Tuesday, December 13, 2011

बालकथा स्वप्नातल्या सुवर्णमुद्रा

     एका गावात एक मजूर राहत होता. तो खूपच दरिद्री होता. दिवसभर काबाडकष्ट केल्याशिवाय संध्याकाळच्यावेळची  त्याच्या घरची चूल पेटत नव्हती. एक दिवस त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याने त्याच्या एका मित्राकडून शंभर सुवर्णमुद्रा घेतल्या होत्या. सकाळी उठल्यावर त्याला स्वप्नाची आठवण झाली. अन्य मित्रांशी सहज गप्पा मारताना मजुराने त्याला पडलेल्या स्वप्नाचा विषय काढला. स्वप्नात ज्या मित्राकडून शंभर सुवर्णमुद्रा घेतल्या होत्या, त्याला ही गोष्ट समजली. त्याच्या मनात लबाडी उत्पन्न  झाली.
      तो लगेच गरीब मजुराकडे जाऊन पोहचला  आणि म्हणाला," मित्रा, तू ज्या सुवर्णमुद्रा माझ्याकडून घेतल्या आहेस, त्या मला परत कर." मजुराला पहिल्या पहिल्यांदा गंमत वाटली. मित्र आपली फिरकी घेत असावा, असे त्याला वाटले. पण त्याचा मित्र अगदी गंभीरपणाने  सुवर्णमुद्रा मागू लागल्यावर मात्र त्याची भीतीने गाळण उडाली. त्याच्याकडे तर फुटकी कवडीसुद्धा नव्हती, मग बिचारा शंभर सुवर्णमुद्रा कोठून देणार? "
      अचानक ओढवलेल्या संकटामुळे बिथरलेला मजूर कसा तरी मित्राच्या दावाच्या मुकाबला करत होता. पण धूर्त मित्र मात्र आपल्या मागणीवर ठांम होता. शेवटी तो मजुराची तक्रार घेऊन पंचांकडे गेला. पंचांनी दोन्ही पक्षाची बाजू काळजीपूर्वक ऐकून घेतली. पण त्यांना निर्णय घेता आला नाही. कारण सकृतदर्शनीचा पुरावा मजुराच्या स्वप्नात मित्राकडून मुद्रा घेतल्याची साक्ष देत होता.
     खूप विचार केल्यानंतर शेवटी पंचांनी तक्रार राजाकडे पाठवली. राजाने तक्रारीवर खूपच गांभिर्याने विचार केला. राजा समजून चुकला की मजुराचा मित्र बेमानी करतो आहे. लबाडी करतो आहे. पण निर्णयसुद्धा 'जशास तसा' द्यायला हवा होता. शेवटी राजाने दुसर्‍यादिवशी दोघांना पुन्हा दरबारात यायला सांगितले. दुसर्‍यादिवशी  दोघेही दरबारात  पोहोचले. दरबारात एक भलामोठा आरसा अशापद्धतीने लावण्यात आला होता की, शंभर सुवर्णमुद्रांचे प्रतिबिंब त्यात दिसेल. राजा मजुराच्या लबाड मित्राला म्हणाला," तुमचे योग्यच आहे. मजुराने तुमच्या सुवर्णमुद्रा परत करायला हव्यात..." मित्राच्या तोंडाला पाणी सुटले. तो  मनोमनी सुखावला.  राजा पुढे म्हणाला," आरशात ज्या सुवर्णमुद्रा दिसताहेत, त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता."
      यावर मजुराचा मित्र आश्चर्य व्यक्त करत म्हणाला," हे कसे होऊ शकते?" त्यावर राजा पटकन म्हणाला," का नाही होणार? मजुरानेसुद्धा सुवर्णमुद्रा स्वप्नात घेतल्या होत्या, जे एक प्रतिबिंब होते. मग त्या मोबदल्यात खर्‍या मुद्रा हव्यात कशाला? "  हे ऐकून मजुराच्या मित्राची मान शरमेने आपोआप खाली झाली.
    राजाने तात्काळ मजुराच्या मित्राला कारावासाची शिक्षा ठोठावली. आणि मजुराला त्या सुवर्णमुद्रा उपहार म्हणून दिल्या.                                                                                                     - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment