गाण्यांमध्ये सुर आणि शब्दांपेक्षा बीट्सवर अधिक लक्ष दिले जाऊ लागल्यापासून बॉलिवूडमध्ये जणू काही फुट टेपिंग गाण्यांचे पेवच फुटले आहे. प्रत्येक चित्रपटात तडका-फडका मारणारं गाणं गरजेचं झालं आहे. आता गाण्यात लिरिक्स कसंही असो... जर बीट्स चांगले असतील गाणं चाललं नव्हे पळालंच म्हणून समजा. त्यामुळे साहजिकच सध्या प्रत्येक चित्रपटात अशा थिरकायला लावणार्या अर्थहीन गाण्यांना हमखास स्थान दिलं जाऊ लागलं आहे.
भारतीय संगीताला एक मोठी परंपरा आहे. श्रवणीय गाणी हा संगीताचा आत्मा आहे. पण अलिकडे हा आत्माच हरवत चालला आहे. भाषा आणि शब्दांची सरळ सरळ कत्तल करून केवळ ठेक्याच्या आधारावर श्रोत्यांच्या कानांवर गाणी अक्षरशः आदळवली जात आहेत. अशा गाण्यांची सवय नाही असे नाही, पण त्याला काही मर्यादा होत्या. आता अलिकडच्या काळात या मर्यादा पुसल्या गेल्या आहेत. आजचा युवा वर्ग अशाच संगीताची डिमांड करू लागला आहे. सध्याची जनरेशन अशा गाण्यांना केवळ पसंदच करीत नाही तर त्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या मार्केटिंग फंड्याचा वापर करतण्यात झालेले व्यावसायिक संगीतकार आपले व्यावसायिक रतीब घालण्यात कोणतीही कसर बाकी ठेवताना दिसत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस अशा गाण्यांची क्रेझ वाढत चालली आहे.
पूर्वी गाण्यांचे बोल ध्यान देऊन ऐकले जात, आता ते दिवस गेले म्हणण्याची वेळ आली आहे. गाणे पहिल्यावरच त्याचे चांगले- वाईट पैलू तपासले जात. मात्र आजची गाणी बिलकूल बदलली आहेत. आता गीतकाराची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. गाण्यात थोडे हिंदी शब्द घाला, थोडे इंग्रजी शब्द आणि थोडा प्रादेशिक शब्द टाका. त्यात रॉकिंग बीट्सचा मसाला तडका टाकून चांगला घोळा. बस्स! झालं गाणं... न्यू जनरेशनला असेच रॉक मसालेदार गाणं हवं आहे. त्यात पाय थिरकायला लावणारा तडाका मारला म्हणजे झालं. अनेक अर्थहीन पण उडत्या चालीची गाणी ऐकणं आणि त्यावर धुंद होऊन ठेका धरणं हे जणू आजच्या तरुणाईचं ब्रीद झालं आहे.
'रा-वन' मधील छम्मक छल्लो.... गाण्यावर युवा कमालीचे थिरकाताना दिसतात. शाहरुख खानला चित्रपट हिट ठरवण्यासाठी काय काय उपद्व्याप करायला लागले. पण जर 'रा-वन' मध्ये हे गाणं नसतं तर खरोखरच शाहरुखच्या चित्रपटाचं काय झालं असतं कोण जाणे!शाहरुखचा महत्त्वाकांक्षी, बहुप्रचारित चित्रपट 'रा.वन' वर जवळपास पावणे दोनशे कोटी खर्च करण्यात आले. तर चित्रपटाच्या मार्केटिंगवरच जवळपास 52 कोटी रुपये खर्च केले गेले. पण ताल धरायला लावणारे गाणे आणि छम्मक छल्लो करिनाचे ठुमके लोकांना विशेषतः युवावर्गाला पसंद पडले. सध्या सोशल नेटवर्कवर आणि युवा जनरेशनच्या मोबाईलवर 'वाय दिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी?' या गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. जिकडं पाहावं तिकडं गाणं वाजताना दिसत आहे. पण या गाण्याला कुठला अर्थच नाही. हिंग्लिश आणि तामिळ भाषेतल्या या गाण्याला अर्थच नसल्याचं खुद्द धनुष सांगताना दिसतो. पण तरीही तरुणांनी गाण्याला डोक्यावर घेतलं आहे. अशाच ‘मुन्नी बदनाम हुई...’( दबंग) , ‘कॅरेक्टर ढिला है...’( रेडी) , ‘मौजा ही मौजा’ यासारख्या उडत्या चालीच्या गाण्यांवर ज्यांच्या पावलांनी ठेका धरला नसेल किंवा ‘कैसा ये इश्क है’, या आणि यासारख्या ‘सुफिया अंदाज’मध्ये सादर केलेल्या गाण्यांनी ज्याला डोलायला लावले नसेल किंवा ‘दिल चाहता है’ सारखी गाणी ज्याच्या ओठावर रुळली नसतील असा तरुण शोधूनही सापडणार नाही.
मात्र आजच्या इन्स्टंट जमान्यात किंचाळणारं संगीत आणि अर्थहीन गाणी झटपट लोकप्रिय होतात आणि अशी गाणी लोकप्रिय कशी होतात हे पाहून आपल्यापैकी अनेकजण आश्चर्यचकित होताना दिसतात. अशी अनेक गाणी अलिकडच्या काळात आली आहेत. पण विशेष म्हणजे, त्यांची क्रेझ कायम राहिली आहे.अशाच काही गाण्यांची चर्चा आपण करणार आहोत. 'रात की मटकी फोडे....' या 'कमिने' चित्रपटातल्या गाण्याला अजूनपर्यंत क्रेजिएस्ट साँग मानले जात आहे. चित्रपट रिलिज हो ऊन बराच काळ लोटला तरी त्याची जादू युवा पिढीमध्ये दरवळताना दिसत आहे. वरात, मिरवणुकांमध्ये या गाण्याची डिमांड हमखास असते. मेट्रो सिटीजच्या डिस्कोथेकमध्येही म्हणे या गाण्याला अजून मागणी आहे. ' दे दणादण' मधल्या 'पैसा पैसा करती है... ' गाण्यावरही न्यू जनरेशन थिरकताना दिसते. हा चित्रपट भलेही आपटला तरी गाण्याची लोकप्रियता अद्याप कमी झाली नाही. खरे तर या गाण्यात फुट स्टेपिंग बीट्स नाहीत, तरीही विचित्र बोलीने या गाण्याने आपल्याकडे आकर्षित केले आहे.
'देव डी' ने जरी प्रेक्षकांची वाहवा मिळवली असली तरी यात मोठं योगदान गाण्याचंही आहे. ' इमोशनल अत्याचार' या गाण्यात शब्दांचा वापर कसाही केला असला तरी बीट्स मात्र लाजवाब आहेत. 'इमोशनल अत्याचर' सारखे शब्दसुद्धा लोकांना या गाण्यानंतरच परिचित झाले. यावरून रिऍलिटी शोजसुद्धा सुरू झाले. हे गाणं बराच काळ क्रमांक एकवर वाजत राहिलं होतं. ' बीडी जलै ले...' गाण्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. 'ओंकारा' मधल्या अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्यापेक्षा अधिक लोकप्रियता या गाण्याने मिळवली. बिपाशाचे लटके- झटके आणि उत्तम डान्स स्टेप्स यांनी या गाण्याला थिरकण्याचं कारण बनवलं. अजूनही या गाण्याची जादू कायम आहे.
प्रियांका आणि रणबीर कपूर यांच्या 'अंजना-अंजानी' या प्लॉप चित्रपटाच्या टायटल गाण्याचे बोल कळतही नाहीत, पण हे गाणे नंबर गेमचा हिस्सा बनले. याची जोरदार धुन डान्स प्लोरवर थिरकायला भाग पाडते. हेच या गाण्याच्या यशाचे रहस्य आहे. जर आपण गाण्याच्या बोलींकडे लक्ष दिल्यास याला आतापर्यंतच्या सगळ्यात बकवास गाण्यांच्या श्रेणीत याचा समावेश करता येईल. पण युवकांमध्ये अशा गाण्यांनाच अधिक पसंदी दिली जात आहे. त्यामुळे असं वाटतं की, या जनरेशनला ज्यामध्ये काही अर्थ नाही अशाच वस्तू पसंद पडत आहेत. ज्याला आकार- ऊकार नाही, अर्था-बिर्थाचा गंध नाही, अशाच चिजा न्यू जनरेशन डोक्यावर घेऊन नाचताना दिसते. अर्थात अशाप्रकारची गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर आजच पोहचली नाहीत. किंवा अशी गाणी नवीन नाहीत. पण इतकेच आज अशाप्रकारची गाणी अधिक काळ आणि अधिक हिट होताना दिसत आहेत. अमिताभच्या काळात 'कुली' या सुपरहिट चित्रपटातले ' ऍक्सिडेंट हो गया रब्बा...' आणि ' हम' मधील ' जुम्मा चुम्मा दे दे...' ही गाणी आपापल्या काळात हिट होती. पण या काळात अशाप्रकारची गाणी कमी बनत. अशाचप्रकारे गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या ' कुली नं.१' मधले ' तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं...' हे गानेसुद्धा ब्लॉक बस्टर हिट झाले होते. पण अशा गाण्यांचा प्रयोग मर्यादितच होता. आता मात्र अशा गाण्यांना कुठली मर्यादाच राहिली नाही.
· आज चित्रपटातल्या गाण्यांनी आपलं रुपडं पालटलं आहे. हे असंच चालत राहिलं तर मात्र धोकादयक ठरण्याची शक्यता अधिक आहे. अशा गाण्यांमुळे एका नव्या फाजिल, उडानटप्पू संस्कृतीला खतपाणी घातलं जात आहे. विचित्र आणि अर्थहीन शब्दांचा वापर आता प्रचलित होऊ लागला आहे. गीतकारांनी व्यावसियकता स्वीकारल्याने व त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे निर्मात्यांच्या मर्जीनुसार पाट्या टाकण्याचे काम सुरू असल्याने बकवास गाणी पण फुटिंग स्टेप्सच्या जोरावर निर्मिली जात आहेत. आवडी-निवडी बदलल्या याचा अर्थ समाजही बदला आहे, याची जाणीव यायला हवी आहे. आजकाल चित्रपटांमध्ये ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला जात आहे, ए पाहता समाजातला शालीनता आणि शिष्टाचार कमी होत चालाला असल्याचेच हे द्योतक आहे. आधुनिक प्रयोगाच्या नावावर आज युवा पिढीशी एक वेगळाच खेळला जात आहे. कारण व्यक्ती जे काही ऐकते आणि पाहते , त्याचा थेट परिणाम त्याच्या आचरणावर, व्यवहारावर होत असतो. समाजात त्याची व्यवहारताच त्याची भूमिका स्पष्ट करीत असते.
No comments:
Post a Comment