Wednesday, December 7, 2011

बालकथा युक्ती

    एकदा कुठल्या तरी कारणानं बसरा आणि बगदाद दरम्यानच्या व्यापारावर प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची आयात-निर्यात होत नव्हती.  मुल्ला नसरुद्दीन प्रत्येक सातव्या -आठव्या दिवशी गाढवावर गवताचा  भारा लादून बसेरातून बगदाद हद्दीत जात असे. माणसांच्या जाण्या-येण्याला मनाई नव्हती. पण व्यापारी वस्तूंवर बंदी होती. सीमेवर तपासणी अधिकारी डोळ्यांत तेल घालून पहारा देत होते. ते नसरुद्दीनची मोठ्या बारकाईने तपासणी करायचे. परंतु, त्याच्या गवताच्या भार्यातसुद्धा कुठली अवैध वस्तू मिळायची नाही. मुल्ला अगदी आरामात बगदादमध्ये प्रवेश करायचा आणि तीन- चार दिवसांनी तसाच गवताचा भारा गाधवावर लादून परतायचा. प्रत्येकवेळा त्याची बारकाईने तपासणी व्हायची. पण नेहमीप्रमाणे काही मिळायचे नाही. वरिष्ठ अधिकार्यांकडून मात्र सूचना मिळायची की सीमेवर तस्करी होत आहे.
   महिने-दोन महिने असा क्रम चालत राहिला. अधिकारी वैतागून गेले. एक दिवस बगदादहून बसेराकडे परतताना अधिकार्याने तपासणी केली. आणि म्हणाला," नसरुद्दीन, मी तुला माफ केलं समजं, पण खुदाचा वास्ता घेऊन खरं खरं सांग, तू तस्करी करतोयस ना ?" मुल्ला होकारार्थी मान डोलवत म्हणाला, " होय, मी तस्करी करतो."
" कुठल्या वस्तूंची?" अधिकारी.
" गाढवांची ! इकडून वयस्क काहीसे अशक्त गाढवं तिकडे घेऊन जातो आणि तिकडून जवान पण सशक्त गाढवं इकडे आणून चांगल्या किंमतीला विकतो. " असे म्हणून नसरुद्दीन आपल्याजवळच्या गाढवाला हाकत पुढे निघून गेला. अधिकारी पाहतच राहिला.
सांगायचा मुद्दा असा की, माणूस अशा काही युक्त्या शोधतो, ज्यापुढे सगळे नियम , कायदे-कानून निष्प्रभ ठरतात.

No comments:

Post a Comment