माणूस जन्म पून्हा पून्हा मिळत नाही. पूनर्जन्म वर विश्वास न ठेवता, स्वर्ग- नरकाच्या बाता न मारता सध्याच्या मिळालेल्या मानवी जीवनातच आपल्या वागणुकीवर स्वर्ग- नरकाची अनुभूती मिळत राहते, यावरच विश्वास ठेवायला हवा. कुठल्याही माणसाला पूर्वजन्माची, स्वर्ग- नराकाची जिवंत कहानी ठाऊक नाही. त्यामुळे मिळालेल्या मानवी आयुष्यातच स्वर्ग- नरकाच्या संकल्पना दडल्या आहेत. ज्याचे आचरण चांगले, संघर्ष नेक आहे, त्याच्यासाठी इहलोक स्वर्गसमान आहे. याचे भान ठेऊन मानवी जीवन सत्कारणी लावले पाहिजे. माणसाचा जन्म सर्वात श्रेष्ठ आहे. याला फुकाचे वाया घालवण्यात अर्थ नाही. माणूस म्हणून जगताना आपली कर्तव्ये पार पाडण्यावर भर दिला गेला पाहिजे. आपल्या कष्ट, मेहनतीच्या जोरावर आपण ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी धडपडले पाहिजे. मानवाला मिळणार्या अत्यल्प आयुष्यामध्ये सुरुवातीची २५ वर्षे शिक्षणामध्ये जातात. जीवनाच्या संपूर्ण कालावधीमध्ये ४0 वर्षापर्यंतचा काळ हा उमेदीचा मानला जातो, म्हणजेच मिळालेल्या १५ वर्षात केवळ इतरांसोबत तुलना, अहंकार, भोगी व अभिलाशी वृत्ती जोपासली तर साहजिकच द्वेष, खोटारडेपणा या बाबीसुद्धा पाठोपाठ येऊन चिकटल्या म्हणून समजा.
हा कालावधी मनुष्य जन्मातला महत्त्वपूर्ण कालावधी आहे. यावरच मानवी जीवनाची सार्थकता- व्यर्थता अवलंबून आहे. या कालावधीत जर तुम्ही समाजाचा, महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या कुटुंबाचाही विश्वास संपादन करू शकत नसाल, तर खरोखरच मनुष्यजीवनाचा खरा स्वाद आपण चाखला, असे प्रामाणिकपणे म्हणता येणार नाही. मानवी जीवनच संघर्षाचे आहे. संघर्षाने मनुष्य सार्मथ्यवान बनतो. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. जी व्यक्ती ऐशोआरामाचे जीवन जगण्यास इच्छुक असते, ती कमजोर होऊन बसते. त्यांची योग्यता, प्रतिभा सुद्धा कमजोर होते. याचा अर्थ त्याला मानवी जीवनाचा अर्थच कळला नाही, असा होतो. जी व्यक्ती आपल्या जीवनात संघर्षाला सामोरे जाऊ शकत नाही. ती जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.
संघर्ष आपल्याला जीवन जगायला शिकवते. म्हणून संघर्षाकडे पाठ फिरवू नका. अन्यथा जीवनात नैराश्य, असुया, दु: ख येत राहतात. सतत कामात असलेल्या माणसाला कशाचीच तमा नसते. आयुष्यात हार-जीत ठरलेली आहे. एखादा विजयी होतो, तेव्हा कोणी तरी हरलेला असतो. म्हणूनच विजय प्राप्त झालेला असतो. त्यामुळे त्याचा बाऊ न करता संघर्ष करत राहिले पाहिजे. संघर्ष यशाच्या किनार्याला पोहचवल्याशिवाय राहत नाही, याची खात्री बाळगा.
आपल्याला आयुष्यात जे काही मिळवयाचे आहे. ते आपल्या शरीराच्या जोरावर ! त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. शरीर सुदृढ तर मन सुदृढ. त्यासाठी शरीराला व्यायाम द्या. काम द्या. नियमित व्यायामाने शरीर निरोगी राहील. त्यामुळे स्वत:ला कार्यमग्न ठेवाल व तणावमुक्तीचा आनंद घ्याल. एखादे कार्य कठीण आहे असे समजून ते टाळत असाल तर स्वत:ला चिंतेच्या दरीत ढकलाल. एखादे कार्य कठीण वाटत असूनही तुम्ही त्याला सुरुवात केली तर आलेल्या अडचणींना सोडविण्याची कल्पकताही तुमच्यामध्येच निर्माण होईल नव्हे ती क्षमता तुमच्यामध्ये होती याचा साक्षात्कार तुम्हाला होईल. थोडा संघर्ष करावा लागला तरी ते कार्य तुम्ही तडीस नेऊ शकाल. जी व्यक्ती श्रम करत नाही ती व्यक्ती गाढ झोपीचाही आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळेच म्हटल्या गेले आहे, 'संघर्षहीन जीवन आणि मृत्यू यामध्ये केवळ श्वासाएवढेच अंतर आहे.' वाईट प्रसंग, दु:खद परिस्थिती यातून कोणाचीही सुटका नाही. इतिहास पाहिल्यावर आपल्या लक्षात येते, पण ज्यांनी त्यावर हसत खेळत मात केली आहे, तेच यशस्वी झाले आहेत.
मानवी जीवन संघर्षाशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याला पावलागणिक सामना करावा लागतो. अलिकडच्या युवकांना स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण असतात, असे वाटत असते. पण हा त्यांचा गैरसमज आहे. योग्य नियोजन, यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण, त्यानुसार अभ्यास आणि त्यासाठीची चिकाटी, प्रयत्नात सातत्य आवश्यक आहे. परिश्रमाची तयारी ठेवल्यास काहीही असाध्य नाही. मग या स्पर्धा परीक्षासुद्धा काहीच वाटणार नाहीत. त्या सहज उत्तीर्ण करता येतात. अपयशाला घाबरू नये. अपयशातून यशाचा मार्ग मिळतो हे नेहमी लक्षात ठेवावे. जिज्ञासू मनोवृत्ती असणारा स्पर्धा परीक्षार्थी अपयशी होऊच शकत नाही, असे ठामपणे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.
No comments:
Post a Comment