आहे, असे मानणारी विद्या आता ' कहानी ' नंतर प्रेक्षकांना अभिनयाचे कोणते रंग दाखवणार , हे प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असणार आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment