Saturday, December 10, 2011

बालकथा चूक कळली

     रमेश सातवीत शिकत होता. अभ्यासात ना पुढे होता ना पाठीमागे. आणि कामात म्हणाल तर त्यातही मध्यमच. पण तरीही त्याच्यात एक खोड होती. ती होती घमेंडीची. गोष्टी-गोष्टींवर चिढायचा आणि मोठमोठ्या बडाया मारायचा. त्यामुळे शाळेत त्याला सगळे घमेंडखोर म्हणून चिढवायचे. पण त्याला त्याचे काही वाटायचे नाही.
     थंडीचे दिवस सुरू झाले होते. लोकांनी आपले अडगळीतले स्वेटर, मफलर, जर्कीन वगैरे गरम कपडे बाहेर काढले होते. शाळेतल्या मुलांनी त्याचा वापर सुरू केला होता. पण रमेशने अजूनही याकडे लक्ष दिले नव्हते. त्याचेकडे गरम कपडे नव्हते, अशातला काही भाग नव्हता. त्याचा जिवलग मित्र अनिकेत त्याला म्हणाला," अरे रमेश, कसली थंडी पडतेय, पण तरीही तू गरम कपडे वापरत नाहीस. नेहमीचेच कपडे घालून येतोस. तुला थंडी वाजत नाही का? का आजारी पडण्याची तयारी करतोयस? "
झालं, रमेशची  खोड जागी झाली. रमेश अनिकेतवर उलटा बरसलाच," मला काय वेडा समजोयस, थंडीचा बाऊ दाखवायला. अरे, मी अख्खा हिवाळा असाच काढू शकतो. सगळ्यांना सारखा समजू नकोस ? जरा कुठे वारा लागला आणि धरले अंथरुण... माझं शरीर काही लेचंपेचं नाही, दिवसातून चार चारदा गोळ्या खायला..." अनिकेत गप्प राहिला. शेवटी करतो काय? चांगलं सांगायला गेल्यावर रमेश उलटा त्याच्यावरच भडकला.
     डिसेंबर महिना सुरू झाला. कडाक्याची थंडी पडू लागली. रमेशच्या आईने स्वेटर वगैरे घालायला सांगितलं. सगळे गरम कपडे तिने स्वच्छ धुवून बाहेर काढून ठेवले होते. पण रमेश ऐकतोय कुठला? त्याच्या घमेंडीपुढे सारे क्षुल्लकच ! त्याने अनिकेतला सुनावले होते, तेच आईला सुनावले. अनिकेतशिवाय त्याच्या वर्गातल्या  अन्य मित्रांनीही त्याला प्रामाणिकपणे  सांगू पाहिले, पण व्यर्थ. उलट त्यांनाही तशीच बोलणी खावी लागली. त्याला याबाबतीत जितके सांगितले जाऊ लागले. तसे तो आणखीणच हट्टाला पेटू लागला.
     बिचारा रमेश थंडीने कापायचा. पण इलाज नव्हता. तो आपल्या गोष्टीवर अडून होता. त्याने गरम कपड्यांना हातसुद्धा लावला नाही. वर्गातले यावर बोलायला लागले की, चिढायचा. त्यांच्यावर खेकसायचा आणि त्यांच्यापासून् दूर राहायचा.
     एक दिवस रमेश शाळेला आला नाही. कुणी त्याकडे लक्षही दिले नाही. पण तो दुसर्‍यादिवशीही शाळेला अला नाही. अनिकेतला मात्र संशय आला. शा़ळा सुटल्यावर तो तडक रमेशच्या घरी गेला. पाहतो तर काय, रमेश बेडवर झोपलेला. अंगावर रजई लपटलेली. त्याने घाबरतच रमेशला विचारले, " अरे रमेश! हे काय ,  तुला बरं तर वाटत नाही ना? दोन दिवस शाळेलाही  आला नाहीस..."  
रमेश काही बोलणार इतक्यात त्याची आई बाहेर येत म्हणाली, " काय सांगू अनिकेत, याला कितीदा सांगितलं, कडाक्याची थंडी पडतेय. स्वेटर-बिटर काही तरी घाल. पण माझं काही ऐकेल तर शप्पथ. बघ आता, निमोनियाने अंथरुणावर पडलाय. कुणास ठाऊक आणखी किती दिवस..."
     हे ऐकून रमेशला अनिकेतने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या, ज्या त्याने शाळेत सांगितल्या होत्या. त्याला अनिकेत म्हणाला." काय रमेश, आता कळलं ? मी तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं, पण तू कुणाच ऐकून घ्यायलाच तयार नव्ह्तास. तुझ्या या अशा अकडण्यामुळे तुला सगळे घमेंड्खोर असेच म्हणतात.
     रमेशला आपली चूक कळून आली. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. तो अनिकेतला म्हणाला," अरे, तू तरी मला असं म्हणू नकोस. तू माझा चांगला मित्र ना...? " रमेशला असे रडताना पाहून अनिकेत समजून चुकला की रमेशला त्याची चूक समजली आहे. तेव्हा तो त्याला धीर देत म्हणाला, " काही काळजी करू नकोस. दोन दिवसात खडखडीत बरा होशील. आजार काय होतच राहतात. .. आणि हे बघ, लवकर बरा हो आणि शाळेला ये मला तुझ्याशिवाय करमत नाही."
     अनिकेत निघून गेला. आठवड्याभरानंतर रमेश शाळेला आला. पण त्याला पाहिल्यावर सगळेच आश्चर्यचकीत झाले.रमेश  थंडीशी सामना करण्याच्या जय्यत तयारीने आला होता. सगळं शरीर त्यानं गरम कपड्यांनी झाकून घेतलं  होतं. फुल्ल बाह्यांचा स्वेटर, हातमोजे, कानटोपी असा सारा सरंजाम घेऊन आला होता. सगळं शरीर त्याने गरम कपड्यांनी झाकलं होतं. मात्र अनिकेतला खूप आनंद झाला.    

No comments:

Post a Comment